Tarun Bharat

रेल्वेत पुन्हा सुरू होणार गरमागरम ‘खान-पान’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच टेनमध्ये प्रवास करताना गरमागरम आणि ताजे-तवाने जेवण मिळणार आहे. रेल्वेची प्रवासी सुविधा समिती पुन्हा टेनमध्ये ऑन-बोर्ड केटरिंग सेवेसह इतर अनेक सुविधा पुन्हा सुरू करणार आहे. मागील वर्षी मार्चदरम्यान देशात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पॅन्ट्री कॅटरिंगवर बंदी घालण्यात आली होती. त्यापासून मागील 18 महिन्यांपासून बंद असलेली पॅन्ट्री सेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांना टेनमध्ये जेवणासाठी वेगळे बुकिंग करावे लागणार नाही. प्रीमियम गाडय़ांमध्ये, तिकिटासह जेवणाची सुविधा उपलब्ध असेल, तर इतर गाडय़ांमध्ये प्रवासी पूर्वीप्रमाणे पैसे देऊन पँट्रीकडून जेवण किंवा नाश्ता घेऊ शकणार आहेत.

रेल्वे प्रवासी सुविधा समितीची 25 किंवा 26 ऑक्टोबरला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये जेवणासह इतर सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होईल. या बैठकीत रेल्वे बेस किचन, ऑन बोर्ड केटरिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंदर्भात कॅटरिंग विभाग आणि मंत्रालयाला सादरीकरणही देण्यात आले आहे. सध्या देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. रेल्वे आणि विमान प्रवासातील नियमही शिथिल करण्यात आले असून आता प्रवाशांचाही ओघ वाढत चालला आहे. त्यामुळेच रेल्वेमधील पूर्वीच्या सेवा हळूहळू सुरू करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

कोरोना कालावधीत प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी ‘आयआरसीटीसी’ने रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार गाडय़ांमध्ये ‘रेडी टू इट’ (तयार जेवण) देणे सुरू केले होते. पण बहुतांश प्रवाशांना ‘रेडी टू इट’ जेवण पसंतीस उतरले नाही. त्याबाबत आयआरसीटीसीला अनेक तक्रारीही प्रात्प झाल्या होत्या. कोरोनाकाळात पूर्वीच्या तुलनेत, फक्त 30 टक्के लोक टेनमध्ये जेवण खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. ‘आयआरसीटीसी’ 19 राजधानी, 2 तेजस, 1 गतिमान, 1 वंदे भारत, 22 शताब्दी, 19 दुरांतो आणि 296 मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये खानपान सेवा पुरवते. 

Related Stories

देशभर लसीकरणासाठी लागणार वर्षाचा अवधी

Patil_p

भारत – चीन ‘एलओसी’वर गोळीबार

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

कोरोना लसीबाबत शुभसंकेत

Patil_p

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार

Patil_p

‘लस उत्सवा’वर राहुल गांधींची टीका

Amit Kulkarni