Tarun Bharat

‘रिपिटर्स’ही परीक्षेविना उत्तीर्ण

Advertisements

राज्य सरकारचा निर्णय : उच्च न्यायालयात स्पष्टीकरण : बारावीच्या निकालासाठी मार्गसूची

प्रतिनिधी /बेंगळूर

बारावीच्या रिपिटर्स विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विषयनिहाय 35 टक्के गुण देऊन या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येईल, असे सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी मार्गसूची जारी केली आहे. या मार्गसूचीनुसार जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थी समाधानी नसतील तर त्यांना पुढील परीक्षेला बसण्याची संधी असणार आहे, असेही शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर रिपिटर्स विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारच्या भूमिकेविरोधात बारावी रिपिटर्स विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आपल्यालाही परीक्षेशिवाय उत्तीर्ण करावे किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे न्यायालयाने सरकारला यासंबंधी स्पष्टपणे निर्णय घ्यावा, अशी सूचना दिली होती. त्यामुळे सरकारने तज्ञ आणि अधिकाऱयांची समिती नेमून अहवाल मागविला होता.

सोमवारी सदर याचिकेवरील सुनावणीवेळी राज्य सरकारने आपले म्हणणे मांडले असून 2020-21 या वर्षात नोंदणी केलेल्या बारावीच्या सर्व रिपिटर्स विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण असलेल्या विषयांना 35 गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. त्यामुळे नियमित (पेशर्स) विद्यार्थ्यांप्रमाणेच रिपिटर्स विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

ग्रेडऐवजी गुण देणार

बारावीची परीक्षा रद्दची घोषणा करण्यात आल्यानंतर बारावी विद्यार्थ्यांना ग्रेड स्वरुपात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुढील शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अनुकूल व्हावे यासाठी गुणांच्या स्वरुपात निकाल घोषित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दहावी, अकरावी, ग्रेस गुणांच्या आधारे निकाल

2020-21 या वर्षातील बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने रिपिटर्स विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करावे का?, निकाल तयार करण्यासाठी कोणते निकष असावेत?, याबाबत निर्णय घेण्यासाठी 12 तज्ञ आणि अधिकाऱयांची समिती नेमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करावा लागणार आहे. बारावी परीक्षा रद्द करण्यात आल्याने सरकारने दहावी परीक्षेत मिळालेले आणि अकरावीतील गुण आणि ग्रेस मार्कांच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याने मार्गसूचीमध्ये स्पष्ट केले आहे. खात्याच्या सचिव पद्मिनी एस. एन. यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार

बहिस्थ (एक्सटर्नल) विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्यासाठी अकरावीतील कोणत्याही प्रकारची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा परीक्षा न झाल्यास पुढील वर्षी परीक्षा घेतली जाईल. बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी 31 ऑगस्टपूर्वी परीक्षा घेऊन 20 सप्टेंबरपूर्वी निकाल जाहीर करावा, अशी न्यायालयाने सूचना दिली आहे.

असे देणार गुण

  • प्रेशर्स विद्यार्थ्यांना एस.एस.एल.सी. किंवा इतर बोर्डांच्या दहावी परीक्षेत मिळालेल्या विषयनिहाय गुणांपैकी 45 टक्के गुण, अकरावी वार्षिक (प्रथम पीयुसी) परीक्षेत मिळालेल्या गुणांपैकी 45 टक्के गुण, बारावीतील विविध शैक्षणिक उपक्रमातील 5 टक्के गुण आणि अकरावीतील 5 टक्के ग्रेस मार्क यांचे एकत्रिकरण करून विषयनिहाय निकाल जाहीर केला जाणार आहे.
  • रिपिटर्स विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी असणारे किमान गुण आणि विषयांसाठी असणाऱया कमाल गुणांपैकी 5 टक्के ग्रेस मार्क द्यावेत.
  • वरील पद्धतीने देण्यात आलेले गुण मान्य नसेल तर विद्यार्थ्यांना पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून पुढील दिवसांत घेण्यात येणाऱया बारावी परीक्षेला हजर होता येणार आहे.

Related Stories

केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यातून तिघे प्रयत्नशील

Amit Kulkarni

बेंगळूर: ३८ परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य; तपासणी दरम्यान सापडले ड्रग्ज आणि गांजा

Abhijeet Shinde

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni

महाराष्ट्रातून येणाऱयांसाठी आरटीपीसीआर सक्ती रद्द

Amit Kulkarni

लाळय़ा खुरकत नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना

Amit Kulkarni

बेंगळूर: आरपीएफने रेमडेसिवीर चोरीप्रकरणी ४ रेल्वे कर्मचाऱ्यांना केली अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!