Tarun Bharat

रेल्वेतून येणाऱया बिगर गोमंतकीयांची चाचणी, कोरोंटाईन सशुल्क

Advertisements

प्रत्येकी 2000 रुपये चाचणी शुल्क : 500 प्रवाशांचे गोव्यात येण्यासाठी बुकिंग

मंत्रिमंडळाचे अन्य महत्वाचे निर्णय

  • कामगारांना बारा तासांपैकी चार तास ओव्हरटाईम
  • लेखा, आरोग्य खात्यात पदे भरण्यास मंजूरी
  • अनेक अधिकाऱयांना मुदतवाढ
  • कोरोना नियंत्रणासाठीच्या 1.54 कोटी खर्चाला मान्यता

प्रतिनिधी / पणजी

दिल्ली-गोवा प्रवासी रेल्वेने गोव्यात येणाऱया बिगर गोमंतकीय प्रवाशांना 2000 रुपये भरून स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. अगोदर त्यांना गोव्यात कोरंटाईन होण्यासाठी हॉटेल किंवा घरात जागा उपलब्ध करावी लागेल. न पेक्षा पैसे भरून सरकारी जागेत कोरंटाईन व्हावे लागेल. केंद्र सरकारने रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने गोवा सरकार त्याला अडवू शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यात येण्यासाठी आतापर्यंत 500 प्रवाशांनी बुकिंग केले असल्याचेही ते म्हणाले.

या रेल्वेने जे गोमंतकीय येतील त्यांना चाचणीचे पैसे भरावे लागणार नाहीत, मात्र जे बिगरगोमंतकीय येतील त्यांना पैसे भरावे लागतील. मौजमजा करण्यासाठी गोव्यात यायची गरज नाही. कारण सध्या गोव्यात हॉटेल, किनारे बंद आहेत. लोकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने पॉईंट टू पॉईंट रेल्वे गाडय़ा सुरू केल्या आहेत. दिल्लीतून गोव्यात 16 मे रोजी राजधानी एक्स्प्रेस गाडी येणार आहे. या गाडीला ठराविक थांबे असतील.

अहवाल येईपर्यंत प्रवाशांना फातोर्डा स्टेडियमवर ठेवणार

गोव्यात एकाच ठिकाणी ही गाडी मडगाव येथे थांबणार आहे. जे प्रवासी उतरतील त्यांना जिल्हा इस्पितळात नेऊन त्यांची चाचणी करण्यात येईल. चाचणीचा अहवाल येईपर्यंत सहा तास या प्रवाशांना फातोर्डा स्टेडियमवर ठेवण्यात येणार आहे. अहवाल नकारात्मक आला तर पाठविणार व पॉझिटिव्ह आला तर कोविड इस्पितळात पाठविले जाणार आहे. गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार सर्व काळजी घेणार आहे. विमानाने जे प्रवासी येतील त्यांची चाचणी करून अहवाल येईपर्यंत त्यांना विमानतळावरच ठेवण्यात येणार आहे. मुरगाव बंदरात येणाऱयांनाही चाचणी करून अहवाल येईपर्यंत सहा तास बोटीतच ठेवले जाणार आहे.

कोरोनामुळे गोव्यात एकही मृत्यू नाही

गोव्यात एकाही कोरोना संशयिताचा मृत्यू झाला नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. संशयित म्हणून दाखल केलेले जे रुग्ण मृत्यू पावले ते कोरोनाबाधीत नव्हते. त्यांच्या तीन चार चाचण्या केल्या एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या चाचण्याही केल्या. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास तो लपविता येणार नाही. कारण त्याचा परिणाम इतर रुग्णांवर होऊ शकतो. अफवांवर विश्वास कुणीही ठेऊ नये. दिवसाला 1000 चाचण्या करण्याच्या क्षमेतेची यंत्रणा सज्ज आहे. सध्या दिवसाला 500 पर्यंतच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कामगारांना 12 तासापैकी 4 तास ओव्हरटाईम

केंद्र सरकारच्या अनेक निर्णयानांही मंत्रिमंडळ बैठकीत अधिसूचित करण्यात आले आहे. उद्योगांमध्ये 12 तास करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी यापैकी 8 तास कामाचे व 4 तास ओव्हरटाईम द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर वाहतूक सुविधाही पुरवावी लागणार आहे. पेंद्र सरकारने व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांना मंत्रिमंडळाने व्यावसायिकदृष्टय़ा मान्यता दिलेली आहे. अनेक विदेशी कंपन्या भारतात व गोव्यात उद्योग स्थापन करण्याच्या तयारीत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाबाबत 1.54 कोटी खर्चाला मान्यता

लेखा संचालनालयात 35 जागा भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. गोमेकॉमध्ये फिजिओ थेरपिस्टच्या दोन जागा व रेडिओ थेरपिस्टच्या दोन जागा भरण्यास मान्यता दिलेली आहे.

कोरोनासंदर्भातील 1.54 कोटी रुपये खर्चालाही मान्यता दिलेली आहे. मोपा विमानतळ विभागात नागरी कुशल विकास केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. सरकारी सेवेतील काही अधिकाऱयांना सेवा मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी महसूल 80 टक्क्याने घटला

सरकारी तिजोरीत येणारा महसूल 80 टक्क्यांनी घटल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. जीएसटी, व्हॅटमधून मिळणारा महसूल घटला आहे. मोटारसायकल पायलट, टॅक्सी, रिक्षा चालकांना दोन महिने धंदा मिळालेला नाही. त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. सरकारला त्यांना मदत करायची इच्छा आहे, पण तिजोरीत पैसे नाहीत. एसी लावून झोपणारे लोक वीज बील आणि पाणी बील माफ करण्याची मागणी करतात. त्यांना बील माफी का द्यावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे देशभरातील विविध क्षेत्रांना मोठी मदत मिळणार आहे. गोव्यासाठीही मोठी मदत होणार आहे. विविध खात्याचे सचिव व संबंधितांना प्रस्ताव तयार करण्याची सूचना आपण केली आहे. नंतर हे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

घनश्याम शिरोडकरांच्या तीन अर्जांमुळे वेगळे वळण

Amit Kulkarni

लाईनमनना वाढीव विमा व नोकरीची सुरक्षा देणार

Amit Kulkarni

जमशेदपूर एफसी- बेंगलोर लढत गोलशून्य बरोबरीत

Amit Kulkarni

म्हापशात क्वारंटाईन असणाऱया परप्रांतियांचा गोंधळ

Omkar B

केंद्रीयमंत्री डॉ. एल. मुरूगन यांची मुरगाव बंदरात सागरीका व यलोफीन जहाजाला भेट

Amit Kulkarni

ऑगस्टमध्ये मोपावरुन विमानाचे ‘टेक ऑफ’!

Amit Kulkarni
error: Content is protected !!