Tarun Bharat

लंका दौऱयात इंग्लंडच्या दोन कसोटी

लंडन : इंग्लंड संघ नियोजित केल्याप्रमाणे पुढील महिन्यात लंका दौऱयावर जाणार असून लंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी गॅलेमध्ये बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविल्या जाणार असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने बुधवारी जाहीर केले.

ईसीबी व लंका क्रिकेट यांनी या सुधारित दौऱयासाठी जैवसुरक्षा आणि प्रवासाच्या योजनांना मान्यता दिली आहे. गेल्या मार्चमध्ये ही मालिका आयोजित करण्यात आली होती. पण कोरोना महामारीच्या संकटामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. नव्या नियोजनानुसार इंग्लंड संघ 3 जानेवारी रोजी लंकेत दाखल होणार आहे आणि 14 व 22 जानेवारीपासून पहिली व दुसरी कसोटी गॅलेमध्ये खेळणार आहे. त्याआधी लंकेत दाखल झाल्यानंतर इंग्लंड संघाला हंबनटोटा येथे क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. क्वारंटाईनमध्ये असताना 5 ते 9 जानेवारी या कालावधीत ते महिंदा राजपक्षा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव करू शकणार आहेत.

इंग्लंड संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत असून वनडे मालिका रद्द केल्यानंतर हा संघ गुरुवारी मायदेशी प्रयाण करणार आहे. द.आफ्रिकेत असताना दोन्ही संघांतील काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका रद्द करण्यात आली. लंकेतील मालिका संपल्यानंतर इंग्लंड संघ फेब्रुवारीमध्ये भारत दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप मोहिम पूर्ण करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांनी बाळगली आहे. इंग्लंडने यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये लंकेचा शेवटचा दौरा केला होता आणि इंग्लंडने ती मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली होती.

Related Stories

वर्ल्डकपमधील 13 व्या लढतीत भारताचे तीन-तेरा!

Patil_p

मुष्टियुद्ध संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे आशिष शेलार रिंगणात

Patil_p

ट्रेंट बोल्टचा मोर्चा आता राष्ट्रीय संघाकडे

Omkar B

दबंग दिल्ली, हरियाणा स्टीलर्स विजयी

Patil_p

स्टुटगार्ट स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Patil_p

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p