Tarun Bharat

लाल मातीचं ऑस्कर

दीपक प्रभावळकर, सातारा
 
साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलात एक, दोन नव्हे तर तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरीसाठी शड्डू घुमणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 सालची. तर महाराष्ट्रातील अव्वल पैलवान ठरणारी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 1961 साली सुरू झाली. पै. मामासाहेब मोहोळ यांनी आपल्या अथक परिश्रमातून कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र केसरीचा पसारा राज्यभर वाढवला. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांचे लक्ष वेधणारी ही स्पर्धा प्रचंड लक्षवेधी होऊ लागली आहे. कुस्तीगीर परिषदेच्या उन्नतीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे मामासाहेब मोहोळ यांना खऱया अर्थाने त्याकाळात सर्वतोपरी मदत व सहकार्य करणारे दोन सातारकर होते, ते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व लोकनेते बाळासाहेब देसाई. मामासाहेबांनी कुस्ती परिषदेसाठी या दोहोंना शब्द टाकावा आणि तो त्यांनी तत्काळ पूर्ण करावा, असे वातावरण होते. या भारलेल्या वातावरणात 1963 साली साताऱयात तिसरी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत फायनलची कुस्ती झाली नव्हती पण चटकदार कुस्त्या झाल्या.

त्यावेळच्या संयोजकांत एक नाव होते, पै. साहेबराव पवार यांचे. त्यानंतर 59 वर्षे ही स्पर्धा राज्यात अन्यत्र होत होती. साताऱ्याला स्पर्धा व्हावी, अशी सातारकरांची इच्छा होती, तसे प्रयत्नही झाले. परंतु यावर्षी ते शक्य झाले. 1963 साली ऐन उमेदीत असणारे पै. साहेबराव पवार आज वयाच्या 97 व्या वर्षात आहेत. या स्पर्धा साताऱयात होण्याचे सर्वाधिक समाधान साहेबराव पवारांना आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही स्पर्धा यावर्षी साताऱयाला दिली.  

महाराष्ट्रातील अव्वल मल्ल दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून ठरवला जातो. वर्षभर शेतकऱ्याची, सर्वसामान्यांची मुलं तालमीत घाम गाळतात. या स्पर्धेसाठी तयार होतात. त्यानंतर या स्पर्धेचा शड्डू घुमतो. लाल मातीतील आखाडय़ातील कुस्तीचे ऑस्कर म्हणून महाराष्ट्र केसरीचा उल्लेख केल्यास वावगे ठरू नये. कुस्तीत सातारा जिल्हय़ाचा असणारा इतिहास अन्य कुणालाही नाही. 1952 सालच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सातारा जिल्हय़ाचे सुपूत्र पै. खाशाबा जाधव यांनी देशाचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्यानंतर श्रीरंगआप्पा जाधव यांनीही ऑलिम्पिकमध्ये धडक मारली होती. गेल्या 64 वर्षात 4 महाराष्ट्र केसरी सातारा जिल्हय़ाने दिले. उपमहाराष्ट्र केसरीही दिले. कुस्तीगीर परिषदेला प्रारंभीच्या काळात राजाश्रय देणारे नेतेही साताऱ्याचे होते.

या साताऱ्यात अलिकडच्या काळात ही स्पर्धा झाली नाही, याचे वैषम्य वाटते. परंतु जिल्हा तालीम संघ, कुस्तीगीर परिषद आणि शरद पवार यांच्यामुळे ही स्पर्धा साताऱ्यात होतेय, याचे समाधान आहे. आजपासून स्पर्धा सुरू होतील, शाहू क्रीडा संकुलात पैलवानांचे शड्डू घुमतील. परंतु या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन सातारा जिल्हय़ाच्या मल्लविद्येला उभारी मिळावी त्याचबरोबर घरोघरी मल्ल तयार व्हावेत, इथल्या लाल मातीतून ऑलिम्पिकवीर खाशाबा, श्रीरंगआप्पांचे वारसदार तयार झाले तर या स्पर्धेचे फलित होईल. त्यातही यंदाचं मैदान पहिल्यांदाच दोन वर्षांच्या फरकानं भरतं आहे.

मल्लविद्येचं सार शोधणारी घुसळण व्हायचीय. उगा धिप्पाड असला म्हणजे पैलवान होत नसतो. नुसत्या मनगटाच्या ताकतीचा पैलवान नव्हे तर मनगटाच्या ताकदीला मन-मेंदूची जोड असल्याशिवाय पैलवानाचा बाज नाय. ज्या साताऱयानं स्वराज्याचं साम्राज्य केलं तिथं यंदा मानकरी ठरणार आहे. त्यामुळेच यापुढे राजधानीतली ही माती यापुढं हिंदकेसरी आणि इंटरनॅशनल रेस्लर्र ठरवण्याच्या ताकद या कुस्तीला देईल, हा विश्वास बाळगतोय…..!

Related Stories

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

Tousif Mujawar

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यात औंधकरांना यश

Archana Banage

नागपंचमीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

श्रीकांत दातार यांचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले…

Tousif Mujawar

कोरोना लस संशोधनात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

Archana Banage

सातारा : रायगाव फाट्यावर मालट्रक पलटी

datta jadhav