Tarun Bharat

लंडनमधील ‘कोरोना लढाई’त सिंधुकन्या ‘टीम लिडर’

Advertisements

प्रसिद्ध सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कार्यरत : अनेकांचे जीव वाचविण्यात टीमची मोलाची भूमिका

मनोज चव्हाण / मालवण:

कोरोनाच्या लढाईत लंडन येथील प्रसिद्ध अशा सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये सीव्हीआयटी अर्थात कोविडच्या लढाईसाठी टीम लीडर म्हणून सिंधुदुर्गातील कुडाळच्या सुकन्या डॉ. कांचन पाटील कार्यरत आहेत. सुमारे 1300 बेडची क्षमता या हॉस्पीटलमध्ये आहे. आजपर्यंत अनेकांचे जीव वाचविण्यासाठी कांचन पाटील यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे सिंधुकन्येचे लंडनमध्ये कौतुक होत आहे. कांचन हिच्या या नियुक्तीमुळे सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सातासमुद्रापार सिंधुदुर्गाची सुकन्या सध्या कार्यरत असलेल्या देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी झगडत आहे. कांचन आणि त्यांचे पती विवेक पाटकर हे ब्रेस्ट सर्जन आहेत. तेही लंडनमध्येच कार्यरत आहेत. पाटकर कुटुंबिय गेली अठरा वर्षे लंडनमध्ये स्थायिक आहेत.

मालवण भंडारी हायस्कूलचे शिक्षक सदानंद पाटकर यांचा मुलगा डॉ. विवेक पाटकर यांचेही शिक्षण भंडारी हायस्कूलमध्ये झाले आहे. डॉ. कांचन पाटील या कुडाळच्या असून त्याही सध्या लंडनमध्येच आहेत.

‘कोरोना’ न फुटलेली प्रश्नपत्रिका

यावर्षी कोरोनाने एक नवीनच आणि पूर्वी न फुटलेली प्रश्नपत्रिका आपल्या सर्वांसमोर ठेवली आहे आणि प्रत्येक देश आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणाची किती उत्तरे बरोबर, कोणाची किती चुकली, हे काळ ठरवेलच. पण ही परीक्षा अख्ख्या मानव जातीसाठी आहे आणि इथे एकमेकांची उत्तरे पाहायला आणि कॉपी करायला पूर्ण मुभा आहे. किंबहुना तसे केल्याशिवाय आपल्या सगळय़ांना पास होता येणार नाही, असे नेस्थेटिक सल्लागार आणि सीव्हीआयडी टीम लीडर सेंट जॉर्ज हॉस्पिटल, लंडनच्या डॉ. कांचन पाटील यांनी सांगितले. 24 एप्रिल 2020. भारताप्रमाणेच ब्रिटनमध्ये देखील ‘लॉकडाऊन’ घोषित होऊन जवळजवळ महिना झाला. या काही आठवडय़ात आपल्याला माहीत असलेलं आपल्या सभोवतीचे जग आणि आपण सर्व, किती आंतर्बाहय़ बदललो. अगदी वाढलेल्या दाढी आणि केसांसकट! वैद्यकीय जगत सुद्धा याला अपवाद नाही! यातले काही बदल तर तात्पुरते असतील, पण बरेच बदल दूरगामी ठरतील. नव्हे तर ते तसे ठरावेत तरच आपण यातून काही शिकलो असं म्हणू, असे डॉ. विवेक पाटकर म्हणाले.

सतर्कता आणि महामारी नियोजनाचे महत्व

एका दृष्टीने या नवीन कोरोना विषाणूने विकसित जग आणि विकसिनशील जगातील तफावत बरीच कमी केली. अगदी ब्रिटनसारख्या विकसित देशाची आरोग्यव्यवस्था, जी जगातली आदर्श सरकारी राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थे (NHS) मधील एक मानली जाते, तीसुद्धा या महामारीला जोखण्यात कमी पडली. जानेवारीच्या शेवटी ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी संसदेत विधान केले होते, ब्रिटन कोरोनाला तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे! हे विधान किती अल्पायुषी होते हे लवकरच कळून चुकले. खरं म्हणजे, काही वर्षांपूर्वी इतरत्र आलेल्या सार्स आणि एबोला विषाणूच्या साथीपासून आपण धडा घ्यायला हवा होता. पण म्हणतात ना ‘स्वत:ला ठेच लागल्याशिवाय शहाणपणा येत नाही’. जसजशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली, तसतसं ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करावे लागले. सर्व इस्पितळांमध्ये फक्त इमर्जन्सी सेवा आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार सुरू ठेवले गेले व ते सुद्धा अगदी गरजेपुरते. जे कॅन्सर उपचार आम्ही भारतात 90 च्या दशकात करीत होतो, ते परत वापरू लागलो. मात्र एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कुठलीही इस्पितळं बंद करण्यात आली नाहीत. उलट, खासगी इस्पितळांचा वापर नॉन-इमर्जन्सी सेवांसाठी करण्यात येतोय, असे डॉ. पाटील म्हणाल्या.

