Tarun Bharat

रेल्वेस्थानकाच्या छतावर ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल

गुजरातमधील ‘गांधीनगर राजधानी’ रेल्वेस्थानकावर आगळा-वेगळा उपक्रम : पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

गांधीनगर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय रेल्वेने गुजरातमधील ‘गांधीनगर राजधानी’ या रेल्वेस्थानकावर स्वतःचे पहिले-वहिले पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेल उभारले आहे. या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाद्वारे रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. आंतरराष्ट्रीय सोयी-सुविधांसह विविध सेवांनी सज्ज असलेल्या या फाईव्ह स्टार हॉटेलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या विविध स्रोतांचा सर्वंकष लाभ घेत त्यांचा फायद्यासाठी वापर करीत भारतीय रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

गांधीनगर राजधानी स्थानकावर प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी विशेष रोषणाईची व्यवस्था रेल्वेने केली आहे. गांधीनगर राजधानी स्टेशनचा समावेश भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागांतर्गत होतो. या स्टेशनवर उभारण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये 318 खोल्या असतील. एक खासगी संस्था हॉटेल चालविणार आहे. सदर हॉटेल 7,400 चौरस मीटर परिसरात बांधले असून स्टेशनच्या आत उभारलेल्या एका गेटद्वारे प्रवासी थेट स्टेशनवरून हॉटेलमध्ये प्रवेश करू शकतील. रेल्वेस्थानकापासून 22 मीटर उंचीवर हे हॉटेल वसलेले असून तेथे जाण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला अंडरपासदेखील दिले गेले आहेत.

790 कोटींचा खर्च

‘गांधीनगर रेल्वे ऍण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (गरुड) आणि भारतीय रेल्वे यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पावर एकंदर 790 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला असून यापैकी 74 टक्के खर्च गुजरात सरकार तर 26 टक्के खर्च रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे विकासकाम मार्चमध्येच पूर्ण केले जाणार होते, परंतु कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे तीन महिन्यांचा विलंब झाला.

स्वतंत्र हॉस्पिटल अन् प्रार्थनाकक्षही

एन्ट्री गेट, बुकिंग, लिफ्ट-एस्केलेटर, बुक स्टॉल, फूड स्टॉल या सर्व सुविधांव्यतिरिक्त नवीन इमारतीत प्राथमिक उपचारांसाठी एक लहान रुग्णालयही बांधले गेले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये स्वतंत्र प्रार्थनाकक्ष आणि बाळ आहारकक्षही आहे. तसेच स्टेशन मास्टर व इतर रेल्वे कर्मचाऱयांना राहण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरातच स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हे संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

अन्य योजनांचेही व्हर्च्युअल उद्घाटन

‘भारतीय रेल्वे’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच 15 जुलै रोजी पुनर्विकसित गांधीनगर रेल्वेस्टेशनवर उभारण्यात आलेले पंचतारांकित हॉटेल आणि इतर काही बडय़ा योजनांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. याचप्रसंगी व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान मोदी गांधीनगर-वाराणसी साप्ताहिक सुपरफास्ट टेन आणि गांधीनगर-वरेथा मेमू टेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक अधिकारी गांधीनगरमध्ये होणाऱया या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे काळाच्या पडद्याआड

Archana Banage

महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपासून धावणार ‘या’ पाच एक्सप्रेस गाड्या

Tousif Mujawar

अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा निधी

Patil_p

लालबागमधल्या इमारतीला लागलेली आग नियंत्रणात; आयुक्तांनी व्यक्त केली चिंता

Archana Banage

सूर्य नमस्काराला मुस्लीम लॉड बोर्डाचा विरोध

Patil_p
error: Content is protected !!