Tarun Bharat

राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात साकारतोय सफारी मार्ग

उद्योग खात्री योजनेतून प्राणीसंग्रहालयाचा विकास : जिल्हा पंचायतीचे सीईओ दर्शन एच. व्ही. यांच्याकडून कामांची पाहणी

दीपक बुवा / बेळगाव

भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळे प्राणी आणण्यात आल्याने पर्यटकांना जंगली प्राणी पाहण्याची ओढ लागली आहे. मात्र या संग्रहालयात जंगली प्राणी दूरवर ठेवण्यात आल्याने त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांना सफारी मार्गाची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून कामाला चालना देण्यात आली असून त्याला उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे. सुमारे 1 किलो मीटरचा हा ट्रक उद्योग खात्री योजनेतून करण्यात येत आहे. याची पाहणी नुकतीच जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. व तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केली आहे.

या मिनी झूमध्ये टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीची योजनाही आखण्यात आली आहे. हे कामदेखील पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे. बेळगावकरांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार असून पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. याला प्राणीसंग्रहालयदेखील अपवाद नाही. भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसूल पूर्णपणे थांबला असला तरी अंतर्गत कामांना मात्र मोठय़ा प्रमाणात चालना देण्यात आली आहे. सध्या येथील सफारी ट्रकच्या कामाला चालना दिली आहे.

लॉकडाऊनमुळे प्राणीसंग्रहालयाचे

उत्पन्न शून्यावर

राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे व तीन कोल्हे दाखल झाले आहेत. बेंगळूर येथील बायोलॉजिकल पार्कमधून हे प्राणी आणण्यात आले आहेत. जंगलाच्या राजासह इतर प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच लॉकडाऊनमुळे पर्यटकांची पावले थांबल्याने उत्पन्नही शून्यावर आले आहे. दरम्यान, प्राण्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च वाढला आहे. या प्राण्यांना मोठय़ा प्रमाणात मांसाची गरज असते.

पर्यटकांना सर्व प्राणी पाहता यावेत, यासाठी सफारी मार्ग करण्यावर भर देण्यात आला आहे. उद्योग खात्रीतून अनेक कामगारांना या ठिकाणी काम देण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून काम सुरू असून लवकरच पर्यटकांसाठी सफारी मार्ग खुला होणार आहे. म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात येत आहे. प्रवेशद्वारापासून साधारण 1 कि.मी.च्या आसपास वन्यप्राण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पर्यटकांना चालत जावे लागू नये यासाठी हा सफारी ट्रक तयार करण्यात येत आहे. या कामाला चालना देण्यात आली आहे. पर्यटकांचे हाल होवू नयेत आणि पावसाळय़ामध्ये अनेक पर्यटकांना सिंह व इतर वन्यप्राणी पाहण्यासाठी गैरसोय होवू नये, या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर उद्योग खात्री योजनेतून संग्रहालयात तलावांची खोदाईही करण्यात आली आहे. त्यांचीही पाहणी करण्यात आली असून पावसाळय़ामध्ये त्यात पाणी कसे साठवता येईल, याची माहितीही अधिकाऱयांकडून दर्शन एच. व्ही. यांनी घेतली आहे. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, आरएफओ राकेश अर्जुनवाड, तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, तांत्रिक विभागाचे संयोजक नागराज यरगुद्दी आदी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात गुरूवारी 232 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Patil_p

हुक्केरीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र

Patil_p

बारवाड नदी संगमावरील घाटाची दयनीय अवस्था

Patil_p

शहर म. ए. समितीचा शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni

कक्केरी येथे शेतकऱयाचा खून

Patil_p

हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांचे जि. पं. अधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni