प्रतिनिधि
पणजी
काँग्रेसचा ’हात’ सोडून तृणमुलला ’साथ’ देण्यासाठी आमदारकीसह काँग्रेसचाहि राजीनाम दिलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आणि इतरांचे मंगळवारी कोलकाता विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले.
आज बुधवारी सकाळी ते सर्वजण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलकाँग्रेसमध्ये रितसर प्रवेश करणार आहेत. फालेरोसोबत गेलेल्या मान्यवरांमध्ये प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस अॅड. यतिश नाईक व विजय पै, फोंडय़ाचे माजी मगो आमदार लवू मामलेदार, अॅड.आंतोनियो दा कोस्टा, मारियो पिंटो, पंकज कामत, साहित्यिक एन. शिवदास आणि आनंद नाईक यांचा समावेश आहे.
फालेरो यांनी सोमवारी पर्वरी विधानसभेत जाऊन सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यांचाहि राजीनाम सादर केला होता. त्यांच्या सोबत कोलकाता येथे गेलेल्या अन्य सर्व पदाधिकार्यांनीहि सोमवारीच आपापल्या पदांचा राजीनामा काँग्रेस हाऊसमध्ये पाठवून दिला होता. त्यानंतर सायंकाळी पणजीत आयोजित पत्रकार पाfरषदेत त्यांनी ममता बॅनर्जी या ’रणरागिणी’ असल्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभर कौतुक केले होते. मात्र आपण तृणमुलमध्ये नक्की केव्हा प्रवेश करणार ते स्पष्टपणे सांगण्याचे टाळले होते.
दरम्यान, कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर तृणमुलचे राज्यसभा खासदार डॉ. शंतनू सेन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी ममता सरकारमधील दोन मंत्रीहि उपस्थित होते.