Tarun Bharat

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली

पुन्हा व्हेंटिलेटरवर उपचार सुरु

प्रतिनिधी/ मुंबई

ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रतीक समदानी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंगेशकर यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने शरीर औषधाला हवा तसा प्रतिसाद देत नाही. मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशकर यांना सुरुवातीपासूनच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती शनिवारी सकाळी पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले.

लता मंगेशकर यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर औषधाचा प्रभाव कमी होत आहे.  शनिवारी अचानक त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा कृत्रिम श्वासोच्छवास सुरु करण्यात आला. मंगेशकर यांच्या प्रकृतीवर  डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ प्रतीत समदानी यांनी दिली.

दरम्यान, लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच लता दीदींना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 22 जानेवारी रोजी लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांची प्रकृतीही बरीच सुधारली होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले होते. पण त्यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वैद्यकीय पथकाने लता दीदींना पुन्हा व्हेंटिलेटरवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली हलवले आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रूग्णालयात धाव

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबतची माहिती घेतली. तसेच मंगेशकर कुटुंबीयांचीही भेट घेऊन माहिती घेतली. राज ठाकरे यांचे लता दीदींबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Related Stories

नॅशनल हेरॉल्ड कार्यालयासह अनेक स्थानी धाडी

Patil_p

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक

Patil_p

भाजप-तृणमूलसाठी पुढील तीन टप्पे निर्णायक

Patil_p

बिहारमध्ये दारूकांडानंतर वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या

Patil_p

योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Tousif Mujawar

जगनमोहन यांच्या आईने सोडले पद

Patil_p