अभिनेता सनी कौशल आणि अभिनेत्री राधिका मदान यांच्या ‘शिद्दत’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. राधिकाने स्वतःच सोशल ाrमडियावर चाहत्यांसोबत या लव्ह स्टोरी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.


‘शिद्दत’च्या ट्रेलरसोबत प्रेमाची शक्ती अनुभवा. ‘शिद्दत’ 1 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत असल्याचे राधिकाने नमूद केले आहे. कुणाल देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सनी-राधिका यांच्यासह डायना पेंटी आणि मोहिता रैना देखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘शिद्दत’ चित्रपटाचे मुंबई, लंडन, पॅरिस आणि ग्लासगोमध्ये चित्रिकरण करण्यात आले आहे.
हा चित्रपट मागील वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. या चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिलेली आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजना आणि भूषण कुमार यांनी केली आहे.