Tarun Bharat

रूग्णवाढ सुरू पण मृत्यूचे प्रमाण अल्प

Advertisements

जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दोन मृत्यू

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हय़ात गुरूवारी रात्री आलेल्या अहवालात 242 रूग्ण बाधित आले असून 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात एकाचा मृत्यू झाला आहे. जानेवारीच्या प्रारंभापासून रूग्णांचे आकडे पुन्हा वाढू लागले असले तरी मृत्यूचे प्रमाण अल्प असल्याचा दिलासा आहे. मुंबईसह मोठय़ा शहरात ओमिक्रॉनचे संकट गडद होऊ लागल्याने लागू होणाऱया निर्बंधांची धास्ती जिल्हय़ाला लागली आहे.

जानेवारी महिन्यात केवळ दोन मृत्यू

जानेवारी महिन्याच्या प्रारंभापासून रूग्णवाढ होऊ लागली आहे. दोन आकडी रूग्णांचे प्रमाणे शुक्रवारी 242 इतके झाले होते. पॉझिटिव्हीटी 5.17 टक्के झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात 841 रूग्ण वाढले असून केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर घटल्याचा दिलासा आहे.

निर्बंधांकडे जिल्हय़ाचे लक्ष

मुंबई-पुणेसह मोठय़ा शहरात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागला आहे. तुर्तास लॉकडाऊन करणार नसल्याने शासनाकडून सांगितले जात असले तरी निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निर्बंधांकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. जिल्हय़ात अजूनपर्यंत ओमायक्रॉनचे रूग्ण प्रमाण अल्प आहे.

साताऱयात 61 रूग्ण

जिल्हय़ात गुरूवारी रात्री आलेल्या अहवालात 242 रूग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रूग्ण सातारा आणि कराडमध्ये वाढले आहेत. गेल्या चोवीस तासात आढळलेले तालुकानिहाय रूग्ण व एकूण रूग्ण पुढीलप्रमाणे-जावली 14 (10,108), कराड 45 (39,428), खंडाळा 10 (14,276), खटाव 8 (26,004), कोरेगाव 5 (22027), माण 4 (18,119), महाबळेश्वर 21 (4,814), पाटण 12 (10,183), फलटण 22 (37,641), सातारा 61 (52,498), वाई 22 (15,867), इतर 13 (2,268) असे रूग्ण आढळले आहेत.

ग्रामदक्षता समित्या कार्यान्वित करण्याचे आदेश

संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामदक्षता समित्या कार्यान्वित करण्याचे आदेश जारी केले. संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह 10 जणांचा या समितीत समावेश असणार आहे. यापूर्वीच्या दोन लाटांमध्येही या समित्यांनी संसर्ग रोखण्यासाठी योगदान दिले आहे.  गावपातळीवर बाधितांचे विलगीकरण करण्यासह संसर्ग वाढू न देण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे दिल्यास कारवाई

औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिक्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेडय़ुल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. स्टेरॉइडस, गर्भपातावरील औषधे ऍन्टीबायोटीक्स आदी औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जाऊ नयेत, यासाठी औषध दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

error: Content is protected !!