सुशांत कुरंगी
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु या काळातही सामाजिक वसा जोपासणाऱया लोकमान्य सोसायटीने आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजवर अनेक रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत वेळेत पोहोचविण्यात आले आहे. अनेक मृतांचे शव घेऊन जाण्याचे कामही केले आहे. त्यामुळे शहर जरी थांबले तरी लोकमान्यच्या रुग्णवाहिकेची चाके वेगाने धावत आहेत.
1990 साली टिळकवाडी सेवा संघ व ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका सुरू करण्यात आले. लोकमान्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून काही तरुणांनी एकत्रित येऊन या सेवेची सुरुवात केली. त्यावेळी उद्योजक, व्यापारी यांनी या उपक्रमाला मदत केली. चंदा पै, नारायण पै, नंदकुमार सराफ तसेच बेळगावच्या गल्ल्यांमधील पंचमंडळांनी यासाठी सहकार्य केले. निधी जमा करून एक रुग्णवाहिका व्हॅन सुरू करण्यात आली. लोकमान्यचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर यांनी पुढाकार घेऊन ही सामाजिक चळवळ उभी केली.
1999 मध्ये लोकमान्य सोसायटीतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली. लोकमान्यने अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केली. त्या काळात शहरात मनपाचीच शववाहिका असल्याने ती सेवा अपुरी पडत होती. त्यासाठी लोकमान्यने शववाहिका सुरू करण्याचे ठरविले. आज सुसज्ज अशी एक रुग्णवाहिका व एक शववाहिका लोकमान्यच्या ताफ्यात आहे.
लॉकडाऊन काळातही सेवा
लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतुकीच्या सेवा ठप्प आहेत. परंतु लोकमान्यने आपली सामाजिक सेवा सुरू ठेवली आहे. या काळात 6 गरोदर मातांना हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात आले. चंदगड, खानापूर, बेळगाव तालुक्मयातील गरोदर मातांना या रुणवाहिकेमुळे वेळेत पोहचविता आले. 2 अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये वेळेत दाखल करण्यात आल्याने त्यांना जीवदान मिळाले. तसेच 12 रुग्णांना हॉस्पिटल व घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 17 मृत व्यक्तींचे शव त्यांच्या घरी पोहचविण्यात आले. सांगली, कोल्हापूर, हुबळी या भागातही रुग्णांना सोडण्यात आले आहे.
पंढरी परब (संचालक, लोकमान्य सोसायटी)


1990 नंतर उपनगरे वाढली व फ्लॅट पद्धत रुजल्याने रुग्णवाहिकेची गरज भासू लागली. लोकमान्यचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली. बऱयाच वेळा रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना सूट देण्यात आली आहे. लोकमान्यने सहकारातून सामाजिक, सांस्कृतिक वसा जोपासल्याचे त्यांनी सांगितले.
गजानन धामणेकर (संचालक, लोकमान्य सोसायटी)


टिळकवाडी सेवा संघटना व सेवा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्ण व शववाहिकेची सेवा सुरू करण्यात आली. नागरिकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱया लोकमान्यने सामाजिक वसा जोपासत मागील 30 वर्षांत ही सेवा सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद अजनकर (चालक)


लोकमान्यमध्ये मागील 10 वर्षांपासून सेवा करीत आहे. रुग्ण व शववाहिका चालविताना दिवस-रात्र सेवा करावी लागते. 1 हजार किलोमीटरपर्यंत रुग्ण घेऊन वाहने चालविली आहेत. मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, गोवा यासह जवळच्या शहरांमध्ये लोकमान्य रुग्णांची सेवा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल पाटील (चालक)
रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे नागरिकांना वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहचविणे गरजेचे असते. वेळेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न पोहचविल्यास त्याचा मृत्यूही होण्याची शक्यता असते. ही एक सेवा असल्यामुळे काम करण्यासाठी नवी उमेद मिळते, असे त्यांनी सांगितले.
लोकमान्य सोसायटीची एक रुग्णवाहिका तर शववाहिका आहे. ज्या गरजूंना रुग्ण व शववाहिकेची गरज असते, त्यांनी 9343185201 किंवा 9343185206 या क्रमांकाशी संपर्क साधावा. पाही वेळा वाहने बाहेरगावी गेली असल्यास नागरिकांना ती उपलब्ध होणार नाही. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
- 1990 पासून टिळकवाडी सेवा संघाच्या रुग्णवाहिका सुरू
- आजवर हजारो रुग्णांना मिळाली सेवा
- ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्ण व शववाहिका
- लॉकडाऊनच्या काळातही रुग्णांची केली जात आहे सेवा