Tarun Bharat

राष्ट्रवादीत खदखद, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ?

पक्षाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत
अनेक तालुका व सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे
प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेण्याची गरज

कृष्णात चौगले / कोल्हापूर

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खदखद सुरु असून काही तालुका व सेलच्या पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये दोन दुर्गम तालुक्यातील कार्यकारीणीमधील कार्यकर्त्यांनी यापूर्वीच राजीनामे सादर केले आहेत. तर अजून काही तालुक्यतील कार्यकर्ते राष्ट्रवादीला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत. पक्ष सत्तेत नसताना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांच्याकडे आता पक्ष सत्तेत असताना जाणिवपूर्वक दूर्लक्ष केले जात असेल तर तळमळीने काम करून काय उपयोग ? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीकडे प्रामाणिक ‘मावळ्यांची’ उणिव भासणार आहे.

सत्ता नसताना कठीण काळात जे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ राहिले, पक्षाला सावरण्याचे काम केले, त्यांनाच सत्ता आल्यानंतर पद आणि मानसन्मान मिळेल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरपणे सांगितले होते. पण प्रत्यक्षात सत्तेच्या एक वर्षांच्या कालावधीत पक्षीय योगदान देणाऱया कार्यकर्त्यांना न्याय न देता केवळ नेत्यांच्या अवतीभोवती मिरवणाऱयांनाच सत्तेची ऊब मिळाली आहे. मग वर्षानुवर्षे संघटनात्मक बांधणीसाठी केलेल्या कामाची फलश्रुती काय ? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे `सावज टप्प्यात आले की कार्यक्रम’ करणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यापुढे तरी आमची खदखद जाणून घेणार का ? अशी विचारणा नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

शरद पवार यांचे ‘आजोळ’कडे विशेष लक्ष
सध्या राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत असल्यामुळे जिह्यातील नेत्यांभोवती पिंगा घालणाऱ्या कार्यकर्त्यांची उणिव भासत नाही. पण तळागाळात पक्ष रुजवणारे अनेक कायकर्ते नाराज झाले असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये त्यांची उणिव भासणार असल्याचे चित्र आहे. जिह्यातील या सर्व घडामोडी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काही तालुक्यांपुरता मर्यादित का राहिला ? ज्यांना अनेक महत्वाची पदे आणि खाती दिली, त्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले ? आणि आगामी काळात पक्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी काय करता येईल ? याची माहिती पवार यांनी आपल्या गोपनीय सुत्रांकडून घेतली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात जिल्हा राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमधील नाराजांचा काँग्रेसकडे कल
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी यंत्रणा गतीमान केली आहे. पक्ष बांधणीसाठी काम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी त्यांना `बळ’ दिले जात आहे. ही बाब राष्ट्रवादीमधील नाराज कार्यकर्त्यांना भावली असून आगामी काळात ते काँग्रेसच्या गोटात जाण्याच्या तयारीत आहेत.

भाजपवासी नेता पुन्हा राष्ट्रवादीत, `एम एम फॅक्टर’ होणार सुरु
राजाराम सहकारी साखर कारखाना आणि गोकुळ दुध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले पुर्वाश्रमीचे नेते लवकरच पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत. भाजपमध्ये राहून या दोन्ही संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी अनेक अडचणी असल्यामुळे त्या नेत्याकडून राष्ट्रवादीकडे फेऱ्या सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेतृत्वाकडूनही त्यांना लवकरच हिरवा कंदील दाखवला जाणार असल्याचे समजते. या नेत्याचा जिल्ह्यात स्वतंत्र गट असल्यामुळे आगामी राजकारणात त्याचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. त्याची दखल घेऊन अटी व शर्थी पुढे ठेवून त्या नेत्याच्या हातात लवकरच ‘घड्याळ’ बांधले जाणार आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर आणि `गोकुळ’ व `राजाराम’च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत पुन्हा `एम एम फॅक्टर’ सुरु होणार आहे.

Related Stories

जिल्हा बँकेसाठी मंत्री मुश्रीफांनी बजावला मतदानाचा हक्क

Abhijeet Khandekar

Kolhapur : तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर बनतंय गुटखा विक्रीचे केंद्र

Archana Banage

कळंबा बैलगाडी शर्यतीत हरण्याची बाजी

Abhijeet Khandekar

तेरा ऑक्टोबरपर्यंत ९५ टक्के लसीकरण पूर्ण करा

Archana Banage

सदर बाजार, विचारे माळ परिसरातील अवैध व्यवसाय बंद करा

Abhijeet Khandekar