Tarun Bharat

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी

प्रतिनिधी/बेळगाव

लॉकडाऊन होणार… नक्की काय…. माहीत नाही… चर्चा… अफवा… तर्कवितर्क यांना प्रचंड ऊत…. परिणामी बाजारपेठेत गर्दी उसळली…. बाजारपेठेत सध्या सामाजिक अंतराचा नियम पूर्णपणे धाब्यावर बसविण्यात आला आहे. खरेदीसाठी गर्दी उसळत असून कोरोनाच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे…. रविवारी लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ थंड होती, त्याचा जणू वचपाच सोमवारी निघाला, असे चित्र पाहायला मिळाले.

रविवारी शहरात, जिल्हय़ात आणि राज्यातसुद्धा रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली आणि तर्कवितर्कांना सुरुवात झाली. आता पुन्हा लॉकडाऊन करणे अपरिहार्य असाच सूर दिसून आला. मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर शहर आणि ग्रामीण येथे लॉकडाऊन जाहीर केले. बेंगळूरपाठोपाठ राज्यातील अन्य शहरांमध्ये आणि बेळगावमध्येसुद्धा लॉकडाऊन होणार यावर चर्चा सुरू झाल्या. समाज माध्यमांवर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत रात्रीच घोषणा केली, असा संदेशही व्हायरल झाला. अर्थात याबाबत कोणाकडेच खात्रीने कोणतीची माहिती नव्हती.

किमान एक आठवडा लॉकडाऊन होण्याची शक्मयता सर्वत्रच होती. कोरोना वाढलेल्या अकरा जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन होणार असा अंदाज व्यक्त होत होता. चर्चा, तर्क, सोशल मीडिया यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खरेदी उरकून घेतलेली बरी, असाच विचार नागरिकांनी केला. परिणामी सोमवारी बाजारपेठेत नेहमीपेक्षा गर्दी वाढली.

रविवारी लॉकडाऊनमुळे खरेदी करणे शक्मय झाले नव्हते. शनिवारी रात्री 8 पूर्वी घरी परतणे आवश्यक असल्याने साधारण 7 ते 7.30 नंतर लोकांनी घरी राहणे पसंत केले. अशा सर्वच घटकांनी सोमवारी खरेदीसाठी बाजारपेठ गाठली. बाजारात झालेली गर्दी पाहता लोकांना आता कोरोनाचे भय उरले नाही की त्यांना आता कोरोनासोबत राहण्याची सवय झाली आहे, असा प्रश्न निर्माण झाला.

दरम्यान, बाजारपेठेत भाजी आणि फळफळावळांची आवक प्रचंड प्रमाणात वाढली. सोमवारी केळी 40, डाळिंब 50 रुपये किलो, पपई 20 ते 30 किंवा 40 असा दर झाला. अननस 20 व 30 या दरात उपलब्ध होते. भाजी मंडईत बिन्स 30 रुपये अर्धा किलो, मटार 50 रुपये अर्धा किलो, मेथी 10 रुपये एक जुडी, गाजर 60 रुपये किलो, वांगी 30 रुपये अर्धा किलो, टोमॅटो 80 रुपये किलो, भेंडी 30 रुपये अर्धा किलो असा दर होता. मात्र लॉकडाऊन झाल्यास आणलेल्या भाजीचे नुकसान होणार असा विचार भाजी विपेते करत होते. लॉकडाऊन झाल्यास पुन्हा भाजी मिळणार नाही. त्यामुळे भाजी घेऊन ठेवलेली बरी, असा विचार ग्राहक करत होते. एकूणच ग्राहक आणि विपेते परस्परांचा अंदाज घेत, घासाघीस करून खरेदी-विक्री करत होते, हे विशेष.

धान्य दुकानातसुद्धा अशीच गर्दी होती. याबाबत दुकानदारांना विचारता दर सोमवारी अशी गर्दी असतेच. तथापि, लॉकडाऊनच्या चर्चेमुळे गर्दी वाढल्याचे दुकानदारांनी सांगितले. बेळगावच्या मुख्य भाजी मार्केटमध्ये म्हणजेच झेंडा चौक, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक या ठिकाणी गर्दी उसळली. मात्र निम्म्यापैकी अधिक लोकांना मास्कचे गांभीर्य नव्हते. पोलीस या ठिकाणी फार कमी वेळेला येतात. त्यामुळे लोक निर्धास्त होऊन मास्क न वापरण्याची बेपर्वाई दाखवितात, असे काही सुजाण नागरिकांनी सांगितले. 

Related Stories

ओला,सुक्मयासह आता इ-कचरा जमा करणार

Patil_p

यंदा दहावी परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर

Amit Kulkarni

ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटली

Patil_p

बनावट उतारे देणाऱयांचा मनपा घेणार शोध

Amit Kulkarni

फुलांच्या उधळणीत दौडचे स्वागत

Amit Kulkarni

शिवशक्ती, मि.परमार, रॉयल स्ट्रायकर संघ विजयी

Amit Kulkarni