Tarun Bharat

लॉकडाऊनमुळे शहर पुन्हा एकदा थांबले

गल्ली-बोळात बॅरिकेड्स : पोलिसांनी बंदोबस्त वाढविला

प्रतिनिधी/ बेळगाव

देशात दुसऱयांदा वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत गुरुवारी जिल्हय़ात एकाच दिवशी तब्बल 17 जण कोरोनाबाधित आढळले. यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोर करण्यात आली आहे. एरव्ही गजबजणारे शहर लॉकडाऊनमुळे इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस बंद राहिल्याने मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

‘कोविड-19’ मुळे शहर पुन्हा एकदा थांबले असून मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. शहराचे प्रवेशद्वार असणाऱया चन्नम्मा सर्कल वगळता सर्व रस्ते बंद केले असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करण्याबरोबरच बाहेरदेखील जाणे मुश्कील बनले आहे. नेहमी गजबजणाऱया मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार पेठेसह मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, पांगुळ गल्ली, बापट गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली आदी ठिकाणी भर दिवसाही शांतता पसरली होती.

पत्रे उडून गेल्याने भाजी मार्केटही बंद

शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे शाळांचा परिसर व उन्हाळय़ात गजबजणारे मैदाने ओस पडली आहेत. अत्यावश्यक गोष्टींमध्ये हॉस्पिटल, औषध दुकाने वगळता सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्याबरोबरच गुरुवारी झालेल्या वादळी वाऱयाच्या पावसाने शहराच्या तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या येडियुराप्पा मार्गावरील भाजी मार्केटचे पत्रे उडून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजी मार्केटदेखील बंद ठेवण्यात आले आहे.

शहरातील औषध दुकानांमध्ये काही औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी संबंधितांना औषधासाठी इकडून-तिकडे फिरावे लागत आहे.

अनावश्यक वाहतुकीला चाप

शहरातील प्रवेशद्वार असलेल्या किल्ला, जिजामाता चौक, चन्नम्मा सर्कल, युनियन जिमखाना, आरटीओ सर्कल, शनि मंदिर, धर्मवीर संभाजी चौक, संगोळ्ळी रायण्णा चौक, सम्राट अशोक चौक यासह इतर भागात बॅरिकेड्स लावून विनाकारण फिरणाऱया नागरिकांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अनावश्यक वाहतुकीला चाप बसला आहे.

कर्तव्यदक्ष महिला पोस्ट कर्मचारी

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली आहे. अशाच प्रकारे पोस्ट कर्मचारी असलेल्या महिलेने आपली सेवा कर्तव्यदक्षपणे बजावली आहे. ही महिला लॉकडाऊनच्या काळात घरोघरी जाऊन संबंधितांची पत्रे पोहोच करत आहे. या महिलेचे कार्य कौतुकास्पद आहे. शुक्रवारी या महिलेने एका दुकानाचे शटर बंद असतानादेखील पत्र पोहोच केले आहे.

Related Stories

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा : मलप्रभेचे होणारे प्रदूषण टाळा

Omkar B

दसरा क्रीडा स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाचे यश

Amit Kulkarni

माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश वितरण

Amit Kulkarni

जिल्हाधिकाऱयांची एडीएलआर कार्यालयाला अचानक भेट

Amit Kulkarni

बेडकिहाळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अभिजित लठ्ठे

Omkar B

निपाणी येथील बाजारात मिरची कडाडली

Omkar B