Tarun Bharat

लस आवश्यकच: पण …..

कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लॉकडाऊन हटले असले तरी कोरोनाचा दुष्प्रभाव आजही कायम आहे. जगभरात लसीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतातही यासाठी वेगाने काम सुरु आहे. यादरम्यान अनेक दावेही केले जात आहेत. या सर्वांविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या  प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलेले मनोगत…

सर्वांत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,  आज कोरोनावरील लसींच्या तयारीबाबत कितीही दावे केले जात असले तरी अशा प्रकारच्या विषाणूप्रतिरोधक लसींची निर्मिती करणे हे प्रचंड क्लिष्ट आणि अवघड काम असते. साधारणतः अशा लसी विकसित होण्यास पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. पण आता त्या दीड वर्षांतच उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. तथापि, तयार होणारी लस ही प्रमाणित असली पाहिजे आणि तिचे कोणतेही गंभीर साईड इफेक्टस् असता कामा नयेत. यासाठी चाचण्यांची सर्व तपशीलवार माहिती नियामकांनी योग्य तर्हेने तपासणे गरजेचे आहे. आज ही प्रक्रिया वेगाने केली जात असली तरी कोटय़वधी लोकांना ही लस दिली जाईल, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

अनेकदा लाखो लोकांना जेव्हा लसी दिल्या जातात तेव्हा त्याचे काही दुर्मिळ साईड इफेक्टस्ही दिसून येतात. इतिहासात डोकावल्यास असे प्रकार एक-दोनदा घडल्याचे दिसून येईल. त्यामुळे लसीची चाचणी तिसर्या टप्प्यामध्ये आली याचा अर्थ ती यशस्वी झाली असे ठामपणाने सांगता येणार नाही. अनेकदा 10 पैकी 2 ते 3 जणांवरच यशस्वी परिणाम दिसून येतात. त्या परिप्रेक्ष्यातून पाहता जानेवारी 2021 च्या पूर्वी लस बाजारात येण्याची शक्यता मला दिसत नाही.

अशा वेळी अर्थातच उपचारांच्या पातळीवर लक्ष देण्याची गरज आहे. आजघडीला व्हेंटिलेटरची गरज असणार्या कोरोनाबाधित रुग्णांना डेक्सामेथाजोन हे औषध दिले जाते आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. दुसरीकडे रेमेडेसिविरमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रयोगशाळेमध्ये बनवण्यात आलेल्या सिंथेटिक अँटीबॉडींच्या चाचण्या सुरु आहेत. या मोनोक्लोनल अँटी बॉडी बचाव आणि उपचार अशा दोन्हींसाठी लाभदायक ठरणार्या आहेत. डॉक्टरही त्याबाबत प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वांबाबत सातत्याने निरीक्षण आणि अभ्यास करत राहणे गरजेचे आहे.

कोरोनाचा सर्वांत वाईट परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाला आहे. गेल्या चार-सहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शाळांमध्ये मुलांना शिक्षण, खेळ, इतरांशी भेटीगाठी यांसोबतच माधान्य आहारही दिला जातो. या सर्व गोष्टींपासून दीर्घकाळ दूर राहिल्याने शारीरिक आणि मानसिक पातळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर शाळा सुरु करण्याबाबत विचार करावा लागणार आहे.

 अर्थात यासाठी देशभरात किंवा राज्यभरात एकसमान नियम असू शकणार नाहीत.  त्या-त्या भागातील-क्षेत्रातील परिस्थिती लक्षात घेऊन नियम ठरवावे लागणार आहेत.

आपल्याकडे पारंपरिक वनौषधींपासून बनलेली काही औषधे निश्चितच चांगली आहेत. कदाचित यातील काही औषधे कोरोनापासून बचावासाठी किंवा उपचारांसाठी प्रभावी ठरू शकतीलही; परंतु आयुर्वेद असो वा ऍलोपॅथी उपचार असतो, त्याबाबत सखोल अभ्यास करुन मगच निष्कर्ष मांडले गेले पाहिजेत. ते दाखवण्यामध्ये जर आपल्याला यश आले तर ती जगाला भारताने दिलेली अमूल्य देणगी ठरेल. येणार्या काळात याबाबत काय घडते ते पाहावे लागेल.

Related Stories

पाणी आणि हृदयक्रिया

Amit Kulkarni

प्लाझ्मा थेरपीचा अंतरगात

Amit Kulkarni

व्हॅक्सिन डिप्लोमसी

Patil_p

रजोनिवृत्तीचे दुष्परिणाम

tarunbharat

अंडर आर्म्सचा काळपटपणा घालवायचा असेल तर…हे उपाय करून बघा

Kalyani Amanagi

फळांचा रस आणि मधुमेह

Amit Kulkarni