Tarun Bharat

रोहितच्या खात्यावर असाही नामुष्कीजनक विक्रम

टी-20 क्रिकेट म्हणजे मैदानात उतरुन धडाधड फलंदाजी करत धावांचे इमले बांधण्याचा क्रिकेट प्रकार. इथे जो समोरच्या गोलंदाजांवर तुटून पडतो, तोच हिरो ठरतो आणि त्यातही रोहित शर्मासारखा विस्फोटक फलंदाज असेल तर त्याच्याकडून आणखी अपेक्षांचा डोंगर. पण, याच रोहित शर्माला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका नामुष्कीजनक विक्रमाला सामोरे जावे लागले असून हा आहे सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा विक्रम!

आयपीएल इतिहासात सर्वाधिक 13 वेळा गोल्डन डकवर अर्थात पहिल्या चेंडूवरच बाद होण्याचा विक्रम हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या खात्यावर असून यात आता रोहित शर्मा देखील समाविष्ट झाला आहे. दुबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात रोहित गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्या चेंडूवर बाद होण्याची त्याची ही आयपीएलमधील 13 वी वेळ होती.

रोहितसाठी हा 199 वा आयपीएल सामना होता आणि मुंबई इंडियन्सतर्फे 4 हजार धावांचा टप्पा सर करण्यासाठी त्याला अवघ्या 8 धावांची गरज होती. पण, याचवेळी तो 13 व्यांदा गोल्डन डक ठरला.

वास्तविक, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितचा खेळ अधिक बहरतो. पण, मागील 7 डावात रोहितला अवघ्या 35 धावा जमवता आल्या आहेत. या हंगामात तो प्रथमच शून्यावर बाद झाला. पण, त्याचे हे फलंदाजीतील अपयश मुंबई इंडियन्ससाठी विशेष चिंतेचे ठरले. त्याने केकेआरविरुद्ध 54 चेंडूत 80 व किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 45 चेंडूत 70 धावांची आतषबाजी पहिल्या टप्प्यात जरुर साकारली. पण, नंतर हाच धडाका त्याला कायम राखता आला नाही.

पुढे, धोंडशिरेच्या दुखापतीमुळे तो सलग चार सामने खेळू शकला नाही आणि त्यानंतर पुनरागमन केल्यानंतर दोन सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेल्यानंतर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढतीत त्याच्या खेळीत निराशा जाणवली. त्याला 7 चेंडूत 4 धावाच करता आल्या. नंतर पहिल्या क्वॉलिफायरमध्ये अश्विनने पायचीत करत त्याच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. या सर्व पार्श्वभूमीवर, रोहित शर्मासमोर स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असून अंतिम फेरीत त्याच्याकडे यासाठी आणखी एक नामी संधी असणार आहे.

Related Stories

बांगलादेश जानेवारीत न्यूझीलंड दौऱयावर

Patil_p

व्यावसायिक फुटबॉल पंचांची पहिली तुकडी जाहीर

Patil_p

पाकचे सहा क्रिकेटपटू कोव्हिड-19 ‘पॉझिटिव्ह’

Patil_p

धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन

Patil_p

किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

रोहित तंदुरुस्त नव्हता तर स्टेडियममध्ये काय करत होता?

Patil_p