Tarun Bharat

राफेल नदालचे विक्रमी 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद

Advertisements

पाच सेट्सच्या झुंजीत मेदवेदेव्हवर मात, महिला दुहेरीत क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हा अजिंक्य

वृत्तसंस्था/ मेलबर्न

स्पेनच्या राफेल नदालने 21 वे ग्रँडस्लॅम जिंकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू होण्याचा नवा विक्रम नोंदवला. येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हचा पाच सेट्समध्ये पराभव करून त्याने हा विक्रम नोंदवला.

पहिले दोन सेट्स जिंकून मेदवेदेव्हने जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण जिगरबाज नदालने नंतरचे तीनही सेट जिंकून 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद निश्चित करताना जोकोविच व रॉजर फेडरर यांना मागे टाकले. या दोघांनी प्रत्येकी 20 अजिंक्यपदे मिळविली आहेत. साडेपाच तास रंगलेल्या या झुंजीत नदालने मेदवेदेव्हवर 2-6, 6-7 (5-7), 6-4, 6-4, 7-5 अशी मात केली. पाचव्या सेटमध्ये 5-6 वर असताना चॅम्पियनशिपसाठी नदाल सर्व्हिस करीत होता. त्यावेळी मेदवेदेव्हने त्याची सर्व्हिस भेदली. पण पुढच्या वेळी नदालने ही चूक होऊ दिली नाही. 5 तास 24 मिनिटे रंगलेली ही लढत ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाची दीर्घ लढत ठरली. यापूर्वी 2012 मध्ये नोव्हॅक जोकोविचने नदालला 5 तास 53 मिनिटांच्या लढतीत हरवून जेतेपद पटकावले होते. येथील सामन्याच्या दुसऱया सेटवेळी एक निदर्शक कोर्टवर आल्याने काही वेळ सामना थांबवावा लागला होता.

चारही ग्रँडस्लॅम किमान दोनदा जिंकणारा तो चौथा टेनिसपटू बनला आहे. यापूर्वी 2009 मध्ये त्याने येथील स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर चार वेळा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 29 वेळा त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी 21 वेळा त्याने जेतेपद मिळविले तर फेडरर व जोकोविच यांनी 31 पैकी 20 वेळा अंतिम फेरीत यश मिळविले आहे. 2021 च्या उत्तरार्धात नदालने फक्त दोन सामने खेळले होते. पावलाच्या दुखापतीमुळे त्याच्यावर ही वेळ आली होती. याशिवाय त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. अशा पार्श्वभूमीवर त्याने येथे जेतेपद मिळविल्याने या यशाला विशेष महत्त्व लाभले आहे. कारकिर्दीत पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर सलग दुसऱया ग्रँडस्लॅममध्ये पराभूत होणारा मेदवेदेव्ह हा अँडी मरेनंतरचा दुसरा खेळाडू बनला आहे. दोन सेट्सची पिछाडी भरून काढत सामना जिंकण्याची नदालची कारकिर्दीतील ही चौथी वेळ आहे.

महिला दुहेरीत पेसिकोव्हा-सिनियाकोव्हा विजेत्या

बार्बोरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा या झेक प्रजासत्ताकच्या अग्रमानांकित जोडीने येथे महिला दुहेरीचे जेतेपद मिळविले. त्यांचे हे चौथे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. अंतिम फेरीत त्यांनी कझाकची ऍना डॅनिलिना व ब्राझीलची बियाट्रिझ हदाद माया या जोडीवर 6-7 (3)7), 6-4, 6-4 अशी मात केली. विजयी जोडीने एका सेटची पिछाडी भरून काढत हे यश मिळविले. गेल्या वर्षी त्यांना येथील स्पर्धेत एलिस मर्टेन्स-आर्यना साबालेन्का यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपद मिळाले होते. क्रेसिकोव्हा ही महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून तिने आपली जोडीदार कॅटरिनाचे आभार मानले. ‘दीर्घ काळापासून ती माझ्यासोबत खेळत असून आमची जोडी यशस्वी ठरत आलीय, याचा आनंद वाटतो. आता पुढील स्पर्धेत असेच यश मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू,’ असे क्रेसिकोव्हा म्हणाली.

पेसिकोव्हा-सिनियाकोव्हा यांनी याआधी पेंच ओपन (2018 व 2021), विम्बल्डन (2018) स्पर्धा जिंकल्या आहेत. 2016 पासून त्या एकत्र खेळत आहेत. टूरवरील त्यांचे हे एकूण 11 वे अजिंक्यपद असून त्यापैकी 5 गेल्या वर्षी मिळविली आहेत. बिगरमानांकित डॅनिलिना व हदाद माया यांनी या स्पर्धेआधी झालेल्या सिडनी क्लासिकमध्ये प्रथमच एकत्र आले होते आणि ती स्पर्धा त्यांनीच जिंकली होती.  

कनिष्ठ मुलांच्या गटात कुझुहारा विजेता

अग्रमानांकित ब्रुनो कुझुहाराने कनिष्ठ मुलांच्या विभागाचे जेतेपद मिळविले. त्याची सुमारे चार तास झालेली मॅरेथॉन अंतिम लढत झेकच्या याकुब मेनसिकविरुद्ध चालली असताना मॅचपॉईंटवेळी पायात गोळे आल्याने मेनसिक कोर्टवरच कोसळला. त्याला उपचारासाठी व्हीलचेअरवरून नेण्यात आले. तिसऱया व निर्णायक सेटवेळी 5-6 वर असताना मेनसिकने दीर्घ रॅली जिंकत 30-30 अशी बरोबरी साधली होती. पण यानंतर त्याला उभारताही येत नव्हते, असे दिसून आले. त्याने सलग दोन डबल फॉल्ट केल्याने कुझुहारा विजेता ठरला. कुझुहाराने हा अटीतटीचा सामना 7-6 (7-4), 6-7 (6-8), 7-5 असा जिंकत जेतेपद पटकावले. ‘अशा प्रकारे जिंकण्याचे समाधान वाटत नाही. पण याकुब यातून लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. आम्हा दोघांत झालेली ही झुंज अतिशय रंगतदार झाली. याकुबलाही मानवंदना. धन्यवाद मित्रा,’ अशा भावना नंतर कुझुहाराने व्यक्त केल्या.

कनिष्ठ मुलींच्या गटात क्रोएशियाच्या अग्रमानांकित पेत्रा मारसिन्कोने पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत बेल्जियमच्या सोफिया कोस्टूलासचा 7-5, 6-1 असा पराभव केला.

Related Stories

गोलरक्षकाचा गोल! लिव्हरपूलच्या बेकरचा पराक्रम!

Patil_p

आयपीएल रद्द झाल्यास 50 कोटी डॉलर्सचे नुकसान

Patil_p

हरमनप्रीतची बीबीएलमधून माघार

Amit Kulkarni

भारतीय महिला संघाला मिळाली बक्षीस रक्कम

Patil_p

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

Archana Banage

ब्राझीलच्या नेमारशी पुमाचा नवा करार

Patil_p
error: Content is protected !!