Tarun Bharat

रालोआत जागावाटप जवळपास निश्चित

लोक जनशक्ती पक्षाला दूर सारण्याची चिन्हे : भारतीय जनता पक्ष-संयुक्त जनता दलाला समान जागा मिळणार

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. महाआघाडीने शुक्रवारीच घटकपक्षांमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. तर रालोआतही घाईगडबडीत जागावाटप निश्चित झाल्याचे समजते. सूत्रानुसार संजद आणि भाजप समान जागांवर निवडणूक लढविणार आहे. विधानसभेच्या 243 जागांपैकी संजद आणि भाजप प्रत्येकी 119 जागांवर उमेदवार उभे करतील. तर उर्वरित 5 जागा जीतनराम मांझी यांच्या हम पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत भाजप आणि संजदने याच सूत्रावर स्वतःची सहमती व्यक्त केली आहे. लोजपला यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

संजद भाजपपेक्षा सुमारे 15 ते 20 जागांवर निवडणूक लढवू इच्छित होता, परंतु भाजप नेते समान जागावाटपावर ठाम राहिल्यानेच हा मुद्दा प्रलंबित राहिला होता. अखेरीस जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. दीर्घ बैठकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

5 तास चालली बैटक

पाटणा येथे संजद आणि भाजप नेत्यांदरम्यान सुमारे 5 तासांपर्यंत बैठक चालली आहे. या बैठकीत भाजपच्या वतीने फडणवीस, यादव आणि संजय जायसवाल उपस्थित होते. तर संजदतर्फे ललन सिंग, आरसीपी सिंग आणि विजेंद्र यादव सामील झाले. दोन्ही पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघावर चर्चा झाल्यावरच निम्म्या जागांबद्दल सहमती झाली आहे.

पासवान यांची वेगळी भूमिका

या जागावाटपात लोकजनशक्ती पक्षाला पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहे. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वेगळय़ा भूमिकेमुळेच संजदला लोजप नकोसा झाला आहे. अशा स्थितीत भाजपने लोकसभेच्या धर्तीवर विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मान्य करत संजदने प्रत्येक मतदारसंघासंबंधी चर्चा करून सहमती व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील सूत्र

बिहारच्या एकूण 40 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप आणि संजदने प्रत्येकी 17 जागांवर निवडणूक लढविली होती. तर 6 जागा लोकजनशक्ती पक्षाला देण्यात आल्या होत्या.

तीन टप्प्यात निवडणूक

बिहारमध्ये 3 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱया टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱया टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. दिवाळी आणि छठदरम्यान नवे सरकार स्थापन होणार आहे.

Related Stories

अमली पदार्थ प्रकरणी अकाली नेत्यावर गुन्हा

Patil_p

ईयूमधील सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये कोविशिल्ड लसीला मंजूरी

Archana Banage

भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल; गुगलचे सुंदर पिचाईंचा इशारा

Archana Banage

तंबाखुजन्य पदार्थ, कार्सवरील अधिभार 2022 नंतरही कायम

Patil_p

देशात मागील 24 तासात 2.76 लाख नवे रुग्ण; मृतांच्या संख्येत किंचित घट

Tousif Mujawar

UP सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

datta jadhav