Tarun Bharat

लंकेचा पहिला डाव 135 धावांत खुर्दा, बेसचे 5 बळी

वृत्तसंस्था/  गॅले

नवोदित फिरकी गोलंदाज डोम बेसच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर येथील गॅले स्टेडियमवर गुरूवारपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडने यजमान लंकेचा पहिल्या डावात 135 धावांत खुर्दा केला. त्यानंतर दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 2 बाद 127 धावा जमविल्या. बेसने 30 धावांत 5 गडी बाद केले.

गॅलेच्या स्टेडियमवर कसोटी सामन्यातील लंकेची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. 21 वर्षांपूर्वी या मैदानावर पाकने लंकेला 181 धावांत गुंडाळले होते. लंकेच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडतर्फे बेसने 30 धावांत 5, ब्रॉडने 20 धावांत 3 तर लिचने 57 धावांत 1 गडी बाद केला.

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 23 वर्षीय बेसने सकाळच्या पहिल्या सत्रात लंकेचा अनुभवी फलंदाज कुशल परेराला 20 धावांवर झेलबाद केले. बेसने आपल्या पहिल्या षटकांतील दुसऱया चेंडूवर लंकेचा पहिला बळी घेतला. चेंडू स्वीप करण्याच्या नादात कुशल परेरा स्लीपमधील रूटकरवी झेलबाद झाला.

तत्पूर्वी स्टुअर्ट ब्रॉडने लंकेचा सलामीचा फलंदाज थिर्मेनीला 4 धावांवर झेलबाद केले होते. ब्रॉडने कुशल मेंडीसला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. लंकेची स्थिती यावेळी 3 बाद 25 अशी केविलवाणी होती. मॅथ्यूज आणि कर्णधार चंडीमल यांनी चौथ्या गडय़ासाठी 56 धावांची भागिदारी केली. ब्रॉडने मॅथ्यूजला 27 धावांवर झेलबाद केले. लिचने कर्णधार चंडीमलला करेनकरवी झेलबाद केले.

चंडीमलने 28 धावा जमविल्या. बेसने लंकेचे शेवटचे चार फलंदाज झटपट गुंडाळले. डिक्वेलाने 12, शेनकाने 23 तर डिसिल्वाने 19 धावा जमविल्या. 46.1 षटकांत लंकेचा डाव 135 धावांवर आटोपला. फिरकी गोलंदाज बेसने कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱयांदा एका डावात 5 बळी मिळविले. उपाहारावेळी लंकेने 3 बाद 65 धावापर्यंत मजल मारली होती तर चहापानापूर्वी लंकेचा डाव 135 धावांवर आटोपला होता. इंग्लंडने दोन वर्षांपूर्वी लंकेविरूद्धची शेवटची कसोटी मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली होती.

चहापानानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली. इंग्लंडची सलामी जोडी क्रॉले आणि सिबेली ही केवळ 17 धावांत तंबूत परतली. लंकेच्या इंबुलडेनियाने सिबेलीला 4 धावांवर तर क्रॉलेला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार रूट आणि बेअरस्टो यांनी दिवसअखेर संघाची पडझड थांबविताना तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 110 धावांची भागिदारी केली. बेअरस्टो 47 तर रूट 66 धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ 8 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहे. कसोटीतील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविताना एकूण 12 बळी मिळविले. इंग्लंडची या कसोटीत पहिल्या दिवसाअखेर स्थिती मजबूत असल्याचे जाणवते.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव 46.1 षटकांत सर्वबाद 135 (चंडीमल 28, मॅथ्यूज 27, कुशल परेरा 20, शेनका 23, डिसिल्वा 19, डिक्वेला 12, बेस 5-30, ब्रॉड 3-20, लिच 1-55)

इंग्लंड प. डाव 41 षटकांत 2 बाद 127 (बेअरस्टो खेळत आहे 47, रूट खेळत आहे 66, क्रॉले 9, सिबेली 4, इंबुलडेनिया 2-55).

Related Stories

भारत-इंग्लंड यांच्यात आज पहिली टी-20

Patil_p

केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

अमेरिकेचा टेल फ्रिझ उपांत्य फेरीत

Patil_p

रोहित शर्मा, बुमराह, सुर्यकुमार अबु धाबीत दाखल

Patil_p

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

Patil_p

रॉबर्टो ऍग्युट विजेता

Patil_p