Tarun Bharat

रोजगारनिर्मितीचा गाडा हळूहळू रुळावर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना संसर्गामध्ये झालेली वाढ आणि लॉकडाऊनमुळे गेल्या एक-दीड वर्षात अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या होत्या. नोकऱया-रोजगार गमावल्यामुळे देशातील बेरोजगारी उच्चांकी पातळीला पोहोचली होती. मात्र आता देशात रोजगानिर्मितीने पुन्हा वेग धरला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर हे चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची जून महिन्यातील आकडेवारी पाहता रोजगाराचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे.

जून महिन्यात ‘ईपीएफओ’च्या खातेधारकांमध्ये 12.83 लाखांनी वाढ झाली आहे. ही संख्या मे महिन्याच्या तुलनेत जास्त आहे. वेतन रजिस्टरमध्ये जास्तीत जास्त कर्मचारी महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकातील होते. या राज्यांमधून सर्वाधिक 7.78 लाख सदस्य सहभागी झाले. एकंदर रोजगार निर्मितीत वाढ होत असल्यामुळे देशाचा आर्थिक गाडा पुन्हा रुळावर येण्याच्या आशा पल्लवित झालेल्या दिसत आहेत.

जून महिन्यात ईपीएफओमध्ये नोंदणी झालेल्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापैकी अनेकांनी आपले जुने खाते नव्या कंपनीत ट्रान्सफर केले आहे. नव्या सदस्यांपैकी 6.15 लाख जण 18 ते 25 वयोगटातील आहेत. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ईपीएफओच्या खातेधारकांची संख्या 5.09 लाखांनी वाढली. जून महिन्यात नोंदणी झालेल्या 12.83 लाखांपैकी 8.11 लाख सदस्यांची पहिल्यांदाच ईपीएफओमध्ये नोंदणी झाली आहे. तर जून महिन्यात 4.73 लाख जणांनी ईपीएफओचे सदस्यत्व सोडले. मात्र, यापैकी अनेकांनी नव्या कंपनीत कामाला सुरुवात केली आहे. 

2020-21 मध्ये 77.08 लाख नवीन सदस्य

‘ईपीएफओ’मध्ये दरमहा सरासरी 7 लाख नवीन सदस्य जोडले जातात. 2020-21 मध्ये ‘ईपीएफओ’मध्ये एकूण 77.08 लाख नवीन कर्मचारी जोडले गेले. ‘ईपीएफओ’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात 78.58 लाख नवीन सदस्य सामील झाले. तर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये हा आकडा 61.12 लाख होता. एप्रिल 2018 पासून ‘ईपीएफओ’ नवीन सदस्यांची आकडेवारी जाहीर करत आहे.

Related Stories

नेताजी बोस यांच्या जयंतीला पराक्रम दिन

Patil_p

शेतकऱयांचा शेतात मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

prashant_c

हिंसाचाराचे लोण पसरल्याने आसाम-मेघालयमध्ये तणाव

Patil_p

महिलेवर दुष्कर्म; एट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Archana Banage

पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या…; चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी

datta jadhav

पंजाबमध्ये दिवसभरात 2,319 नवीन बाधित; 58 मृत्यू 

Tousif Mujawar