Tarun Bharat

लक्षणरहित प्रवाशांनाच प्रवेश

Advertisements

महाराष्ट्रातून अल्पकाळासाठी येणाऱयांसाठी नवे नियम : दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

सर्व प्रवाशांनी येताना…

  • ताप, कफ तसेच श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणांपासून मुक्त असावे.
  • बोर्डिंगच्या वेळी स्वयं-घोषणापत्र जमा करावे लागणार.
  • तापासाठीच्या थर्मल स्क्रीनिंगला सामोरे जाण्याची असणार सक्ती
  • पूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रवासावेळी बाळगावे लागणार.
  • फेसमास्कचा वापर अनिवार्य, कोरोनाविषयक दिशानिर्देशांचे पालन करावे लागणार.
  • परतीच्या प्रवासाचे वैध तिकीट संबंधित अधिकाऱयांना दाखवावे लागणार.

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना रुग्णांची संख्या राज्यात मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. महाराष्ट्रातही बऱयाच प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही तेथून येणाऱया प्रवाशांच्या माध्यमातून संक्रमण फैलावू नये याची दक्षता कर्नाटक सरकारकडून घेतली जात आहे. याच दक्षतेतून यापूर्वी महाराष्ट्र अन् केरळमधून दाखल होऊ पाहणाऱया लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. पण आता महाराष्ट्रातून येणाऱया आणि दोन दिवसांपेक्षा कमी वास्तव्य करू पाहणाऱया प्रवाशांसाठी आरटीपीसीआरच्या निगेटिव्ह अहवालाची सक्ती नसेल पण यासंबंधीचा अंतिम निर्णय संबंधित अधिकाऱयांनी घ्यावा, असे आरोग्य विभागाच्या नव्या लक्षवेधी सूचनांमध्ये नमूद आहे.

संबंधित व्यक्तीने पूर्ण लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बाळगणे तसेच परतीच्या प्रवासाचे तिकीटही दाखविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. कर्नाटक सरकारचा नवा आदेश पाहता महाराष्ट्रातून अल्प काळासाठी राज्यात येऊ पाहणाऱयांना काहीअंशी दिलासा मिळाला असला तरीही काही बंधनांचे पालन करावे लागणार आहे.

कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या अधिकच आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात ये-जा करणाऱयांची संख्या मोठी आहे. दररोज कामानिमित्त अनेकांना ये-जा करावी लागते. मात्र ही ये-जा करताना आरटीपीसीआर करुनच यावे लागत होते. त्यामुळे प्रत्येकालाच मोठा भुर्दंड बसत होता. मात्र आता दोन दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कामानिमित्त कर्नाटकात येणाऱयांसाठीची आरटीपीसीआर सक्ती रद्द होण्याची शक्यता आहे.

आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्याचे संकेत मिळाले असले तरी महाराष्ट्रातून येणाऱया व्यक्तीला पुन्हा महाराष्ट्रात जाण्यासाठीचे बस, रेल्वे आणि विमान प्रवासाचे तिकीट दाखवावे लागणार आहे. कर्नाटक कोविड नियंत्रण समितीने हा आदेश बजावला असून यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात व्यापारानिमित्त तसेच नोकरीनिमित्त जाणाऱयांना त्याचा फायदा झाला आहे. तर दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहण्यासाठी अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करायचे असल्यास आरटीपीसीआर करुनच कर्नाटकात प्रवेश घ्यावा लागू शकतो. प्रवेश घेताना थर्मल स्क्रिनिंग, तोंडाला मास्क आणि कोरोनाचे इतर नियम पाळणे बंधनकारक आहे.

सर्दी, पडसे, खोकला तसेच ताप व इतर आजारांनी त्रस्त झालेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

ग्लास हाऊस देणार भाडेतत्त्वावर

Omkar B

रामनगर वड्डर छावणीतील घरांची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

बंध प्रेमाचे अनू सामाजिक जाणिवांचे !

Amit Kulkarni

बेळगावात 20 लाखांचे अफीम जप्त

Amit Kulkarni

भुतरामहट्टीत दाखल होणार सांबर, अस्वल, तरस

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्पर्धेत इंडियन कराटे गोशिन रू संघटनेचे उज्ज्वल यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!