Tarun Bharat

लस हेच अस्त्र

‘कोविड 19’ या विषाणूने अल्पावधीत जगाच्या कानाकोपऱयात शिरकाव केला असून, संपूर्ण जगच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती एखाद्या शिस्तबद्ध सैनिकासारखा या विषाणूशी लढा देत आहे. प्रथिनांच्या कवचात लपेटलेल्या एका सूक्ष्म निर्जीव घटकाने पृथ्वीतलावरील सजीव मानवी प्राण्याला संसर्ग करून अक्षरशः बेजार करून सोडले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अधिपत्याखाली अत्यंत प्रगतशील जगातील अशा पद्धतीची ही पहिलीच लढाई म्हणावी लागेल.  धर्म आणि साम्राज्य विस्तारासाठी यापूर्वी अनंत झगडे झाले आहेत. पण कोरोनाविरोधातील लढाई जात, धर्म, वंश, प्रांत या पलीकडे जाऊन पोहोचली आहे. पारंपरिक युद्धशास्त्राच्या संकेतापेक्षा हे जरा वेगळेच प्रकरण आहे. म्हणूनच सध्या कोरोनाच्या विरोधात जे तंत्र वापरले जात आहे त्याला युद्धनीतीमध्ये विशेष महत्त्व आहे. युद्धशास्त्र सांगते, ‘शत्रूशी प्रत्यक्ष न लढता त्याचे दमन करावे, अथवा त्याच्यावर विजय मिळवावा.’ सध्या कोरोनाविरोधात याच पद्धतीचे युद्ध सुरू आहे. बंद दाराआड घरात राहूनच जो तो लढतो आहे, स्वतःचे रक्षण करतो आहे. पण आता हे तंत्र जास्त काळ परवडणारे नाही. कोरोनाच्या थैमानामुळे जग ठप्प आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल अगोदरच बिकट अवस्थेतून धीम्या गतीने सुरू होती.विषाणूमुळे त्याला फार मोठी खीळ बसली.‘लॉकडाऊन’आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे अर्थव्यवस्थेचे चाक अधिकच खोलवर रूतले. ते बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड-दोन वर्षांचा दीर्घकाळ जावा लागेल, असे तज्ञ सांगतात. भविष्यात आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि दारिद्रय़ याचा कठोर सामना करावा लागेल. ‘कोविड 19’ ला अटकाव करण्यासाठी जगभरातून उपाययोजना सुरू आहेत. या माध्यमातून या विषाणूला जेरीस आणण्यात अल्प का होईना यश आले आहे.  पण अशा बिकट आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना विषाणूला जायबंदी करण्यासाठी सर्वात जर जहरी अस्त्र कुठले असेल तर ते म्हणजे कोरोनावरील प्रभावी औषध किंवा लस. हेच अस्त्र या विषाणूला आता रोखू शकते. पण दुर्दैवाने आपल्याला त्यामध्ये अद्याप यश मिळालेले नाही. ‘कोविड’ विषाणू विद्युतगतीने फैलावण्याचे कारणच हे आहे की, यावर अद्यापपर्यंत प्रभावी लस अथवा औषध उपलब्ध नाही. वास्तविक सार्स आणि कोरोना यापासून आपणास धडा घ्यावा लागेल, तो म्हणजे मानवी श्वसनसंस्थेवर हल्ला करणारे बहुरुपी रोग येत राहतील, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. या दृष्टीने भविष्यात आपली सर्व प्रकारची तयारी असायला पाहिजे. कोरोनावरील लस अथवा औषध बाजारात कधी उपलब्ध होईल, संशोधनाचे काम सध्या कुठल्या टप्प्यात आहे, रोजच्या बंदिस्त जीवनातून सुटका कधी होणार असे अनंत प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. म्हणूनच ही लस लवकरात लवकर उपलब्ध होणे गरजेचे आहे.  लसनिर्मितीच्या कालावधीबाबत जगभरातील संशोधकांमध्ये भिन्न मतप्रवाह आहेत. काहींच्या मते याला वर्षा-दीड वर्षांचा कालावधी लागेल तर काही जण म्हणतात, जूनपर्यंत लस उपलब्ध होईल. जगभरातील विषाणू शास्त्रज्ञ यासाठी अथक संशोधन करत आहेत. विषाणू प्रतिबंधक लस विकसित करण्याचे विविध टप्पे आणि त्यातील गुंतागुंत पाहता अजूनही वर्ष-दीड वर्षाचा काळ लागू शकतो, हे मात्र निश्चित. कारण प्रारंभी लशीचा प्रयोगशाळेत शोध लावला जातो.