Tarun Bharat

राफेल विमानांचे जल्लोषात आगमन

पंतप्रधान मोदींकडून ‘स्वागत’, वायुसामर्थ्यात बहुमूल्य भर, सर्व वादांवर अखेर मात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेली पंधरा वर्षे गाजत असलेल्या अत्याधुनिक, बहुउद्देशीय आणि शत्रूच्या छातील धडकी भरविण्याची क्षमता असणाऱया राफेल विमानांचे आगमन भारतात झाले आहे. सर्व राजकीय आणि न्यायालयीन वादांवर विजय मिळवून अखेर बुधवारी माध्यान्ही 3 वाजून 11 मिनिटांनी 5 विमानांच्या या प्रथम तुकडीने भारताच्या भूमीला स्पर्श केला. हरियाणातील अंबाला येथील वायुदलाच्या विमानतळावर ही विमाने एकापाठोपाठ एक अशी उतरली. त्यांच्या सोबत तशाच क्षमतेची दोन सुखोई एम के 30 ही विमानेही होती. सात निष्णात वैमानिकांनी ती भारतात आणली असून त्यांचे सर्वांकडून स्वागत होत आहे.

या विमानांची क्षमता अजोड असल्याने भारताच्या वायुदलाला ती वरदान ठरणार आहेत. त्यांच्यामुळे वायुदलाची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. भारताने ती फ्रान्सच्या दासाँ कंपनीकडून विकत घेतली आहे. या कंपनीशी, तसेच फ्रान्स सरकारशी अशी परिपूर्ण स्थितीतील 36 विमाने घेण्याचा करार झाला असून उर्वरित 31 विमाने दीड वर्षांमध्ये मिळणार आहेत. ही विमाने ‘गेम चेंजर’ म्हणून ओळखली जात असून ‘सुवर्ण बाण’ असेही त्यांचे उपनाम आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून स्वागत

अंबाला विमानतळावर या विमानांच्या स्वागतासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंग स्वतः उपस्थित होते. या विमानांचे भारतात आगमन हा भारताच्या सेनाइतिहासातील एक वैभवी आणि अविस्मरणीय क्षण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या विमानांनी बुधवारी भारतीय वायुक्षेत्रात माध्यान्ही 2 वाजून 53 मिनिटांनी प्रवेश केला होता. त्यांनी भारतीय क्षेत्रात प्रवेश केल्यापासूनच ट्विर व इतर माध्यमांवर त्यांच्या स्वागताचे संदेश प्रसिद्ध होत होते.

10 विमाने लवकर मिळणार

भारताने फ्रान्सकडे 10 राफेल विमानांची तातडीने मागणी केली होती. त्यापैकी 5 विमाने आता मिळाली आहेत. आणखी पाच विमाने तयार असून ती फ्रान्समध्येच चालकांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आली आहेत. वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती राफेल विमाने त्वरित भारताकडे झेपावणार आहेत, अशी माहिती वायुदलाकडून देण्यात आली आहे.

सर्व वादांवर मात

राफेल विमाने नेहमीच विलंब आणि राजकीय वादांचे केंद्र ठरली आहेत. तसेच त्यांना प्रत्यक्ष युद्धापूर्वी न्यायालयीन लढाईलाही तोंड द्यावे लागले आहे. मनमोहनसिंग यांच्या काँगेसप्रणित सरकारच्या 2004 ते 2014 या काळात केवळ त्यांची निष्फळ चर्चाच होत राहिली. एकही विमान भारतात उतरले नाही. नंतर मोदींचे सरकार आल्यानंतर व्यवहाराला खरा वेग आला. मात्र, काँगेस नेते राहुल गांधी यांनी या व्यवहारात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला. हे प्रकरण काही मान्यवरांनी न्यायालयातही नेले. पण सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधींच्या राजकीय प्रचाराचाही उपयोग झाला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पुन्हा दणदणीत विजय झाला. आता या सर्व वादांना गाडून या विमानांनी भारतात दिमाखात प्रवेश केला आहे.  

पंतप्रधान मोदींना आनंद

विमानांचे भारतात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या ट्विटरवरील संस्कृत भाषेतील पुढील शब्दांमध्ये त्यांनी आपला संदेश प्रसारित केला आहे.

राष्ट्ररक्षा समंपुण्यम्। राष्ट्ररक्षा समं व्रतम्।d।

राष्ट्ररक्षा समं यज्ञ्। दृष्टोनैव च नैव च्।d।

नभाः स्पृषं दीप्तम्… स्वागतम्।

Related Stories

‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

datta jadhav

दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

datta jadhav

येस बँकप्रकरणी अंबानींना समन्स

tarunbharat

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

datta jadhav

धर्मांतराच्या मुद्दय़ाला राजकीय वळण नको

Patil_p

मुसेवाला हत्येतील चौघांचे एन्काउंटर

Amit Kulkarni