वार्ताहर / शिये (कोल्हापूर)
लॉक डाऊनचा फटका बसलेल्या मजुरांना भुयेवाडीतील शिक्षकाकडून वैयक्तिक स्वरूपात मदत देण्यात आली. त्यांच्या या मदतीमुळे कठीण प्रसंगातही ” समाजातील दातृत्व अजूनही संपलेले नाही “, अशीच काहीशी प्रचिती येत आहे. भुयेवाडी (ता. करवीर ) येथील शिक्षक जनार्धन पाटील व त्यांच्या पत्नी सौ.धनश्री पाटील यांनी परिसरातील मजुरांच्या तीस कुटुंबांना दहा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सूचना देऊन त्यांनी या मजूर कुटुंबियांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही केले.
“रस्ते, जलवाहिनी खुदाई व गुऱ्हाळ घर मजुरांना लॉक डाऊन चा फटका “अशा आशयाची बातमी ३१ मार्च रोजी दैनिक “तरुण भारत” मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत भुयेवाडी येथील पाटील दांम्पत्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जनार्दन पाटील यांनी भुयेवाडी येथील खुदाई मजुरांना,व निगवेतील ज्योतिर्लिंग हायस्कूल जवळ असणाऱ्या खुदाई मजुरांना तसेच भुये व भुयेवाडीतील काही शेतमजुरांनाही गहू, तांदूळ, रवा, साखर, चहापावडर, गोडेतेल, साबण असे सुमारे आठ हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप केले. साहित्य वाटप करताना पाटील दाम्पत्यांनी या मजुरांना हात धुणे, तोंडाला मास्क वापरणे, तसेच कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना सांगितल्या.
कोरोनाचा विषाणूंचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सर्वांना जिथे असाल तिथे थांबण्याचे आदेश दिले.मात्र त्यांची उपासमार होणार नाही याची कोणत्या प्रकारची दक्षता घेतलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करून काही भ्रमणध्वनीचे क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वान पर्यंत पोहोचविले गेले. पण या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तुम्हीच समाजातील दानशूर व्यक्तींना भेटून मदत घ्या, असे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासन संबंधितांची कोणतीही काळजी घेताना दिसत नाही.


previous post