घरांच्या विक्रीत सध्या धिमेपणा आला असून कोरोनामुळे यातील हालचाली मंदावल्या आहेत. ग्रीन झोन भागांमध्ये बांधकाम क्षेत्रातल्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे लक्झरी किंवा अलिशान घरांच्या किमती कमी झाल्याचे सांगण्यात येते. अंदाजे 20 टक्क्यापर्यंत अलिशान घरांच्या किंमती घसरल्या आहेत.
बांधकाम क्षेत्रात सध्या हालचाली मंदावल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र व्यवहार ठप्प झाले असून ग्रीन, ऑरेंज विभागात व्यवसायांना काहीअंशी मुभा दिलेली असली तरी म्हणावा तसा व्यवसाय गती पकडताना दिसत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. बांधकाम क्षेत्रात एक मात्र बाब चांगली झालीय ती म्हणजे लक्झरी घरे किमान 10 ते 20 टक्के इतकी स्वस्त झाली आहेत.


ज्या ग्राहकांनी कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी लक्झरी घर बुक केले होते पण खरेदीचा व्यवहार केला नाही त्यांना आता ते लक्झरी घर 10 ते 20 टक्के सवलतीत मिळणार आहे. विकासकांनी लक्झरी घरे स्वस्त केली आहेत. सध्या बिल्डरांना रोखीचा अभाव जाणवतो आहे. त्यातच काही प्रकल्प हे कामगारांअभावी, कच्च्या साहित्याच्या पुरवठय़ाअभावी तसेच मागणीत झालेल्या घटीमुळे रखडले आहेत. आता तर कोरोनामुळे मागणी आणखी काही महिन्यांकरीता कमीच राहणार आहे, हे नक्की. सध्याची परिस्थिती पाहून अनेक बिल्डरांना आपल्या प्रकल्पातील लक्झरी घरे विक्रीसाठी सवलत देण्याचा मार्ग अवलंबावा लागतो आहे. घराच्या मूळ रक्कमेवर जवळपास 20 टक्क्यापर्यंत सवलत दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याखेरीज पैसे देण्याकरीताही ग्राहकांकडे बिल्डर्स जास्तीचा कालावधी देऊ करत आहेत. देवाणघेवाणाच्या व्यवहारात सूट देण्याचाही विचार बिल्डर्स करत आहेत. एकंदर व्यवहार तुटणार नाही याची पुरेपूर काळजी व्यावसायिकांकडून घेतली जात आहे. बुकिंग रक्कम भरल्यानंतर बिल्डर्स ग्राहकांना उर्वरीत रक्कम भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यासाठी तयार झाले आहेत.