Tarun Bharat

लस घेताच चक्कर येऊन महिलेचा मृत्यू

तिर्लोट उपकेंद्रातील घटनाः शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण होणार स्पष्ट- बगळे

वार्ताहर / देवगड:

देवगड तालुक्यातील तिर्लोट प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही वेळातच चक्कर येऊन योगिता गणपत घाडी (58, रा. तिर्लोट गाववाडी) या बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती देवगडचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतील जिल्हय़ातील ही पहिलीच घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी योगिता यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. मात्र, नंतर खुर्चीवर बसल्यावर काही वेळातच त्यांना चक्कर आली व त्या बेशुद्ध पडल्या. तेथील आरोग्य कर्मचाऱयांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी घोषित केले.

देवगडचे पोलीस निरीक्षक बगळे, उपनिरीक्षक शेखर सावंत, हवालदार एस. डी. कांबळे, एफ. जी. आगा, महेंद्र महाडिक यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात जात पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच देवगडच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, पं. स. उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सचिव रामकृष्ण जुवाटकर, तिर्लोट सरपंच राजन गिरकर यांनी रुग्णालयात धाव घेतली.

‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेदरम्यान योगिता यांचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन तीन तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ देवगड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. विच्छेदनाच्या अहवालानंतरच योगिता यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची नेंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बगळे यांनी दिली.

प्रकरणाचा तपास विजयदुर्ग पोलिसांकडे

विच्छेदनानंतर योगिता यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची खबर पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आशिष मोहोड यांनी देवगड पोलिसांत दिली. ही घटना विजयदुर्ग पोलीस स्थानकाच्या हद्दीतील असल्याने हे प्रकरण तपासासाठी विजयदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही बगळे यांनी सांगितले.

योगिता या गावामध्ये मोलमजुरीची कामे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होत्या. त्यांचे पतीही गावामध्ये मोलमजुरीची कामे करतात. पश्चात पती, तीन विवाहित मुली, एक अविवाहित मुलगी, अंध मुलगा असा परिवार आहे. योगिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तिर्लोटमधील लसीकरण थांबविले

योगिता यांनी तिर्लोट उपकेंद्रात सातव्या क्रमांकावर कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. हा डोस घेतल्यानंतर त्यांना काही वेळातच चक्कर आली व त्या बेशुद्ध पडल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपकेंद्रात एकच गेंधळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तेथील लसीकरण मोहीम तात्काळ थांबविण्यात आली. योगीता यांच्याअगोदर डोस घेतलेल्या सर्व लसधारकांना लसीचा कोणताही त्रास झाला नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Related Stories

जागतिक वारसास्थळांसाठी राज्याकडून कातळशिल्पासह दोन प्रस्ताव

Patil_p

साताऱयात पोलीस भरती प्रक्रियेस प्रारंभ

Patil_p

आमदार राणेंकडून डिझेल, वाहन उपलब्ध

NIKHIL_N

सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

NIKHIL_N

डिचोलीत भाजपतर्फे राजेश पाटणेकर यांनाच उमेदवारी

Abhijeet Khandekar

चिपळुण महापुराचे खापर फुटले पावसावर..!

Patil_p