Tarun Bharat

रुग्णसंख्या ‘शंभरी’पार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतात कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. देशातील संक्रमित रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली असून 13 राज्यात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रविवार सायंकाळपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 33 रुग्णांची नोंद झाली असून पुण्यात सर्वाधिक 16 रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सावध झाली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बऱयाच ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 21 राज्यात शाळा आणि महाविद्यालये काही कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत शेजारील देशांचा प्रवास बंद करण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र सीमेवरील मोजक्मयाच पोस्टवर अत्यावश्यक गरजांसाठी वाहतूक सुरू राहणार असल्याची स्पष्टोक्तीही देण्यात आली आहे. भूतान, नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार या देशांमधून रस्तामार्गे होणारी प्रवासी वाहतूक 15 मार्च मध्यरात्रीपासून तर पाकिस्तानबरोबरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक 16 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत सध्या देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण केरळात आढळले आहेत. ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होत आहे त्यांना घरी सोडण्यात येत आहे. देशाच्या विविध भागात जवळपास 11 रुग्णांची प्रकृती ठीकठाक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विषाणूचा प्रसार वाढत असल्यामुळे सर्व राज्यांनी हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. दरम्यान, बुलढाणा येथील मृत संशयित रुग्णाचा अहवाल उपलब्ध झाला असून तो ‘निगेटिव्ह’ असल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

चार राज्यांकडून कोरोना ‘साथीचा रोग’ जाहीर

केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. तसेच चार राज्यांनी कोरोनाला ‘साथीचा रोग’ जाहीर केले आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड तसेच गुजरातचा समावेश आहे. दिल्लीत सध्या सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट पसरलेला दिसत आहे. शाळा-महाविद्यालय-विद्यापीठांसह चित्रपटगृहे बंद आहेत. लोकांना गरज नसताना घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

कर्तारपूर कॉरिडोर, अंदमानही ठप्प

कोरोनाचा धोका लक्षात घेत कर्तारपूर कॉरिडोरही बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येथील यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अंदमान निकोबार बेटांवरील प्रशासनाने 17 मार्च ते 26 मार्च या कालावधीत पर्यटनविषयक सर्व कामे बंद केली आहेत. पर्यटकांना अंदमान निकोबार भेट रद्द करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इराणमध्ये अडकलेले 236 भारतीय मायदेशी

इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीत जगणाऱया 236 भारतीयांना रविवारी मायेदशी आणण्यात आले. या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी शुक्रवारी 44 प्रवाशांना इराणहून भारतात आणण्यात आले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली. तसेच त्यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे तेथे गेलेले भारतीय मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे. भारतात आलेल्या 236 जणांसह त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

जगातील बळींचा आकडा 6 हजार पार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 6 हजारच्या पुढे पोहोचल्याची माहिती रविवारी ‘एएफपी’च्या हवाल्याने जारी करण्यात आली. 6, 036 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 1 लाख 59 हजार 844 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3 हजार 199 जण ठार झाले असून स्पेनमध्ये 105 जणांचा बळी गेला आहे. युरोपमध्ये या रोगाचा प्रसार वेगाने होत असून इटलीमध्ये सर्वाधिक 1 हजार 907 जण ठार झाले आहेत.

Related Stories

देशात 38,772 बाधित; 443 मृत्यू

datta jadhav

झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ला अनुमती

Patil_p

एकमेव ‘गड’ राखण्याचे डाव्यांसमोर आव्हान

Patil_p

लोकांच्या उपयोगाची उत्पादने निर्माण करा !

Patil_p

गुजरात दंगल, 17 दोषींना मिळाला जामीन

Patil_p

तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

Patil_p