Tarun Bharat

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा विजयी श्रीगणेशा

सनरायजर्स हैदराबादवर एकतर्फी मात, देवदत्त पडिक्कल, डीव्हिलियर्स, चहलची खेळी निर्णायक

वृत्तसंस्था/ दुबई

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने आयपीएल स्पर्धेच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादला सहज पराभूत करत आपल्या मोहिमेचा विजयी श्रीगणेशा केला. प्रारंभी, आरसीबीने निर्धारित 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या तर प्रत्युत्तरात सनराजयर्सला हे माफक आव्हानही अजिबात पेलवले नाही. त्यांचा डाव 153 धावातच आटोपला.

शेवटच्या षटकात 18 धावांची गरज असताना नटराजन व संदीप ही शेवटची जोडी मैदानात होती. मात्र, त्यांना 7 धावाच जमवता आल्या. संदीप शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि आरसीबीने हा सामना 10 धावांनी जिंकला.

विजयासाठी 164 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची खराब सुरुवात झाली. वास्तविक, बेअरस्टोन उमेश यादवला लागोपाठ चौकार-षटकार फटकावत आपले इरादे स्पष्ट केले होते. पण, त्याच्या फटक्यावरच फॉलो थ्रूला उमेश यादवच्या हाताला चेंडू लागून यष्टीवर आदळला आणि यावेळी वॉर्नर क्रीझबाहेर असल्याने हैदराबादला पहिला धक्का बसला होता.

  तत्पूर्वी, एबी डीव्हिलियर्स (30 चेंडूत 51) व देवदत्त पडिक्कल (42 चेंडूत 56) यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 163 धावांपर्यंत मजल मारली. पदार्पणवीर मध्यमगती गोलंदाज नटराजन, विजय शंकर व अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्रारंभी, देवदत्त पडिक्कल व ऍरॉन फिंच 90 धावांची सलामी दिल्यानंतर लागोपाठ चेंडूंवर बाद झाले. कर्णधार विराट कोहलीही (14) स्वस्तात तंबूत परतला. पण, त्यानंतर एबी डीव्हिलियर्सने जोरदार आक्रमण चढवत 29 चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि यामुळे आरसीबीला 160 धावांचा टप्पा सर करता आला.

तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर आरसीबीच्या सलामीवीरांनी याचा यथोचित लाभ घेण्याचा प्रयत्न केला. डावखुरा देवदत्त पडिक्कलने तर ऑस्ट्रेलियन सहकारी सलामीवीर ऍरॉन फिंचपेक्षाही अधिक आक्रमण चढवले. एकीकडे, देवदत्तने जोरदार फटकेबाजी सुरु केल्यानंतर दुसरीकडे, अनुभवी फिंचने त्याला अधिक संधी देण्यावर भर दिला. ऍरॉन फिंच येथे 8 विविध प्रँचायझीतर्फे खेळणारा पहिला खेळाडू ठरला.

देवदत्तने प्रत्येक चेंडू त्याच्या मेरिटप्रमाणे खेळला. शिवाय, चौफेर फटकेबाजीची संधीही सोडली नाही. हैदराबादच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा त्याने उत्तम समाचार केला. खराब चेंडूंना सीमारेषेपार टोलवण्याबरोबरच स्ट्राईक रोटेट करण्यातील त्याचा हातखंडाही येथे दिसून आला.

पहिले षटक सावधपणे खेळून काढल्यानंतर पडिक्कलने दुसऱया षटकातील पहिल्या चेंडूवर संदीप शर्माला चौकार फटकावत आक्रमणाला सुरुवात केली. पदार्पणवीर नटराजनच्या डावातील चौथ्या षटकात तर त्याने 3 चौकार वसूल केले. डीप स्क्वेअर, एक्स्ट्रा कव्हर व मिडविकेटवरुन त्याने यावेळी धावांची आतषबाजी केली. पडिक्कल व फिंच या दोघांनीही प्रतिस्पर्धी संघाला फारशी संधी दिली नाही. बहुतांशी वेळा त्यांची फलंदाजी निर्दोष राहिली. 5 ते 8 षटकादरम्यान मात्र हैदराबादचे गोलंदाज या दोघांना जखडून ठेवण्यात थोडेफार यशस्वी झाले.

रशीद खानच्या डावातील 9 व्या षटकातील चौथा चेंडू सीमापार फटकावत फिंचने ही कोंडी फोडली व त्यानंतर पुढील चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावला. त्यानंतर देवदत्तलाही नव्याने सूर सापडला आणि या जोडीने फटकेबाजी सुरु केली. 10 व्या षटकात देवदत्तने अर्धशतक साजरे केले, त्यावेळी त्याला मिळालेले जीवदान महत्त्वाचे ठरले. याचप्रमाणे, 11 व्या षटकातही डीप स्क्वेअर व डीप मिडविकेटवरील फॅबियन ऍलन व अभिषेक यांच्यात समन्वय नसल्याने झेल सांडला गेला आणि पडिक्कल आणखी एकदा सुदैवी ठरला.

नंतर विजय शंकरने पडिक्कलला तर अभिषेक शर्माने फिंचला बाद केल्यानंतर हैदराबादला दुहेरी यश चाखता आले. 2 बाद 90 अशी स्थिती असताना विराट व एबी डीव्हिलियर्स क्रीझवर होते.

असे जागतिक स्तरावरील दोन दिग्गज फलंदाज क्रीझवर आले. पण, आश्चर्य म्हणजे बराच काळ या उभयतांनी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावरच अधिक भर दिला होता. डावातील 16 व्या षटकात विराट कोहलीने पदार्पणवीर नटराजनच्या चेंडूवर डीप मिडविकेटवरील रशीद खानकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला होता.

रशीदने झेल सांडला अन् देवदत्तचे अर्धशतक चौकाराने साजरे!

डावातील 10 व्या षटकात अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर देवदत्तने उत्तूंग फटका लगावला खरा. पण, स्वीप करताना त्याचा अंदाज चुकला होता. केवळ सुदैवानेच रशीद खान झेल घेताना प्रचंड गोंधळला, त्याच्याकडून झेल सांडला गेला आणि याचवेळी चौकारासह देवदत्तचे अर्धशतकही साजरे झाले.

अन् आरसीबीचे दोन्ही सलामीवीर सलग चेंडूंवर बाद झाले!

देवदत्त पडिक्क्ल व ऍरॉन फिंच यांनी 11 षटकात 90 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर सलग दोन चेंडूंवर या दोघांनीही तंबूचा रस्ता धरला होता. प्रारंभी, 11 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विजय शंकरने पडिक्कलचा त्रिफळा उडवला. पुढे 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने ऍरॉन फिंचला पायचीत केले आणि हे दोन्ही सलामीवीर सलग दोन चेंडूंवर बाद झाले.

Related Stories

वर्ल्डकपसाठी ख्रिस गेलचा आयपीएलला अलविदा!

Amit Kulkarni

हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक रीड यांचा राजीनामा

Patil_p

पुणेरी पलटन, बंगाल वॉरियर्स, बेंगळूर बुल्स विजयी

Patil_p

ऑस्ट्रेलिया महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाची फायनलमध्ये धडक

Patil_p

ऑलिम्पिकसाठी पांघलला टॉप सिडिंग

Patil_p