Tarun Bharat

राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची ठिणगी!

सोमय्या यांच्या मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोपानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांची मदार

संजीव खाडे/कोल्हापूर

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद आता जिल्हय़ातील राजकारणातही उमटू लागले आहेत. मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंदकांतदादा पाटील यांच्यात आरोप, प्रत्यारोप, सल्ला, इशारा देण्याचा शाब्दिक वाद रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातून नजीकच्या काळात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा नवा संघर्ष, वाद जिल्हय़ाच्या राजकारणात उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याची ठिणगी सोमय्यांच्या आरोपाने पडली आहे.

2019 मध्ये राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्याने मेरिटने पास झालेल्या (105 आमदार असूनही) देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्याचे परिणाम राज्याच्या आणि जिल्हय़ाच्या राजकारणावरही झाले. मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा यांच्यात जो आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे. त्यामागे राज्यातील सत्ताबदलाचेही एक कारण आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिमंडळातील दुसऱया क्रमांकाचे शक्तीशाली मंत्री असणारे चंद्रकांतदादा पाटील जिल्हय़ाचे पालकमंत्रीही होते. त्याकाळी सत्ता असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसह काही नगरपालिका भाजपकडे खेचून आणल्या. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जिल्हय़ात एकही आमदार निवडून आणता आला नाही. युती असूनही भाजप शून्य आणि शिवसेना एक असे बलाबल राहिले. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीची सरशी झाली. यामागे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नियोजन होते.

राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने कब्जा केल्यानंतर हळूहळू जिल्हय़ाच्या राजकारणावर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची पकड मजबूत झाली आहे. या उलट भाजपच्या हाती जिल्हय़ातील फारशी सत्ता केंद्रे नाहीत. केंद्रात असलेल्या सत्तेचा आधार घेत भाजप कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यांची मदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे.

सोमय्या यांच्या आरोपानंतर संघर्षाची ठिणगी
किरीट सोमय्या यांचे आरोप, त्यांच्या सोमवार 20 सफ्टेंबरच्या रोखलेल्या कोल्हापूर दौऱयाच्या वेळेचा हाय व्होल्टेज ड्रामा आणि त्यांचा पुन्हा कोल्हापूर दौऱयावर येण्याचा इशारा यामुळे जिल्हय़ाचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, भैय्या माने, आदील फरास, राजेश लाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरी भाषेत केलेला विरोध, घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यात वादावादी सुरु झाली आहे. नजीकच्या काळातील निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणारे राजकारण पाहता भाजपला राष्ट्रवादीशी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही.

चंद्रकांतदादांप्रमाणे महाडिक, घाटगे आक्रमक होणार?
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हय़ातील नेत्यांवर टीका केली होती. त्यांचा रोख हसन मुश्रीफ यांच्यावर होता. पण सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करणाऱया महाडिक यांनी मुश्रीफांवर टीका करताना संयम राखला होता. समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना थेट आव्हान दिले होते. जनतेच्या, शेतकऱयांच्या प्रश्नांवर घाटगे महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन, आरोप करत आहेत. आता भाजपची खिंड चंद्रकांतदादा पाटील लढवित असताना राष्ट्रवादी आणि मुश्रीफ यांच्या विरोधात महाडिक, घाटगे आक्रमक होणार काय?, यावर भाजपच्या कार्यकर्त्यांची मदार आहे.

Related Stories

”मोदी निर्भयाच्या कुटुंबाला भेटल्याचे फोटो प्रसिद्ध झाले मात्र राहुल गांधींना पीडित कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी पत्र”

Archana Banage

लसीकरणातील गोंधळ संपता संपेना

Patil_p

चीनच्या Helo Lite सह अन्य अ‍ॅप्सवरही भारत घालणार बंदी

datta jadhav

वारणेत उद्या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे मैदान

Kalyani Amanagi

गुळाच्या उकळत्या काहिलीत उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू

Archana Banage

युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Rohit Salunke