Tarun Bharat

रेल्वेतून येणाऱयांमुळे गोव्याला धोक्याची घंटा

स्थानिकांमध्ये सरकाराबद्दल संताप : सरकार कोरोना लादत असल्याची टीका : त्वरित योग्य निर्णय घेण्याची गरज

प्रतिनिधी / पणजी

प्रवासी रेल्वे वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सुरू झालेली वाहतूक, औद्योगिक साहित्याची वाहतूक व शेजारील राज्यातून येणारी छोटी वाहने या सर्वांमुळे गोवा धोक्यात आला आहे. त्यामुळे आता गोव्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढलेले रूग्ण गोव्याबाहेरुन आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात  गोमंतकीयांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने गोव्याच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

दिल्लीतून गोव्यात येणारे लोंढे थांबले नाही तर त्याची मोठी किंमत गोव्याला मोजावी लागेल. सरकार स्वतःच्या निर्णयांतून गोमंतकीयांवर कोरोना लादत असल्याची टीका जनमानसातून होऊ लागली आहे.

गोमंतकीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता  

दिल्ली रेड झोनमध्ये आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशावेळी गोवा सरकारने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन 4 मध्ये केंद्र सरकारने अनेक बंधने शिथिल केली आहेत, मात्र गोव्यासारख्या छोटय़ा राज्याला व काही प्रमाणात सुरक्षित असलेल्या राज्याला ही शिथिलता धोक्याची ठरू शकते, याबात स्थानिक गोमंतकीयांमध्ये बरीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 गोवा ग्रीन झोनमध्ये असतानाच याबाबत मोठी काळजी घेण्याची गरज होती. गोव्याने काही प्रमाणात आणलेली शिथिलता आज गोव्यासाठी घातक ठरली आहे. गोव्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण केवळ चार दिवसातच 20 पेक्षा जास्त झाले. हा आकडा झपाटय़ाने वाढू लागल्याने आता गोव्याच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दिल्ली-गोवा रेल्वे आणि अवजड वाहतूक धोकादायक

दिल्ली-गोवा रेल्वेमुळे गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या रेल्वेला गोव्यातील थांबा गोव्याला कोरोनाच्या खाईत लोटणार अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. काल सुरू केलेल्या कोविड-19 चाचण्या आणखीनही भयावह निकाल देण्याची शक्यता आहे. ट्रू नेट चाचणीमध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीतीही आता व्यक्त होऊ लागली आहे. रेल्वेतून येणारे प्रवासी पॉझिटिव्ह ठरत आहेत. यामुळे दिल्ली-गोवा रेल्वे गोव्यासाठी घातक ठरत आहे.

रेल्वेबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज

दिल्ली-गोवा रेल्वेतून येणाऱया प्रवाशांची संख्या व कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण पाहता दिल्ली-गोवा रेल्वे गोव्यासाठी घातक ठरत आहे. आणखी काही काळ रेल्वेतून गोव्यात प्रवासी वाहतूक झाल्यास गोवा रेड झोनमध्ये येण्याची शक्यता आहे. या रेल्वेमुळे गोवा विकतचे दुखणे घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोवा सरकारने या रेल्वेबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. या रेल्वेतून येणाऱया गोमंतकीयांची संख्या नगण्य आहे, तर दिल्लीकर जास्त प्रमाणात येत आहेत.

गोवा बनतेय बिगरगोमंतकीयांचे क्वारंटाईन होम

चारच दिवसात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता गोवा धोक्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. गोवा हे गोव्याबाहेरील कोरोनाबाधितांचे क्वारंटाईन केंद्र बनू लागले आहे. परराज्यातील लोकांना गोव्यात आणायचे व त्यांची चाचणी पॉझिटिव्ह ठरताच त्यांना क्वारंटाईन करायचे हा प्रकार आश्चर्यकारक आहे. गोव्याच्या सुरक्षेबाबत कोणातही निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. दिल्ली-गोवा रेल्वे गोव्यासाठी घातक ठरत असेल तर त्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. गोव्यातील थांबा रद्द करावा, असा निर्णय सरकार घेऊ शकते.

पेड क्वारंटाईन टुरिझम सुरू आहे का? गोव्यात सध्या पेड टुरिझम क्वारंटाईन सुरू केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. रेड झोनमधील दिल्लीवाले सध्या कोरोनापासून मुक्त राहण्यासाठी गोव्यात पेड टुरिझम क्वारंटाईनचा आधार घेत आहेत. गोवा सुरक्षित असल्याने गोव्याचा आधार हे लोक घेत आहेत. दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील काही हॉटेल्समालकांनी हे पेड क्वारंटाईन टुरिझम सुरू केले आहे. तशी जाहिरात सुरू असल्याने दिल्ली-गोवा रेल्वेतून मोठय़ा प्रमाणात प्रवासी येत आहेत.

Related Stories

कोरोना : 456 बाधित, 16 बळी

Amit Kulkarni

वाळपई पोलिसांची मेळावलीत दडपशाही

Patil_p

गोव्याच्या समृद्धीसाठी भाजपाला हॅट्ट्रिकची संधी द्या : जे. पी.नड्डा

Amit Kulkarni

खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली

Patil_p

मार्च अखेरपर्यंत म्हणणे सादर करा

Amit Kulkarni

निवडणूक ‘अजेंडा’ म्हणून विकासप्रकल्पांना विरोध

Patil_p