Tarun Bharat

रेल्वे ट्रकवरील प्रवास सुरूच

युवतीसह 6 जण दापोलीत दाखल

मनोज पवार/ दापोली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईत हाताला काही काम नाही, पोटात ढकलायला दाणा नाही.. अशा स्थितीमुळे तालुक्यातील पावनळ येथील सहा युवकांनी दापोलीला चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर मुंबई येथे काम करणाऱया त्यांच्याच गावातील एका युवतीनेदेखील चालत दापोली गाठली. दरम्यान, रेल्वे ट्रकवरून येणाऱया 26 जणांना खेडमध्ये पोलिसांनी रोखल्याचा प्रकार ताजा असतानाच हा दुसरा प्रकार उघड झाल्याने प्रशासन व्यवस्थेतील त्रुटीही समोर आल्या आहेत.

    लॉकडाऊन  व कोरानाच्या धास्तीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत राहणाऱया या दापोलीकर मोबाईलवरून एकमेकांशी संपर्क साधून रात्री दिवा स्टेशनवर जमा झाले. या सर्वांनी रेल्वेच्या ट्रकमधून खेडच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मिळेल तिथे विश्रांती घेत, ग्रामस्थांकडून मदत मिळाल्यास चहा-बिस्कीट खात या सर्वानी 4 दिवसांचा प्रवास करून खेड रेल्वे स्टेशन गाठले. मात्र तेथे पोचण्यापुर्वी फणसू येथील वैद्यकीय अधिकाऱयांना फोन करून टॅकमधून चालत आलो आहोत, आपली कोरोना तपासणी करा, मगच आम्हाला गावात सोडा अशी विनंती केली होती. त्यामुळे या अधिकाऱयांनी खेडमधून या सर्वाना वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथून या सर्वांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विलगीकरण केंद्रात करण्यात आली.

  या तरूणीसह सर्वानी चार दिवस दिवस-रात्र प्रवास करून खेड रेल्वे स्टेशन गाठले. वाटेत येणाऱया बोगद्यातून प्रवास करण्याचे टाळत बोगद्याच्या बाजूने किंवा  डोंगरावरून प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट टळल्यावरही मुंबईला परतणार नसून गावात राहूनच काहीतरी रोजगार शोधणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले.

तळघरकरांकडून नाष्टा

  दापोली उपजिल्हा रुग्णालयात या सर्वांना आणल्यानंतर चार दिवस उपाशी असलेल्या या युवकांना सामाजिक कार्यकर्ते नवाज तळघरकर यांनी कांदापोहे आणून दिले. खूप दिवसांनी भरपेट कांदेपोहे मिळाल्यावर ते खाऊन झाल्यानंतर या सर्वांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली.

Related Stories

चौथा पॉझिटिव्ह, मुंबईहूनच आलेला

NIKHIL_N

मणेरी येथे एसटी बसला अपघात

Anuja Kudatarkar

आजगावात एसटी बसचा अपघात

Anuja Kudatarkar

वागदे – कसवण रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन- अबिद नाईक यांची माहिती

Anuja Kudatarkar

प्रचाराच्या तोफा थंडावल्या !आता लक्ष रविवारकडे

Anuja Kudatarkar

नियमाबाबत संभ्रमावस्थेने संचारबंदीचा विसर!

Patil_p