Tarun Bharat

लस मिळविण्यासाठी उचगावात अरेरावी

आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर-पोलिसांना बोलावून गर्दीवर आणले नियंत्रण : व्यवस्थित लस पुरवठा करण्याची मागणी

वार्ताहर / उचगाव

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी गुरुवारी प्रचंड गर्दी करून अरेरावी केली. काही नागरिकही डॉक्टर-कर्मचाऱयांवर अरेरावी करत आहेत. काहींनी डॉक्टरांशी हुज्जतही घातली. त्यामुळे आरोग्य केंद्र प्रमुख आणि पोलिसांना पाचारण करुन गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले.

 येथील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी या भागातील अनेक नागरिक सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येते आहे. मात्र, आरोग्य केंद्राला मिळणारा लसीचा पुरवठा एकदमच कमी आहे. त्यातच रोज नियमित पुरवठाही केला जात नाही. परिणामी नागरिकांची गैरसोय होते.

काकती पोलिसांना पाचारण 

गुरुवारी महिना, तीनमाही व सहामाही डोस घेण्यासाठी आलेल्या बालकांची गर्दी अधिक होती. तर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या गरोदर, बाळंतिण, अपंग आणि विद्यार्थी यांच्यासाठी 200 कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस मिळाला होता. आरोग्य केंद्राच्या समोर जवळपास चारशे ते पाचशे लोकांनी गर्दी केली होती. यामध्ये पहिला डोस घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. मात्र त्याठिकाणी पहिला डोस आलाच नव्हता. तरीपण नागरिक लस द्या अशी विनवणी करून गर्दी करत होते. सध्या आलेला दुसरा डोस होता. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने रोज किमान 500 लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, आरोग्य खाते व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे. सकाळपासून गर्दी वाढतच गेल्याने  दुपारी एकच्या सुमाराला काकती पोलिसांना बोलावून गर्दी हटविण्याची वेळ या आरोग्य केंद्रावर आली.

या भागातीलच नागरिकांना लस द्या

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कर्नाटक, महाराष्ट्र सीमा हद्दीवर असल्याने महाराष्ट्रामधून अनेक नागरिकांची वेगवेगळय़ा मार्गाने या भागात ये-जा सुरू असते, बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावर बाची या गावाजवळ पोलिसांची गस्त आहे. तसेच देवरवाडी, महिपाळगड, सुंडी, शिनोळी या भागातून बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, कोनेवाडी, कल्लेहोळ अशा या सीमा हद्दीत असलेल्या गावातून अनेक नागरिकांची सातत्याने ये-जा सुरू असते. शेतीनिमित्त अनेक शेतकऱयांना या गावातील नागरिकांशी सातत्याने संपर्क येतो. ते नागरिकसुद्धा लस घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत. यासाठी उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे अतिशय महत्त्वाचे केंद्र असून या केंद्रामध्ये याच भागातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी या भागातील जनतेची आहे. या केंद्रांमध्ये रोज किमान दोनशे लोक लस घेण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावत आहेत, मात्र आठवडय़ातील एक किंवा दोन दिवस लस उपलब्ध करून दिली जात आहे. परिणामी विनाकारण नागरिकांना या आरोग्य केंद्राकडे हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. कामधंदा सोडून लस घेण्यासाठी या आरोग्य केंद्राकडे यावे लागत आहे. लसची प्रतीक्षा करत असताना काही वेळेनंतर लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या लोकांना परत माघारी फिरावे लागते. यात कामगार वर्गांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.

 रोज किमान 500 कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करा

यासाठी आरोग्य खाते व जिल्हाधिकाऱयांनी तातडीने सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये रोज किमान 500 कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधकची पहिली लस घेतली नाही आणि जे दुसऱया लसीच्या प्रतीक्षेत आहेत. अशानाही आरोग्य खात्याकडून लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

Related Stories

कचरा उचल करण्यासाठी पैशांची मागणी

Amit Kulkarni

इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्सकडे विद्यार्थ्यांचा कल

Amit Kulkarni

…तर सहकारी संस्था अधिक मजबूत होतील!

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

Amit Kulkarni

चार महिन्यांपासून धोकादायक विद्युत टॉवरकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

सिद्धारुढ स्वामींचा सोहळा उद्यापासून

Amit Kulkarni