Tarun Bharat

‘लॉकडाऊन’नंतरचा काळही सुसह्य आणि सुखी करूया

Advertisements

सध्या सगळीकडे वेगळे वातावरण आहे. आनंदी आणि हॅपी हॅपी दिसत आहे पण सगळे आभासी. एकजणही कबूल करायला तयार नाही की वस्तुस्थिती नक्की काय आहे?  प्रत्येक जण जाणून आहे. पण…. हा ‘पण’च बरेचसे काही खरे खरे जाणवून देतो. दर 20 वर्षानी पिढी बदलते म्हणतात. एकूण तीन पिढय़ांनी पहिल्यांदाच अनुभवली महामारी आणि देशभरातला लॉक डाऊन! वेगवेगळय़ा ग्रुपमधे आणि सोशल मीडियावर असे काही लिहीत आहेत. सगळेच, पुरुष, स्त्रिया, तरुण पिढी आणि वृद्धपण! या कोरोना व्हायरसमुळे जे काही लादले गेले आहे त्या लॉक डाऊनविषयी. इतर देशांचे सोडून देऊ, कारण जागतिक महामारी म्हटली की सगळेच होणार. पण आपण फक्त आपल्या देशातील, संस्कृतीतील लोकांचे बघू. जे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित नक्कीच आहे. सुशिक्षित वर्ग, जो बुद्धीजीवी आहे, तो बराचसा नोकरवर्गात मोडतो. त्यांची मुले एकतर शिकत आहेत अथवा नुकतीच नोकरीस लागली आहेत. या सध्याच्या लॉक डाऊनमुळे असे झाले आहे की ‘वर्क फ्रॉम होम’. काहीतरी निमित्त पण सगळे एकाच घरात बांधून ठेवल्यासारखे एकत्र आहेत. कामे करणारे ठरावीक वेळ काम करतात आणि इतर वेळात, आदर्श गृहिणीने आखलेल्या नियमानुसार घराची कामेही वाटून घेत आहेत. गृहिणीवर घरकामाचा ताण म्हणावा तेवढा नाही. नोकरदारवाल्यांचे आर्थिक नुकसान छदामही नाही. बँक खात्यात भला मोठ्ठा पगार जमा होतो. मग स्वतःचे छंद, शौक, लाड पुरवून घेत आहेत आणि हा लॉकडाऊन किती छान आहे, कुटुंबातील वातावरण खूपच सुंदर झाले आहे वगैरे गुणगान करत आहेत.

त्याखालोखालचा वर्ग पण मध्यमवर्गीयच. पण थोडा वेगळा. त्या घरातील स्त्रीला सध्या उसंत म्हणून नाही. कधी नाही ते घरचे सर्वजण एकत्र आहेत तर सर्वांच्या आवडीनिवडी पुरवत त्या घरच्या स्त्रीचा दिवस कसा संपतो तिचे तिलाही समजत नाही. त्यानंतर इतर व्यावसायिक. जीवनावश्यक गोष्टींशी निगडित नसलेले. त्यांचे व्यवसाय पूर्ण बंद आहेत. आणि कामगार विश्व. रोज घराबाहेर पडून, कष्ट करून जे मिळेल, जितके मिळेल त्यावर गुजराण करणारा वर्ग. त्यांचे तर सगळेच अधांतरी. तरीही शासन, काही समाजसेवा करणाऱया संघटना आणि समाजातील दातृत्वशील लोकांनी एकत्र येऊन या लोकांना रोज दोन्ही वेळचे जेवण देण्याचा उपक्रम चालू केला आहे. तयार जेवण किंवा शिधा देत आहेत.

काही वर्ग आर्थिकदृष्टय़ा बऱयापैकी स्थिरावलेला पण थोडा परावलंबी असतो. त्यांना इतरांनी दिलेली मदत फुकट स्वीकारायची मानसिकता नसते, हा तसा थोडा स्वाभिमानी वर्ग, त्यांचे सध्या काय आणि कसे चालू असेल, रोजचे जीवन जगण्यासाठी करावी लागणारी कसरत? सामाजिक जाणीव, गरिबांविषयीची भावना,

देशप्रेम, सामुदायिक समजूतदारपणा घरातल्या स्त्रीला सहकार्य, निसर्ग महत्त्व, प्राणीमात्रावरील दया, पैशांचे महत्त्व, गरजा, अनावश्यक खर्च, मीत्व, तुलना, स्पर्धा, सामाजिक भान/जाणीव, एकटय़ा राहणाऱया स्त्रिया/पुरुष, त्यांच्या समस्या, ज्यांनी कधी स्वयंपाक केलाच नाही अशा लोकांच्या जगण्यासाठी कराव्या लागणाऱया तडजोडी, लहान मुले सांभाळणारे एकाकी पालक, पाळलेले प्राणी, त्यांची होणारी ससेहोलपट, ज्यांना कुणाशीतरी भेटल्याशिवाय दिवस काढणे अशक्मयच अशा लोकांची बंदमधे असणारी मानसिकता, नवरा बायको मुले वेगवेगळय़ा गावात असताना गावेच्या गावे वेशीवर बंद केली असताना त्यांची होणारी कुचंबणा, एकाच गावात असलेल्या पालकाना भेटू न शकणारी नवीन तरुण पिढी, सरकारी यंत्रणेत कार्यशील असणारा पोलीस वर्ग, डोळय़ात तेल घालून, सामाजिक जबाबदारी पेलणारे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस, त्या संलग्न प्रणाली, सफाई कामगार

जगण्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. घरातले आणि घरात राहणाऱयासाठी राबणारे बाहेरचेही! असो.

