Tarun Bharat

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार रकमेत भरीव वाढ?

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

केंद्रीय क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्याच्या तयारीत असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर खेलरत्न पुरस्कार विजेत्यास 25 लाख तर अर्जुन पुरस्कार विजेत्यास 15 लाख रुपये मिळणार आहेत.

सध्या खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱयास 7.5 लाख रुपये तर अर्जुन पुरस्कार विजेत्यास 5 लाख रुपये दिले जातात. या प्रस्तावावरील काम अंतिम टप्प्यात असून क्रीडामंत्री किरेन रिजिजू 29 ऑगस्टपर्यंत त्या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्ट हा हॉकीचे जादुगार ध्यान चंद यांचा जयंती दिवस असून ते राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो आणि याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते.

‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ होणार असून त्याबाबतचा प्रस्ताव याआधीच मांडण्यात आला आहे. अनेक क्रीडापटूंनी बक्षिसादाखल दिली जाणारी रक्कम फारच अपुरी असल्याची तक्रार केल्यानंतर क्रीडामंत्र्यानीच त्याबाबत पुढाकार घेतला आहे,’ असे क्रीडा मंत्रालयातील सूत्राने सांगितले. सदर प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून केंद्राने त्याला मान्यता दिल्यास या वर्षापासूनच वाढीव बक्षीस रक्कम दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र क्रीडा सचिव रवि मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

ध्यान चंद व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांच्या बक्षीस रकमेतही वाढ केली जाणार असून त्यांना 5 ऐवजी 15 लाख रुपये दिले जातील. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यास नव्या प्रस्तावानुसार 10 लाख रुपये मिळणार आहेत. 29 ऑगस्टआधीच या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास यावेळी केंद्रावर मोठा खर्च करण्याची वेळ येणार आहे. कारण विविध राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड समितीने तब्बल 62 क्रीडापटूंची शिफारस केली आहे.

Related Stories

ब्रिग्टनकडून लिव्हरपूलला पराभवाचा धक्का

Patil_p

जिम्नॅस्ट प्रणती नायक ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष सुधारित कामगिरीवर

Patil_p

भारताचा 7 गडय़ांनी विजय, शॉ सामनावीर

Patil_p

भारत-दक्षिण आफ्रिका आज चुरशीची लढत

Patil_p

लाल मातीचं ऑस्कर

datta jadhav