Tarun Bharat

रेवंडी खाडीपात्रात पुन्हा अतिक्रमण!

पाच महिने कोणतीही कार्यवाही नाही : ग्रामपंचायतीने वेधले मालवण तहसीलदारांचे लक्ष

प्रतिनिधी / मालवण:

रेवंडीतील खाडीपात्रात पुन्हा अतिक्रमण होत असल्याची तक्रार सरपंच यांनी मालवण तहसीलदार यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी सभापती सोनाली कोदे, माजी सरपंच युवराज कांबळी, अमोल वस्त, विकास चेंदवणकर, सचिन मोरवेकर आणि विराज तळशीलकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, रेवंडी ग्रामपंचायत हद्दीतील खालची रेवंडी येथील खाडी किनारी असलेला धूप प्रतिबंधक बंधारा व कांदळवन तोडल्याबाबत या ग्रा.पं.च्या तक्रारीनुसार 31 डिसेंबर 2020 रोजी सरपंच, पोलीस पाटील, मंडल अधिकारी, भूमी अभिलेख, कांदळवन अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समवेत संयुक्त स्थळ पाहणी करण्यात आली होती. या ठिकाणच्या धूप प्रतिबंधक बंधाऱयावरील जेसीबीच्या सहाय्याने काढले असल्याचे संबंधितांनी कबूल केले होते. त्या अनुषंगाने या ठिकाणचा धूप प्रतिबंधक बंधारा पूर्ववत करण्यात यावा, अशा सूचना पत्तन विभागामार्फत संबंधितास देण्यात आल्या होत्या.

पाच महिने कोणतीही कार्यवाही नाही

चौकशीला 5 महिने पूर्ण झाले परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही संबंधितांकडून झालेली नाही. या ठिकाणी 22 मे 2021 पासून पुन्हा खाडीपात्रात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून कोणतीही कारवाई होत नसल्याने रेवंडी गावातील ग्रामस्थांच्या मनात रोष निर्माण झालेला आहे. या ठिकाणी अनधिकृत चालत असलेले भरावाचे काम त्वरित काढून टाकण्यात यावे. तसे न केल्यास रेवंडी ग्रामस्थ तेथे जाऊन जलसमाधी घेतील. तसेच कायदा हातात घेतल्यास त्याला पोलीस प्रशासन व महसूल विभाग सर्वस्वी जबाबदार राहील. रेवंडी सरपंच अथवा ग्रा.पं. सर्व सदस्य जबाबदार राहणार नाहीत. तरी आपण लवकरात लवकर यात लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

उधाणाने किनारपट्टीवर दाणादाण!

Patil_p

युवकाच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

NIKHIL_N

किरीट सोमय्या यांच्याकडून कुडाळ बस स्थानकाच्या इमारतीची पाहणी

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गचे ठाकरे गटाचे आम. वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी

Abhijeet Khandekar

वेंगुर्लेची साहित्य परंपरा पुढील पिढीने जतन करावी -सौ. वृंदा कांबळी

Anuja Kudatarkar

कोरोनाने तयार मखरांची आरासच कोसळली

NIKHIL_N