सगळीकडे आलबेल दिसत आहे पण ते तसे खरोखरच आहे का हा संशोधनाचा विषय ठरावा. सध्याच्या परिस्थितीत मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून आशादायी राहणे गरजेचे आहेच. एकाच घरात सगळे एकत्र रहात आहेत पण प्रत्येकाला एक विशिष्ट स्पेस असते, खूप महत्त्वाची असते ती. कोणतेही नाते असले तरी स्पेसचे महत्त्व कमी होत नाही. भाऊ बहीण, आजी आजोबा, दीर भावजय, नणंद, आई मुले, अगदी नवरा बायकोसुद्धा! स्पेस मिळाली तरच ती व्यक्ती समाधानी राहू शकते. सध्याच्या काळात किती लोक आपापल्या घरातील व्यक्तींच्या स्पेसची काळजी घेताना दिसतात? किती घरात सगळा पुरुषवर्ग घरातील स्त्रियांच्या मदतीला पूर्ण शक्तीनिशी धावून आला आहे? खूप वेगळा आणि नाजूक विषय आहे हा. म्हटला तर सामाजिक आणि म्हटला तर वैयक्तिक!

प्राणी, पक्षी, निसर्ग, हवामान किती छान झाले आहे सध्या. थोडय़ाच दिवसानी लॉक डाऊन बंद होईल. पुन्हा नेहमीसारखी वर्दळ चालू होईल. कायमचे बदल होण्याची अपेक्षा आहे पण नक्की कुणाची? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मावेत पण इतरांच्या घरात, आपल्या नाही ही मनोवृत्ती बदलेल का? स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, स्पर्धेत पाय घट्ट रोवून आपलेच नाणे खणखणीत ठेवण्यासाठी म्हटले तर स्वार्थी जगणे सुरू होईल, सर्वांचेच! यात नक्की दोष कुणाचा? उत्तर फार अवघड आहे. विचार केला तरी डोके सुन्न होईल. कमी गरजांमधे काही दिवसाकरिता जुळवून, गोडवे गाणारे नंतर त्यांच्या गरजा सीमित ठेवू शकतील का? केवळ अशक्मय आहे. जवळच्या हॉटेलातील जेवण आवडत नाही म्हणून कित्येक कि.मी.चा प्रवास करून हॉटेलात जाण्याची सवय इतकी सहजासहजी बदलेल का? एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे? माणूस सवयींचा गुलाम असतो हेच खरे आहे. जसजसे नवीन शोध लागतात त्याप्रमाणे आपण त्या त्या सोयीचा वापर करत राहतो आणि आधीन होऊन जातो. यात नक्की दोष कुणाचा? मुळात हा दोष तरी कसा आणि का समजायचा? समजून घ्यायलाही खूप अवघड आहे हे सगळे. या महामारीमुळे जगातल्या सर्व देशांमध्ये आर्थिक घडी विसकटणार आहे. ती पूर्वपदावर यायला काही काळ जावा लागेल. तेव्हाही आपल्या सहनशक्तीचा कस लागणार आहे. जसे जुन्या पिढीने नवीन पिढीला उगीच नावे ठेवू नयेत, चांगले आणि वाईट गुण दोन्हीकडे असतातच, तसेच बदललेल्या काळाला उगीच नावे ठेवू नयेत. बदल होणे हा काळाचा स्थायी भाव आहे तो तसाच राहणार आणि आपण आहे तसाच स्वीकार केला पाहिजे. लग्न करताना आपला जोडीदार जसा आहे तसा आपण स्वीकारतोच ना? आणि सुखी समृद्ध आयुष्य जगत राहतो. ‘जे आहे, जसे आहे’ या तत्त्वावर आणि सामंजस्याने ‘लॉकडाऊन’नंतर येणारा काळही आपण एकमेकांच्या साथीने सुसह्य आणि सुखी करायचा प्रयत्न करूया. जीवो जीवस्य जीवनम, आलीया भोगासी असावे सादर आणि कालाय तस्मै नमः हेच शेवटी खरे असावे.

-डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, पुणे

Related Stories

सण निरागस हो

Patil_p

2020: वर्ष काळोखाचे

Patil_p

आनंदाच्या, उत्साहाच्या सणांची मालिका-दीपावली

Omkar B

सत्ताधारी-विरोधक राजकारणातच मश्गूल

Patil_p

महाराष्ट्रातील संकटग्रस्त खासगी वनक्षेत्र

Amit Kulkarni

सातवा गुरु सूर्य

Patil_p
error: Content is protected !!