Tarun Bharat

लसीकरणासाठी ‘सीमोल्लंघन’ ठरतेय वादाचा मुद्दा

गोव्यातील नागरिकांच्या दोडामार्गातील लसीकरणास घेतला जातोय आक्षेप : शासनाने वेळीच स्पष्टिकरण करणे गरजेचे

गणपत डांगी / साटेली-भेडशी:

कोरोना लसीकरण मोहिमेत दोडामार्ग तालुक्यात स्थानिक व बाहेरील राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱया लसीमुळे वादविवाद निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबद्दल जबाबदार शासन प्रतिनिधी किंवा आरोग्य विभागाने खुलासा करणे आवश्यक आहे. अन्यथा हा प्रश्न गोवा आणि सिंधुदुर्गमध्ये नवा वाद निर्माण करणारा ठरू शकतो.

दोडामार्ग तालुका हा गोवा राज्याच्या सीमेलगत असून बऱयाच सेवासुविधा घेताना दोघांही राज्यातील नागरिकांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. बऱयाचंदा या सेवांमध्ये अनेक अडचणी समोर येऊन वादही निर्माण झाले. मात्र आता सर्व काही सुरळीत असताना नवीन वाद समोर आला आहे. गत चार दिवसांपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे. यात सरकारने ठरवून दिलेल्या मोबाईल ऍपद्वारे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने सगळेजण रजिस्ट्रेशन करीत आहेत. रजिस्ट्रेशन करताना समोर आलेल्या उपलब्ध पर्यायापैकी जवळ आणि सोयीस्कर लसीकरण केंद्र निवडण्याचे आहे. त्यात लगतच्या गोवा राज्यातील नागरिकांनी हे रजिस्ट्रेशन करताना त्यांना सोयीस्कर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील लसीकरण केंद्रांचा पर्याय निवडला व ते लस घेण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात दाखल होत आहेत.

आता त्यावरून वाद सुरू झाला आहे. यामध्ये गोव्याच्या नागरिकांना दोडामार्गला लसीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आरोग्य विभागानेही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच लस देण्यात येईल, असे फलक लसीकरण केंद्रावर लावले आहेत. त्यामुळे गोव्यातून लसीकरणासाठी आलेले नागरिक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यात वाद होण्याच्या घटना गेले दोन दिवस घडत आहेत.

काहींचे समर्थन, तर काहींचा विरोध

गोव्यातील नागरिकांना जे लसीकरण सुरू आहे, त्याबद्दल तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींकडून समर्थन आहे, तर काही लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला आहे. आरोग्य विभागाने यावर स्पष्टिकरण करणे आवश्यक आहे.

टोल, आरोग्य, पेट्रोल सेवेनंतरचा नवा वाद

गोवा-सिंधुदुर्ग आणि पर्यायाने दोडामार्ग-बांदा परिसरातील गावांचा गोवा सीमांशी नियमित संबंध येतो. त्यामुळे आवश्यक सेवासुविधांसाठी ताठर भूमिका ठेवणे दोन्ही राज्यांना परवडणारे नाही. मध्यंतरी अशाच भूमिकांमुळे त्या काळात अनेक वाद समोर आले. गोवा राज्यात टोल बसवण्यात आला, तेव्हा तर बरेच वाद निर्माण झाले. त्यावेळी सिंधुदुर्गवासीयांना टोलमधून सूट देण्यात आली. बांबोळी येथील आरोग्य केंद्र सुविधेत तोडगा काढण्यात आला. सिंधुदुर्गातील नागरिकांना पेट्रोल उपलब्ध करण्यात आले. आता जिल्हय़ातील बरेच लोक रोजगारासाठी गोव्यावर अवलंबून आहेत, तर काही गोष्टींसाठी गोवाही महाराष्ट्र पर्यायाने सिंधुदुर्गावर अवलंबून आहे. यापूर्वी उपस्थित झालेल्या काही मुद्दय़ांवर पर्याय निघाल्याने सद्यस्थिती सुरळीत होती. मात्र आता कोरोना लसीकरणामुळे नवा वाद समोर येण्याची चिन्हे आहेत.

शासनाने मार्गदर्शन करावे – ऐवाळे

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ऐवाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिली होती. मात्र सध्या 18 ते 44 दरम्यानच्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू असल्याने आणि कुणीही रजिस्ट्रेशन करू शकत असल्याने लगतच्या गोवा राज्यातील नागरिक रजिस्ट्रेशन करून दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना आपण लसीकरणासाठी नाकारू शकत नाही. गोव्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तेथून येथे येणाऱया नागरिकांनी ‘आरटीपीसीआर’ रिपोर्ट घेऊनच लसीसाठी यावे. लसीसाठी सरसकट येणाऱया गोव्यातील लोकांद्वारे येथील तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन मोठे संकट उभे राहू शकते. त्यामुळे गोव्याचे येणाऱया प्रत्येकाने ‘आरटीपीसीआर’ रिपोर्ट करावा. तसेच सध्या उद्भवलेल्या लसीकरण मोहिमेतील वादाबद्दल शासनाने योग्य ते मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले.

Related Stories

दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसची मासिक बैठक संपन्न

NIKHIL_N

रत्नागिरी : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर वाहनांची ‘गर्दीच गर्दी’

Archana Banage

सोनुर्ली जत्रोत्सव साध्या पद्धतीने

NIKHIL_N

अणुस्कुरा घाटात दरड कोसळून चार वाहतूक ठप्प

Patil_p

पर्यटनाची ब्ल्यू प्रिंट तयार करणार!

NIKHIL_N

दापोलीत डम्पिंग ग्राऊंडवर पाच कावळे मृतावस्थेत

Patil_p