Tarun Bharat

‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर धक्काबुक्की

शाब्दिक चकमक वातावरण तंग, कुडाळ पोलिसांचा फौजफाटा दाखल

प्रतिनिधी / कुडाळ:

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्या विरोधात आवाज उठविला. त्यानंतर बुधवारी सकाळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आकेरी (ता. कुडाळ) येथे चित्रीकरण सुरू असलेल्या या मालिकेच्या सेटवर धडक दिली.

मुंबई, पुणे येथून आलेले कलाकार व अन्य लोकांनी आरोग्य तपासणी केली का? तपासणी करूनच ते आले आहेत का?, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ही धडक दिली. चित्रीकरण सुरू असताना कागदपत्रे पाहताना प्रॉडक्शन टीम व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसान धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे वातावरण तंग झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे व सहकारीही फौजफाटय़ासह आकेरीत दाखल झाले.

चर्चेअंती प्रकरणावर पडदा

त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मालिकेचे प्रॉडक्शन मॅनेजर यांच्यामध्ये चर्चा होऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. येत्या दोन दिवसांत बैठक होऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे अमित सामंत तसेच स्थानिक प्रॉडक्शन मॅनेजर व अभिनेता अनिल गावडे आणि दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील बसस्टॉप, मंदिर, रुग्णालये व अन्य सार्वजनिक मालमत्तेवर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी रंगरंगोटी करण्यात आली होती. त्या विरोधात राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला. हा वाद सुरूच होता.

              आकेरीतील सेटवर धडक

बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष राजू धारपवार, सर्वेश पावसकर, सनी मोरे, हर्षद बेग, कौस्तुभ नाईक, एन्जिलो पिंटो व सहकारी आकेरी येथील मालिकेच्या सेटजवळ गेले. सध्या कोरोना संसर्ग वाढत असून जिल्हा प्रशासनाने जिल्हय़ाबाहेरून मुंबई, पुणे येथून येणारे कलाकार व सहकाऱयांनी 72 तास आधी आरोग्य तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे जाहीर केले असल्याने कार्यकर्त्यांनी मालिका प्रॉडक्शन मॅनेजर श्रीकांत दाते यांच्याकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर दाते आत गेले, ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांना निरोप पाठविल्यानंतर कागदपत्रांची फाईल घेऊन ते बाहेर आले. कागपत्रांचे फोटो घेण्यासाठी फाईल घेतली असता, दाते व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले.

           धक्काबुक्की झाल्याने वातावरण तंग

कोणकोणत्या परवानग्या घेतल्या व अन्य प्रश्नांचा भडीमार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजरवर केला. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. कार्यकर्त्यांनी दाते यांना मारहाण केल्याचा आरोप मालिकेच्या व्यवस्थापनाने केला, तर दाते यांनी प्रथम धक्काबुक्की केली व त्यानंतर वाद झाला, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

           राष्ट्रवादीचे पदाधिकारी आकेरीत दाखल

आकेरीत मालिका प्रॉडक्शन मॅनेजरला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. दोन्ही गटात वाद झाला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना समजताच त्यांच्यासह काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, बाळ कनयाळकर, संग्राम सावंत, नजीर शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, इफतिक राजगुरू व सहकारी आकेरीत दाखल झाले.

               आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठिशीच

घटनास्थळी पोहचल्यानंतर सामंत यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मालिका प्रॉडक्शन मॅनेजर, स्थानिक प्रॉडक्शन मॅनेजर अनिल गावडे व सहकाऱयांना आपले प्रॉडक्शन मॅनेजर चुकीच्या पद्धतीने वागतात म्हणून हा प्रकार घडला. सार्वजनिक मालमत्तेचे आपण विद्रुपीकरण केले. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका योग्य असून आपण त्यांच्या पाठिशी ठामपणे आहोत, असे सामंत यांनी सांगितले.

                      पोलीस दाखल

आकेरीत वाद झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हुलावळे व सहकारी आकेरीत मालिकेच्या सेटकडे आले. त्यांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत कोणाच्या तक्रारी असतील, तर पोलीस ठाण्यात या, असे सांगितले. दोन्ही गट तक्रार देण्यास अनुकूल नव्हते. दरम्यान, काही कलाकारांच्या तक्रारी आहेत. त्या सोडवा. स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी भूमिका सामंत यांनी मांडली. तुम्ही मालिका करा. आमचा पाठिंबा राहील. मात्र, स्थानिक राजकारणात तुम्ही पडू नका, असा इशारा सामंत यांनी दिला. प्रॉडक्शनच्या लोकांच्या वागणुकीचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

 दोन दिवसांत बैठक

मालिका व्यवस्थापन व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बोलताना सामंत म्हणाले, भिंतीवर-सार्वजनिक मालमत्तेवर पेंटिंग आम्ही केलेच नाही, अशी भूमिका प्रॉडक्शनने घेतली. मात्र, त्यानंतर मालिका प्रमोशनसाठी केल्याचे मान्य करीत ते दुरुस्त करून देऊ, असे सांगितले. तसेच या मालिकेत स्थानिक कलाकारांना भूमिका मिळाव्यात. काही कलाकारांवर अन्याय होत आहे, तो दूर करावा, याबाबत चर्चा झाली असून दोन दिवसांत बैठक घेऊन हे प्रश्न सोडविण्याचे अनिल गावडे व राजू सावंत यांनी मान्य केल्याचे सामंत यांनी सांगितले. अनिल गावडे व राजू सावंत यांनीही दोन दिवसांत चर्चा करून हा प्रश्न मिटविण्यात येईल, असे सांगितले.

Related Stories

चिंदर-भगवंतगड रस्त्यावरील खड्डे आता बुजणार

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : दापोलीत संविधान दिन उत्साहात

Archana Banage

‘चिवला बीच’ येथे १७ व १८ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

Anuja Kudatarkar

खेडमध्ये कोरोना लढ्यात ३०० आरोग्य कर्मचारी राबताहेत!

Archana Banage

जिल्हय़ात आजपासून मुसळधारचा इशारा

Patil_p

मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

NIKHIL_N