Tarun Bharat

रॅली-सभांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम

निवडणूक आयोगाचा निर्णय : घरोघरी प्रचारासाठी 5 ऐवजी 10 जणांना अनुमती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत जाहीर प्रचारसभा, मिरवणुका आणि रोड शो यावर निर्बंध कायम ठेवण्याचे मान्य केले आहे.  ही बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात मतदान होणाऱया क्षेत्रांमध्ये आयोगाने घरोघरी (डोअर टू डोअर) प्रचारासाठी लोकांची संख्या 10 पर्यंत वाढवली आहे. पूर्वी केवळ पाच जणांनाच अनुमती होती.

निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. निवडणुकीची घोषणा करतानाच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून 15 जानेवारीपर्यंत रॅलींवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मागील आठवडय़ात ही बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिवांसह राज्यांमधील काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. निवडणूक राज्यांमधील कोरोनाच्या संसर्गस्थितीबाबत माहिती आणि आढावा घेण्यात आला. त्यानंतर गेल्या सात दिवसात निवडणूक राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचेच निरीक्षण नोंदवले. ईशान्येकडील मणिपूर राज्यात दैनंदिन प्रकरणांमध्ये 266 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे ‘अनलॉक’ करण्यास सर्वांनीच नकार दर्शवला. त्यानंतर आता 31 जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा ‘जाहीर प्रचारबंदी’ला मुदतवाढ देण्यात आली आहे.

इतर प्रचारात्मक पद्धतींवर सूट

आयोगाने प्रचाराच्या इतर पद्धतींमध्ये काही शिथिलता दिली आहे. इनडोअर सभेसाठी सभागृहाच्या क्षमतेनुसार 500 किंवा 50 टक्केपर्यंत मान्यता असते. मात्र ही सभा घेण्यापूर्वी जिल्हा निवडणूक आयोगाची मान्यता घेणे बंधनकारक राहणार असून, नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रचारालाच अधिक प्राधान्य देण्याची सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे.

10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात

उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारीला उत्तराखंड आणि गोव्यात एकाचवेळी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला, तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होणार आहे. सर्व राज्यांमधील मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

Related Stories

देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश?

datta jadhav

देशात विक्रमी डिस्चार्ज

Patil_p

विरोधकांचे केवळ स्वार्थापोटी ‘सेल्फ गोल’

Amit Kulkarni

गैर-मुस्लिमांना प्रवेश देणाऱया मदरशांच्या चौकशीचे आदेश

Patil_p

पंतप्रधान मोदी सुरक्षा त्रुटीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Patil_p

कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

Omkar B