सर्वसाधारणपणे त्याचा पहिला प्रयोग उंदीर अथवा तत्सम प्राण्यावर केला जातो. यामधून दुष्परिणाम अणि लशीच्या प्रभावाचा अभ्यास केला जातो.परंतु कोरोना प्रकरणामध्ये याला फाटा देत  प्रथमच  या लशीचा उपयोग थेट मानवावर केला जात आहे. लस संशोधन मार्गातील हे वेगळे वळण मानावे लागेल.  चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी लस संशोधन प्रक्रियेत सध्या आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात मोजक्या व्यक्तींवर चाचणी घेतल्यानंतर पुढच्या टप्प्यात जरा अधिक व्यक्तींवर चाचणी घेतली जाते. या काळात त्यांच्यावरील दुष्परिणामांचा अभ्यास केला जातो.  मग  अंतिम टप्प्यात हजारो लोकांवर चाचणी घेतली जाते. ठरावीक काळ अथवा काही महिने प्रतीक्षा केली जाते. समाधानकारक निष्कर्ष आल्यानंतरच उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. उत्पादन म्हटल्यानंतर परवाने, मंजुरी, कारखान्याची निर्मिती या गोष्टी आल्या. सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था गटांगळय़ा खात आहे. उद्योगपती आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे औषध आणि लशीचे ‘मास प्रॉडक्शन’ हे फार मोठे आव्हान असणार आहे. शिवाय लसीकरणाच्या प्राधान्यक्रमात गरीब-श्रीमंत देशांमधील चढाओढ आली. विशेष म्हणजे जगभरातील अब्जावधी लोकांपर्यंत ती पोचायला हवी. म्हणूनच वर्ष-दीड वर्षाचा काळ अपेक्षित आहे. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी पोलिओ विषाणूने जगभर थैमान घातले होते.  या साथीमुळे लाखो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या. तत्कालीन परिस्थितीत पोलिओ विषाणूवर लस शोधण्याचे जगभरातील शास्त्रज्ञांसमोर फार मोठे आव्हान होते. तब्बल 50-60 वर्षांनी त्यांना यश मिळाले. शंभर वर्षांहून अधिक काळानंतर जग पोलिओमुक्त झाले. भारतात तर 1995 ला पल्स पोलिओ योजना सुरू झाली. 2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 100 टक्के पोलिओमुक्त जाहीर केले. देश पोलिओमुक्त करण्यासाठी आपली 25 वर्षे गेली. परंतु आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानामुळे ‘कोविड 19’ वरील लस तुलनेने लवकर विकसित केली जाईल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. सुमारे 80 कंपन्या आणि संशोधन संस्था यासाठी झटत आहेत. यातील पाच जणांनी काही व्यक्तींवर 16 मार्चला या लशीची यशस्वी चाचणी घेतली आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे लस संशोधन यात्रेत सहा भारतीय कंपन्यांचा सहभाग आहे. सी. व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, होमी भाभा यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांची आपल्यालाही परंपरा आहे. आपल्या शास्त्रज्ञांकडूनही यश अपेक्षित आहे. संशोधन सिद्धतेचा आपला आत्मविश्वास आणि आपल्या शत्रूची ओळख हे लढाई जिंकण्यासाठी पुरेसे आहे. लस बाजारात येईपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, हात धूत राहा, हाच बोधमंत्र घेऊन लशीची प्रतीक्षा करावी लागेल.

Related Stories

कोण कोणाची तूं कन्या?

Patil_p

आरोप-प्रत्यारोपाने प्रश्न सुटणार का ?

Patil_p

काही हरकत नाही

Patil_p

नद्यांचे बिघडते आरोग्य

Patil_p

अष्टमहिषी वेगळय़ा तिया

Patil_p

सीमोल्लंघन कुणाचे?

Patil_p