दोन वर्षानंतर आदमापूरात भाविकांची मांदियाळी: हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाचा लाभ
प्रतिनिधी/ सरवडे (विजय पाटील)


दोन वर्षानंतर झालेली अलोट गर्दी,ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज,सगळीकडे पसरलेले भक्तिमय वातावरण, दर्शनासाठी लागलेल्या लांब रांगा, पायी दिंड्या, भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण, धार्मिक कार्यक्रमांनी बहरलेला परिसर, महाप्रसादाने तृप्त होणारे भाविक आणि संत बाळूमामांचा जय घोष अशा भक्तीच्या सुख सोहळ्याने क्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथे भंडारा उत्सव अमाप उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेश व गोवा राज्याचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील सदगुरू बाळूमामांचा भंडारा लाखो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा होतो. कोरोनामुळे सलग दोन वर्षी भंडारा यात्रा झाली नव्हती. यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांनी मोठ्या उत्साहात भंडारा सोहळ्याचा आनंद घेतला. यात्रेनिमित आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
दोन वर्षांनी यात्रा होत असल्याने विविध ठिकाणांहून भाविक चार दिवस अगोदरच मंदिर पारिसरामध्ये दाखल झाले. गेले आठवडाभर मंदिरात किर्तन, प्रवचन, भजन अशा कार्यक्रमांचे दररोज आयोजन करण्यात आले. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून आदमापुरात भाविकांची गर्दी दिसत होती. जागर व भाकणूक कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांचा गजरात भंडारा उधळत गावातील प्रमुख मार्गावरुन पारंपरिक शोभायात्रा व रथातून निढोरी आदमापूर या मार्गावर बाळूमामांच्या चांदीच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत सहभागी झालेले हजारो भाविक भंडाऱ्यात न्हावून निघाले.
दररोजच्या महा पूजेबरोबर बाळूमामांच्या गाभाऱ्यात जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरास नेत्रदिपक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराचा मंडप व दीपमाळ विद्युत रोषणाईने उजळू निघाला होती. तसेच बाळुमामा मंदिरासमोर सुरेख व विविध रंगात काढलेली भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. बुधवारी सकाळी पालखी सोहळा सुरू झाला. गावातील प्रमुख मार्गावरून मरगुबाई मंदिर, विहीर, हनुमान मंदिर, भोसले सरकार वाडा व परत बाळुमामा मंदिर अशी पालखी यात्रा काढण्यात आली. ढोलांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करीत हा सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.
यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभले. राधानगरी, गारगोटी व कोल्हापूर आगारांनी एस. टी. बस ची सुविधा केली होती. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग व सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोट्यवधीची उलाढाल
आदमापूरच्या भंडारा यात्रेला विविध राज्यांतून लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. गेले दोन वर्षे यात्रा रद्द केल्याने या यात्रेत होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यावर्षी यात्रेला लाखो भाविक जमल्याने आदमापूर व परिसरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. विविध स्टाॅल, दुकाने, खाद्यपदार्थ, याठिकाणी गर्दी दिसून येत होती. भाविकांनी ग्रामस्थ व मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यात्रा सुरळीत पार पाडल्याबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम,विश्वस्त व सरपंच विजय गुरव यांनी आभार व्यक्त केले.