ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तीचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रीक टनांवरुन 7.74 लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, धान्याचं, सुरळीत वाटप व्हावं, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालावं आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत 7 कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांवरुन देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या 5 किलो मोफत तांदळाचं वाटपही सुरु आहे. ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी 8 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. असं ही त्यांनी यावेळी सांगितले.