Tarun Bharat

लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायद्यासाठी कार्यकारिणीत ठराव

Advertisements

ग्राम पंचायत, लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीवरही चर्चा

प्रतिनिधी/ बेळगाव

शनिवारी बेळगाव येथे झालेल्या भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तीन प्रमुख ठराव संमत करण्यात आले आहेत. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी ठराव करण्याबरोबरच ग्राम स्वराज्य संकल्पनेतून खेडय़ांच्या विकासावर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे. सायंकाळी बैठकीचा समारोप झाला. या बैठकीत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते.

पक्षाचे कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, पक्षाध्यक्ष नलीनकुमार कटील, मंत्री जगदीश शेट्टर, आर. अशोक, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, सी. टी. रवी, केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी, के. एस. ईश्वराप्पा, अरविंद लिंबावळी, खासदार तेजस्वी सूर्या, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, गृहमंत्री बसवराज बोम्मई, माजी खासदार प्रभाकर कोरे, विधानपरिषदेतील भाजपचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, आमदार महादेवाप्पा यादवाड, भालचंद्र जारकीहोळी, आनंद मामनी, उमेश कत्ती आदींसह राज्यातील अनेक नेत्यांनी भाग घेतला होता. यावेळी कार्यकारिणीचे 140 हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधी भवनमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास बैठकीला सुरूवात झाली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, बेळगाव येथे झालेली कार्यकारिणीची बैठक यशस्वी झाली आहे. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे. यासाठी नेते, कार्यकर्ते, अभिनंदनास पात्र आहेत. बेळगाव लोकसभा, बसव कल्याण व मस्की विधानसभा मतदार संघासाठी होणाऱया पोटनिवडणुकीत भाजप सर्वाधिक मताने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील म्हणाले, गोहत्या बंदी व लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी कार्यकारिणीत ठराव संमत करण्यात आला आहे. याच अधिवेशनात ही दोन्ही विधेयके मांडायची की पुढच्या अधिवेशनात हे मुख्यमंत्री ठरवतील, असे त्यांनी सांगितले.

मस्की व बसव कल्याण विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी मात्र अद्याप प्रभारी नेमण्यात आले नाही. मंत्रीमंडळ विस्तारासंबंधीचा निर्णयही मुख्यमंत्रीच घेणार आहेत. केंद्रिय नेतृत्वाशी चर्चा करुन सध्या विस्तार करायचा की पुनर्रचना हे मुख्यमंत्री ठरविणार आहेत.

ग्राम पंचायत निवडणूक लक्ष्य

शनिवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याच महिन्यात दोन टप्प्यात होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यात आली आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार नसली तरी भाजप समर्थक उमेदवार किमान 80 टक्के विजयी होतील यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. लव्ह जिहाद व गोहत्या बंदी कायदा या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱया लाटेसंबंधीही चर्चा

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले आहेत. याकडे कार्यकारिणीचे लक्ष वेधतानाच कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. ही लाट थोपविण्यासाठी सरकारने केलेल्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे, असे भाजपचे प्रवक्ते कॅप्टन गणेश कार्निक यांनी सांगितले.

Related Stories

बसथांब्यांअभावी प्रवासी उन्हात

Amit Kulkarni

यशवंतपूर-पंढरपूर साप्ताहिक रेल्वेला जोडणार जादा डबा

Patil_p

संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

Amit Kulkarni

कंकणवाडीजवळ कासव विकणाऱया तरुणाला अटक

Tousif Mujawar

बेळगाव जिह्यातील आणखी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

उचगावात रेशन तांदळाचा काळाबाजार

Amit Kulkarni
error: Content is protected !!