Tarun Bharat

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या हजेरीत उत्तर रत्नागिरी सपशेल नापास!

Advertisements

प्रतिनिधी/ चिपळूण

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सावर्डे येथे तालुकावार आयोजित आढावा बैठकीवेळी घेतलेल्या हजेरीत उत्तर रत्नागिरीतील पदाधिकारी सपशेल ‘नापास’ झाले. कार्यकारिणी बैठका, तालुका दौरे या बाबत कुणालाच धड उत्तरे देता आली नाहीत. गोलगोल उत्तरे देणाऱयांनाही त्यांनी सर्वांसमक्ष फटकारले. शिवाय निवडून आलेल्या आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्याची बुध्दी कुणालाच का झाली नाही, या त्यांच्या प्रश्नावर चिपळुणातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांच्याही माना खाली गेल्या. 

   सावर्डे येथे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, संगमेश्वर आणि मंडणगड तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱयांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्र आढावा घेताना कार्यकारिणी, त्यातील सदस्य संख्या, एकूण बूथ, गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकूण पडलेली मते, पक्ष वाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम, शहरासह तालुक्यात केलेल्या बूथ कमिटय़ा आदींची माहिती घेतली. पाटील यांनी गुरुजींची भूमिका घेऊन चिपळूणचा आढावा घेत असतानाच इतर तालुक्यांच्या पदाधिकाऱयांना मात्र घाम फुटत होता.

चिपळूण, देवरूख पदाधिकाऱयांच्या माना खाली

पाटील यांनी चिपळूण तालुकाध्यक्षांना उभा करीत तालुका कार्यकारिणीची संख्या विचारली. त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीच्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत, याची हात वर करून माहिती घेतली. नेमके येथे 7 ते 8 सदस्य उपस्थित होते. ही जाहीर सभा नाही. फक्त कार्यकारिणी सदस्यांची बैठक आहे, फक्त गोलगोल फिरवू नका, देवरुख आणि संगमेश्वर दोन्ही कार्यकारिणीने आपल्या आमदारांचा सत्कार केला का, असा थेट प्रश्न करताच साऱयांच्या माना खाली झाल्या होत्या.  

 खेड, दापोलीत दोन भाईंच्या युतीत भाऊ पडले

खेड-मंडणगड दापोलीचा आढावा घेताना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेताना येथे आपण का कमी पडलो, असा सवाल पाटील यांनी केला असता पदाधिकाऱयांनी संजय भाऊ हे कॉंग्रेसचे भाई जगताप आणि दुसरे माजी पर्यावरण मंत्री अशा दोन भाईंच्या युतीमुळे पडले. शिवाय करोडो रुपये उडवले गेले आहेत. संघटना म्हणून आम्ही कुठे कमी पडलो, हेच समजत नाही. मात्र आम्ही पैशात कमी पडलो आहोत, असे पदाधिकाऱयांनी सांगितले. खेडच्या आमदारांनी तटकरेंविरोधात हक्कभंग दाखल केला असला तरी दाखल होईल असे काही नाही, असेही पाटील यांनी सांगितले. राजकीय केसेस काढण्याबाबत गृहमंत्र्यांबरोबरच माझ्याकडेही निवेदन द्या, मी प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले.

  बेटकरना झापले

भास्कर जाधवांना घाबरून सगळे बाजूला झाले. आम्ही ताकदीने उतरलो. मात्र प्रचारासाठी एकही वरिष्ठ नेता गुहागरमध्ये आला नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत त्यांना आम्ही पक्षाच्या बैठकीला बोलावतो. मात्र ते कोणीही येत नाहीत. त्यांना पक्षातून काढले पाहिजे, त्याना नोटीस दिली पाहिजे, आपल्या पक्षातून निवडून येऊन दुसऱया पक्षात ते मिरवत आहेत. उमेदवार म्हणून सहदेव बेटकर हे पराभूत होताच कुठे फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्त्याना त्यांनी वाऱयावर सोडल्याच्या भावना गुहागरातील कार्यकर्त्यानी मांडल्या. यावर बेटकर यांना यापुढे मतदार संघात फिरून कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या.

महिन्याला कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे

यावेळी पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्याना खडेबोल सुनावत पक्षवाढीच्या दृष्टीने सूचना केल्या. यापुढे दर महिन्याला कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे, अशा आढावा बैठकांना विषयपत्रिका आणली पाहिजे, असे सांगत बूथ कमिटी झाल्या पाहिजेत, किमान दोन हजार सदस्य या बूथ कमिटीचे पाहिजेत, लवकरच त्यांचे आपण प्रशिक्षण घेणार आहोत, आता आपले लक्ष्य 2024 असणार आहे, आमदार निवडून आले या भ्रमात कुणी राहू नका, पक्षाचे काम दिसले पाहिजे. काहीतरी उत्तरे देऊन वेळ मारून नेऊ नका, असा डोसही त्यांनी दिला.

 यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, संजय कदम, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर

Ganeshprasad Gogate

मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र ‘एक्सप्रेस वे’

Abhijeet Shinde

दोडामार्ग पोलिसांतर्फे नवरात्रोत्सवात खास उपक्रम

NIKHIL_N

आरोग्य, पोलीस, सफाई कामगारांचा युटय़ुब गौरव

Patil_p

गोवा विधानसभा : रिपब्लिकनचा काँग्रेसला पाठिंबा

Sumit Tambekar

पंतप्रधानांकडून लवकरच सरप्राईज पॅकेज!

NIKHIL_N
error: Content is protected !!