चार दिवसांचे लॉकडाऊन यशस्वी : सहकार्याबद्दल जनतेचे आभार कडक निर्बंधांचे पालन करावे : मुख्यमंत्री


प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारीच्या उद्रेकातून वाढणारी बाधित व बळींची संख्या रोखण्याचे राज्यासमोर निर्माण झालेले आव्हान आणि मंत्री, आमदार, पक्षपदाधिकारी यांच्यासह सर्वच स्तरातून होणाऱया लॉकडाऊन वाढविण्याच्या मागणीची सरकारने अखेर दखल घेतली आहे. मात्र प्रत्यक्ष लॉकडाऊनचा कालावधी न वाढवता पुढील सोमवारपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. कोरोनावर मात करण्यासाठी निर्बंधकाळात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
काल रविवारी सायंकाळी 4.30 वाजता गोमंतकीयांना संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात गुरुवार रात्रीपासून जारी करण्यात आलेले लॉकडाऊन आज दि. 3 मे रोजी पहाटे 6 वाजता संपुष्टात येणार आहे. मात्र त्यानंतर लगेचच सर्व व्यवहार सुरळीत न होता त्याच क्षणापासून कठोर निर्बंध लागू होणार असून दि. 10 मे रोजी पहाटे 6 पर्यंत ते लागू राहतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकांच्या मनमानीमुळे कडक निर्बंध जारी करण्याची पाळी
सध्या सुरू असलेले लॉकडाऊन जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे यशस्वी झाले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या लोकांचे आभार व्यक्त केले. गत कित्येक दिवसांपासून राज्यात कोरोना उद्रेक वाढत असतानाही अनेक लोक मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नव्हते. त्यामुळे शेवटी चार दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करावे लागले. परंतु एवढे करुनही काही लोक मनमानीपणा सोडण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच पुढील आठ दिवस कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 144 कलमाची यापुढेही कडक अंमलबजावणी
राज्यात सध्या चालू असलेले 144 कलम यापुढेही चालूच राहणार आहे. नवीन निर्बंधाच्या काळात राज्यातील पॅसिनो, मद्यालये, क्रीडा संकूल/प्रेक्षागृहे/सामाजिक सभागृह व तत्सम स्थळे, रिव्हर क्रूज/वॉटरपार्क/करमणूक पार्क, जीम/स्पा/मसाज पार्लर/सलून, नाटय़/सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉलमधील करमणूक स्थळे, जलतरण तलाव, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, आठवडी बाजार, हे सर्व बंद राहणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध चालूच राहणार
सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध असतील. मात्र जिल्हाधिकारी/उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्वमान्यता घेतलेले लग्नकार्यासारखे सोहळे 50 पर्यंतच्या लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तसेच 20 लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करता येतील. एखाद्या अधिकृत कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी/उपजिल्हाधिकारी यांच्या पूर्वमान्यतेशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही.
बस, रेस्टॉरंटस्चा पन्नास टक्के वापर, टेक अवे पूर्णवेळ
कामावर जाणारे कर्मचारी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असेल तरच 50 टक्के क्षमतेने बसचा वापर करता येणार आहे. त्याचप्रमाणे सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंटस् चालू ठेवता येतील, त्याचबरोबर ’टेक अवे’ किंवा ’घरपोच सेवे’साठी त्यांची किचन पूर्णवेळ चालू ठेवता येणार आहेत.
मासळी मार्केट, दुकाने दिवसभर सुरु राहतील
प्रत्येक ठिकाणची मासळी मार्केट कडक निर्बंध पाळून चालू राहतील. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकाने आणि आस्थापने चालू ठेवता येतील.
उद्योग, कारखाने, कार्यालये पूर्ण वेळ सुरु
उद्योग/ कारखाने तसेच अत्यावश्यक असलेली सरकारी आणि सार्वजनिक कार्यालये, औषध आणि आरोग्य सेवा, शेती/बांधकाम संबंधी कामे, किराणा/खाद्यपदार्थ, हॉटेल, प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, दळणवळण चालू राहण्यास मान्यता आहे.
बँका, वीमा, एलपीजी सेवा पूर्णवेळ मिळणार
इंटरनेट सेवा, बँका, विमा, एटीएम, पेट्रोल पंप, एलपीजी सिलिंडर सेवा पूर्णवेळ चालू ठेवण्यास मान्यता असेल.
आवश्यक वाटल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय द्यावा
दरम्यान, दुकाने/आस्थापने/कारखाने आदी बिगर सरकारी व्यावसायिकांनी आपले कर्मचारी/कामगार कामावर येणे एकदमच अत्यावश्यक नसेल तर ’वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा द्यावी. प्रत्येक कर्मचारी/कामगाराने कामावर येण्याजाण्याची वेळ कठोरतेने पाळावी. एखाद्या कर्मचाऱयास सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यात अडथळे, यासारखी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याने घरीच राहून उपचार घ्यावे. त्याचबरोबर लिफ्ट, शिडी, खुली जागा, पार्किंग जागा येथे गर्दी टाळावी. दिव्यांग आणि विशेष क्षमतेच्या मुलांच्या पालकांनी ’वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय निवडावा, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
आदेशाचा, निर्बंधांचा भंग केल्यास होणार कडक कारवाई
कोणत्याही आदेशाचा, निर्बंधाचा भंग होत असल्याचे दिसून आल्यास भादंसंच्या कलम 188 आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 51 ते 60 खाली कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच कोरोनावर मात करण्यात यश आले होते. त्याच पद्धतीने आताही लोकांनी संपूर्ण सहकार्य द्यावे, लोकांचे जगणे महत्वाचे आहे. आम्हाला बाधितांची तसेच मृतांचीही संख्या कमी करायची आहे. त्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत. सर्वांनी कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास वैद्यकीय सेवेवरील ताण कमी होईल, तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यातही यश मिळेल, असे सांगून या प्रयत्नात प्रत्येकाने सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीय जनतेला केले आहे.