Tarun Bharat

‘रेडिओ म्युझिक मिरची’वर प्रीतेश-मीतेशची छाप

‘सिंधुदुर्गकर’ संगीतकार जोडी : ‘मेमरीकार्ड’मधील गाण्यांसाठी ‘बेस्ट अल्बम ऑफ डिकेड’ पुरस्कार

स्वप्नील वरवडेकर / कणकवली:

प्रतिथयश संगीतकार जोडी प्रीतेश – मीतेश अर्थात प्रीतीश कामत व ऍड. मीतेश चिंदरकर या सिंधुदुर्गकर सुपुत्रांच्या ‘म्युझिक’ची नोंद अखेर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱया ‘रेडिओ म्युझिक मिरची’ने देखील घेतली. या जोडीने तीन वर्षांपूर्वी निर्मिती, दिग्दर्शनासह संगीतबद्ध केलेल्या ‘मेमरीकार्ड’ चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांना ‘बेस्ट अल्बम ऑफ डिकेड’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सोमवारी बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

वास्तविक गेल्या दहा वर्षांत सैराट, लयभारी, व्हेंटिलेटर, दुनियादारी असे दर्जेदार चित्रपट होऊन गेले. त्यातील उत्तमोत्तम गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. अर्थात ही गाणी व त्यांचे तगडे संगीतकार स्पर्धेत असतानाही या सिंधुदुर्गकर सुपुत्रांनी त्यांना मात देत ‘बेस्ट अल्बम ऑफ डिकेड’ पुरस्कारावर नाव कोरले. पुरस्कार वितरणप्रसंगी तेथे उपस्थित असलेले स्पेशल ज्युरी तथा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्यासह प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन, प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांच्यासारख्या दिग्गजांनीही प्रीतेश- मीतेशचे कौतुक केले. अर्थात ही अचाट कामगिरी सिंधुदुर्गासारख्या ग्रामीण भागातील युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कलर्स मराठी वाहिनीवर 4 एप्रिलला दुपारी 12 वा. व सायंकाळी 7 वा. होणार आहे.

तीन वर्षांपूर्वीचा ‘मेमरीकार्ड’

प्रीतेश – मीतेश 2014 पासून एकत्र असून आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी, अल्बमची निर्मिती केली आहे. 2016 च्या सुमारास त्यांनी चित्रपट निर्मितीत उतरण्याचा धाडसी निर्णय घेत ‘भिकू’ या मालवणी चित्रपटाची निर्मिती केली. ‘भिकू’च्या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळाल्याने त्यांनी ‘मेमरीकार्ड’च्या निर्मितीस प्रारंभ केला. चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शनही याच जोडीने केले. 2 मार्च 2018 या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

पाच गाण्यांचा ‘मेमरीकार्ड’

चित्रपटात पाच गाणी असून त्यातील ‘आंब्या तुझो टाळ टाळ मोडून रथ सजविला… गणपती देवा तुझी झाली करुणा’ हे ‘बाप्पा साँग’ प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी गायिले असून हे गीत तरंदळे (ता. कणकवली) येथील शाम सामंत यांनी लिहिले आहे. ‘ऋणझुण’ हे गीत स्पृहा जोशी यांनी लिहिले असून प्रसिद्ध पार्श्वगायीका महालक्ष्मी अय्यर यांनी गायिले. उल्लेखनिय म्हणजे उर्वरित तीन गाणी दस्तुरखुद्द प्रीतेश – मीतेश यांनीच लिहिली आहेत. यातील एक ‘लव्ह साँग’ जावेद अली यांनी, ‘डोळय़ातल्या आसवांना थांबायला सांगा’ हे ‘सॅड साँग’ सायली पाटील यांनी तर ‘क्लिक साँग’ फोंडाघाट (ता. कणकवली) येथीच गायिका मयुरी नेवरेकर हिने गायिले आहे.

व्हरायटी ऑफ साँग

याबाबत दै. ‘तरुण भारत’शी बोलताना ऍड. मीतेश चिंदरकर म्हणाले, ‘मेमरीकार्ड’च्या माध्यमातून आम्ही गाण्यांचे परिपूर्ण ‘पॅकेज’ रसिकांना दिले. पाचही गाण्यांमध्ये वैविध्यता आहे. सर्व गाणी ‘स्टार्ट टू एंड’ ऐकण्यासारखी आहेत. वास्तविक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला आम्ही पुरस्काराच्या आशेने गेलो नव्हतोच. कारण, तेथे राज्यभरातील दिग्गज बसलेले होते, असे ते म्हणाले.

अनपेक्षीत, पण, सुखद यश

या जोडीतील प्रीतेश अर्थात प्रीतीश कामत म्हणाले, वास्तविक ‘म्युझिक मिरची ऍवॉर्ड’मध्ये ‘नॉमिनेशन’ मिळणे हिच आमच्यासाठी ‘शॉकिंग न्युज’ होती. वितरण कार्यक्रमात अंतिम समयी ‘बेस्ट अल्बम ऑफ डिकेड’ या पुरस्काराठी आमच्या नावाची घोषणा झाली. आमच्यासाठी हे काहीसे अनपेक्षीत पण, सुखद यश आहे.

अजय – अतुल अन् प्रीतेश – मीतेश

या पुरस्काराबद्दल देशातील प्रसिद्ध मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनीही प्रीतेश-मीतेश यांचे कौतूक केले. या युवा जोडीकडून यापुढेही खूप अपेक्षा असल्याचे अतुल गोगावले म्हणाले. तर देशात जसे अजय-अतुल जोडीचे नाव आहे. तसेच नाव प्रीतेश-मीतेश जोडीचे होईल, अशा शब्दांत अजय गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

सांगेली सेवा सोसायटी अध्यक्षपदी पुरुषोत्तम राऊळ तर उपाध्यक्षपदी अंतोन रॉड्रिक्स

Anuja Kudatarkar

पूरग्रस्त टपरीधारकांना मोठा दिलासा!

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : पेढांबे खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर वाळू उपसा

Archana Banage

मंगला, नेत्रावती धावली, मात्र काहींची निराशा

NIKHIL_N

दापोलीत 65, मंडणगडात 83 टक्के मतदान

Patil_p

जिल्हय़ातील 115 गावे ‘ओडीएफ प्लस’ जाहीर

NIKHIL_N
error: Content is protected !!