Tarun Bharat

राफेलसह 56 विमानांनी दाखवली ताकद

भारतीय हवाई दलाचा 88 वा स्थापना दिवस : हिंडन एअरबेसवर वायुदलाकडून प्रात्यक्षिके सादर

हिंडन (गाझियाबाद) / वृत्तसंस्था

भारतीय हवाई दलाचा 88 वा वर्धापनदिन गुरुवारी म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये नव्याने वायुदलात सामील झालेले राफेल लढाऊ विमान मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले होते. लडाख भागात चीनसोबत तणावाची स्थिती निर्माण झाली असतानाच आज साजऱया झालेल्या हवाई दलाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात 56 विमानांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

वायुदलाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कसरतींवेळी विमानांच्या मारक क्षमतेची झलक पाहायला मिळाली. प्रात्यक्षिकांची सुरुवात आकाशगंगा पॅराजम्पिंग गटाकडून करण्यात आली. प्रात्यक्षिकांचे मुख्य आकर्षण असलेली राफेल दोन परफॉर्मन्समध्ये आकाशात झेपावलेली दिसली. पहिल्या विजय परफॉर्मन्समध्ये त्यांच्यासोबत मिराज 2000, जग्वार, मिग 29 विमाने होती, तर दुसऱया फेरीवेळी  स्वदेशी तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी राफेलला साथ दिली. याप्रसंगी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आगामी दशक आव्हानात्मक : भदौरिया

हवाईदल प्रमुख भदौरिया यांनी आपल्या भाषणात हवाई दलाच्या कामगिरीचा आढावा घेतानाच कोरोनाकाळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच सध्या आपल्या देशाला आणि हवाईदलाला सायबर आणि ड्रोनचा धोका यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांचा सामना करताना आपल्याला पुढे जावे लागेल आणि आव्हानांचा सामना करतच जगातील सर्वोत्कृष्ट हवाई दल बनले पाहिजे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

चीनला ठणकावले

एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदल प्रमुखांनी चीनला कठोर शब्दात संदेश दिला. काही शेजारी राष्ट्रांशी भारताचे तणावपूर्ण संबंध असले तरीही आपल्या संस्कृतीत शांततेला महत्त्व आहे आणि शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र भारतीय हवाईदल शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासही सक्षम आहे. नुकत्याच हवाई दलात सामील झालेल्या राफेल लढाऊ विमानांसह चिनूक आणि आपाचे हेलिकॉप्टर्सनी हवाई दलाची ताकद वाढवली आहे, असे ते म्हणाले.

आव्हाने पेलण्याची हवाई दलाची क्षमता

येत्या काही वर्षातील काळ आव्हानात्मक असला तरी सायबर हल्ला, ड्रोनद्वारे पाळत ठेवणे यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करण्यास हवाई दल समर्थ असल्याचे भदौरिया यांनी स्पष्ट केले. हवाईदल प्रत्येक आव्हानासाठी स्वतःला सुसज्ज करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रोहिणी रडार, तेजस विमान आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानाने तयार केली गेली आहेत. तसेच भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेली विमाने आणि क्षेपणास्त्र यंत्रणा आगामी काळात हवाई दलाचा भाग बनतील, असेही ते पुढे म्हणाले.

88 वर्षांत गाठली नवी उंची

भारतीय हवाई दलाने 1932 मध्ये त्यांचे काम सुरू केले होते. वजिरिस्तानमध्ये काबाईलियो विरुद्ध लढताना वायुसेनेच्या विमानाचे पहिले उड्डाण 1 एप्रिल 1933 मध्ये झाले होते. दुसऱया महायुद्धात हवाई दलाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी बर्मामध्ये या दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. 1945 मध्ये रॉयल इंडिअन फोर्स असलेला हा विभाग 1950 मध्ये गणराज्य झाल्यावर त्यातील रॉयल शब्द काढून टाकला गेला. भारताचे सर्व संभावित धोक्मयापासून संरक्षण करणे तसेच बचावकार्यात मदत ही वायुदलाची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दलाने अनेक युद्धात सहभाग घेतला आहे. दुसरे महायुद्ध, भारत चीन युद्ध, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन विजय, कारगील युद्ध, भारत पाक युद्ध, कांगो संकट अशा कारवायांमध्ये भारतीय हवाई दलाने आपली ताकद दाखवून दिलेली आहे.

Related Stories

6 हजार कोटींचे भांडवल केंद्र सरकार गुंतवणार

Omkar B

राज्यात यापुढे लॉकडाऊन राहणार नाही

Patil_p

लसनिर्मितीचे 4 प्रकार

Patil_p

तृणमूलच्या सिंडिकेटशी भाजपची खरी लढाई

Amit Kulkarni

अंदमान, काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

Amit Kulkarni

स्पाईसजेटच्या सिस्टीमवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला

datta jadhav