Tarun Bharat

राष्ट्रीय पुरस्कार शिफारस प्रक्रियेत मुदतवाढ

खेळाडूंना स्वतः अर्ज करण्याचीही सवलत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 22 जूनपर्यंत वाढवली असून याचप्रमाणे खेळाडूंना स्वतःहून अर्ज दाखल करण्याची सवलत देखील दिली आहे. कोव्हिड-19 मुळे शिफारस देणाऱया व्यक्ती-संघटनेपर्यंत पोहोचण्यात ‘अडचण’ येत असल्यास खेळाडू स्वतः अर्ज करु शकतील, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

यापूर्वीच्या रुपरेषेप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत बुधवारपर्यंत होती. त्यानंतर आणखी अर्ज करणे शक्य होणार नव्हते. पण, क्रीडा मंत्रालयाने मुदतवाढ केली असल्याने ज्या खेळाडूंना अद्याप अर्ज करणे शक्य झाले नव्हते, त्यांना पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.

‘देशभरात लॉकडाऊन असल्याने शिफारस मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संघटनेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे इच्छुक खेळाडूंसाठी अवघड होते. त्यामुळे, यंदा शिफारस न घेता थेट अर्ज करण्याची मुभा आम्ही खेळाडूंना देत आहोत. या परिस्थितीत अर्जातील शिफारशीची जागा रिकामी ठेवता येईल’, असे मंत्रालयाने पत्रकातून नमूद केले. यंदा कोव्हिडमुळे मंत्रालयाने फक्त ईमेलद्वारेच अर्ज मागवले आहेत.

प्रतिष्ठेचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी दि. 29 ऑगस्ट रोजी शाही सोहळय़ात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. 29 ऑगस्ट हा हॉकीचे जादूगर ध्यान चंद यांचा जन्मदिवस असून तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनही साजरा केला जातो.

ज्यांना संघटनेचा पाठिंबा नाही, त्यांनाही अर्ज करण्याची संधी

यापूर्वीच्या अटी व शर्तीनुसार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी शिफारशीशिवाय अर्ज करणे शक्य नव्हते. अर्जावर शिफारस करणाऱया राष्ट्रीय फेडरेशनचा उल्लेख करणे सक्तीचे होते. राष्ट्रीय फेडरेशन, क्रीडा कार्यकारिणी व माजी पुरस्कार जेत्यांचा नामोल्लेख आवश्यक होता. पण, आता फेडरेशनच्या शिफारशीशिवाय स्वतः खेळाडूही अर्ज करु शकणार असल्याने इच्छुकांसाठी कोणतीही अडचण असणार नाही. ज्या खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनने शिफारस केली नाही किंवा ज्या खेळाडूंना मागील पुरस्कार जेत्यांचे पाठबळ नाही, अशा खेळाडूंसाठी ही सवलत विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

Related Stories

बेल्जियमचा गोफिन अजिंक्य

Patil_p

कसोटीचेही नेतृत्त्व रेहितकडे

datta jadhav

झेकमध्ये पुढील आठवडय़ात प्रेक्षकांच्या उपस्थितीत टेनिस स्पर्धा

Patil_p

जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून अँडी मरेची माघार

Patil_p

रुमानियाची हॅलेप उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p