आरोग्यसेवकांचं स्वत:चं आरोग्य, एक दुर्लक्षित बाब

बऱयाचदा आम्ही डॉक्टर इतरांना ब्रह्मज्ञान देतो. ही विचार करण्याची गोष्ट आहे की किती डॉक्टर आणि नर्सेस स्वत: फिट असतात. कोरोना विषाणू हा अनफिट व्यक्तीसाठी जास्त घातक असतो. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 80 ते 100 आरोग्य सेवक कोरोनाला बळी पडले आहेत. हा एक व्यावसायिक हॅझार्डचा भाग झाला. परंतु कोरोनासारख्या महामारीच्या वेळी आधीच तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण पडतो. या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे इथे कामाचे नियोजन केले जातेय. वयस्कर डॉक्टर आणि नर्सेसना कोरोनाशी संबंधित नसलेल्या सेवांमध्ये वापरले जातेय. समाजाला सुद्धा याची जाणीव आहे आणि आपापल्या परीने सर्व जण मदत करताहेत, ही सुखावणारी गोष्ट आहे.

आव्हानाला एकत्र सामोरे जाऊया!

आज इटलीतील डॉक्टर आपले अनुभव इतरांबरोबर शेअर करून इतरांना सावध करताहेत. ब्रिटन या विषाणूवरील लस शोधतेय, न्यूयॉर्कमधील सहकारी त्यांना आढळलेले नवीन उपाय इतरांना सांगताहेत. भारत आणि सिंगापूरसारख्या देशांनी यशस्वीरित्या पहिला सर्च आत्तापर्यंत कसा कंट्रोलमध्ये ठेवला याचा इतर देश अभ्यास करताहेत. चायना स्वत: पहिल्या धक्क्यातून स्वत: सावरून इतरांना PPE आणि सामुग्री पाठवतोय. हे सर्व नक्कीच आशादायक आहे. एकमेकाना नावे ठेवायची आणि बोटे दाखवून सगळय़ांनी फेल व्हायचे की सहकार्य करून आणि एकमेकांपासून शिकून पास व्हायचं, हे आपल्या हातात आहे. तेव्हा आपण या संधीचा सकारात्मक विचार करून या आव्हानाला एकत्र सामोरे जाऊया, असे पाटकर उभयतांनी स्पष्ट केले.

माका जरा विरविरल्यासारख्या वाटता!

यातून एक महत्वाची गोष्ट दिसून येते की आरोग्यसेवा ही विकसित देशात देखील एक लिमिटेड रिसोर्स आहे आणि त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. अगदी PPE सारख्या वैयक्तिक प्रोटेक्टिव साधनांपासून ते आरोग्य सर्व आरोग्य सेवकांपर्यंत प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. कुठलेही काम हे कमी स्वरुपाचे नाही. जेव्हा आयसीयूमध्ये पेशंटना पालथे करण्यासाठी माणसांची गरज भासली, तेव्हा डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जनना वॉर्डबॉयची भूमिका पार पाडावी लागली आणि त्यांनी ती भूमिका आनंदाने स्वीकारली. कोरोना विषाणू हा प्राथमिकत: श्वसनाचा आजार असल्यामुळे आणि रेस्पिरेटरी फिजिशिअन्सना मदत करण्यासाठी इतर स्पेशालिटीमधील डॉक्टर्सच परत रेस्पिरेटरी ट्रेनिंग करावे लागले. या काही आठवडय़ात एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ओपीडीला येणाऱया पेशंटची घटलेली संख्या. “माका जरा विरविरल्या सारख्या वाटता, जरा तपासून बघा’’ अशा प्रकारचं गाऱहाणं इंग्रजीमध्ये सांगून हॉस्पिटलमध्ये येणाऱयांची संख्या इथेही पुष्कळ आहे. मात्र गेल्या एक महिन्यात कोरोनाच्या भीतीमुळे इमर्जन्सी डिपार्टमेंट आणि ओपीडीमधली संख्या एकदम का कमी झाले ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरी गरज नसताना आपण किती वेळा डॉक्टरकडे जातो आणि ते सुद्धा स्वत:च्या खिशाला भुर्दंड पाडून! हे आता बंद झाल्यासारखे झाले आहे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सोन पावली…मोत्याच्या पावली, आली गौराई!!

Patil_p

मराठा आरक्षण प्रश्नावर मंडणगड तहसीलला निवेदन

Patil_p

शिवसेनेतर्फे चिंदर येथे शेतकरी महिलांना भुईमूग बी वाटप

Anuja Kudatarkar

शिवसेना कार्यालयाकडे शिवसैनिकांची गर्दी

NIKHIL_N

घरफोडीतील हस्तगत 3 लाखाचे दागिने मालकाकडे सुपूर्द

Patil_p

Kokan Heavy Rain Update : पालशेत, आरे पुल पाण्याखाली; शृंगारतळी बाजारपेठ जलमय

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!