Tarun Bharat

लाकूड तस्कर टोळीचा वनकर्मचाऱयांवर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी / शाहूवाडी

खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱया टोळीने वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कर्मचाऱयांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर पेरीड गावच्या वनहद्दीत ही घटना घडली. वनरक्षक राजाराम बापू राजीगरे हे जखमी झाले आहेत. मलकापूर वनपरिक्षेत्राचे नंदकुमार नलवडे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाचे कर्मचारी वनपाल संजय कांबळे, वनरक्षक राजाराम राजीगरे, दिनकर पाटील, सर्जेराव पोवार, वनसेवक रामचंद्र केसरे यांच्यासह वनविभागाचे गस्ती पथक पेरीड-शिरगाव वनविभागाच्या हद्दीत गस्त घालीत होते. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पेरीड गावच्या जंगलात  कमांडर गाडी संशयास्पद उभी असल्याचे आढळून आले. चारजण  मौल्यवान खैर जातीची लाकडे गाडीत भरत असल्याचे वनकर्मचाऱयांच्या निदर्शनास आले. त्यांना रोखले असता संशयित वसंत पाटील व भगवान सावंत या दोघांनी वनकर्मचाऱयावर चॉपर उगारून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्यासाठीं आलेल्या वनकर्मचारी राजाराम राजिगरे यांना उंचावरून  ढकलून दिले. संशयित चौघेजण कमांडर गाडीत बसून भरघाव वेगाने निघाले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणऱया वनकर्मचाऱयांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून हे सर्वजण पसार झाले. परिसरामध्ये शोध घेतला असता एक दुचाकी मिळून आली.

खैराच्या लाकडासह मुद्देमाल जप्त

वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या गस्ती पथकाने वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील संशयित आरोपी  वसंत पाटील राहत असलेल्या पेरीड येथील राहत्या घराजवळ पथक गेले. त्याठिकाणी कमांडर गाडी उभी होती. गस्ती पथकाला पाहताच वसंत पाटील, भगवान सावंत यांच्यासह चारजण गाडीसह पसार झाले. घराच्या पाठीमागे पोत्यात भरून ठेवलेले खैर जातीच्या लाकडाचे साल तुकडे पोते, कटर मशीन , चैन, ड्रील मशीन, ग्राइंडर, हात करवत, तासणी, होंडा जनरेटर, भाला, चॉपर सापडले. दुसरा संशयित भगवान सावंत याच्या घराची तपासणी केली असता दोन कटर मशीन कुऱहाड, खैर लाकडाची पोती मिळून आली. शिक्षक तानाजी महादेव सावंत (रा. शिरगाव) याच्या शेतातील पड जामिनीमध्ये खैर लाकूड फोडुन बारीक करण्याचे तीन खुंट रोवलेले सापडले. यावेळी  75 हजार रूपयाचा मुद्देमाल वनकर्मचाऱयांनी जप्त केला. या प्रकरणातील चौथ्या संशयिताचे नाव समजू शकले नाही.  ही कारवाईवन अधिकारी नंदकुमार नलवडे , वनपाल संजय कांबळे , राजाराम राजिगरे, दिनकर पाटील, सर्जेराव पोवार, रामचंद्र केसरे, जयसिंग पाटील आदींनी केली.

Related Stories

कोल्हापूर : आईचा खून करुन काळीज खाणाऱ्या विकृतास मरेपर्यंत फाशी

Archana Banage

इचलकरंजीत बनावट मद्यासह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

एसटी हिंसाचारप्रकरणी पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल

Abhijeet Khandekar

विमानतळाबाबत माजी पालकमंत्री सतेज पाटील “काय” म्हणाले वाचा

Kalyani Amanagi

कोल्हापूर : यंदाही पाळणार बंधन, लहान मूर्तीलाच वंदन

Archana Banage

जरळीचे जवान उदय घुगरे यांच्यावर अंत्यसंस्कार

Archana Banage