Tarun Bharat

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

वासुदेवशास्त्री खरेंना भेट दिली होती प्रत, इतिहासाचा अमूल्य ठेवा

मानसिंगराव कुमठेकर / मिरज

लोकमान्य टिळक यांनी प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांना भेट दिलेले `गीतारहस्य’ हे पुस्तक मिरजेत मिळाले आहे. खरे कुटुंबियांनी ते जीवापाड जपले असून त्यावर लोकमान्य टिळकांनी पुस्तक भेट दिल्यासंदर्भात मजकूर स्वहस्ते लिहिला आहे. लोकमान्य आणि खरेशास्त्रींचे स्नेहबंध उलगडणारा हा अमूल्य ठेवा आहे.

लोकमान्य आणि खरेशास्त्रींचे मैत्र

लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्री खरे यांचा गाढ स्नेह होता. लोकमान्य, टिळक, आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केल्यानंतर पहिल्या शिक्षकांच्या यादीत शास्त्रीबुवांचेच नाव होते. टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राला `केसरी’ हे नाव आणि त्यावरील `स्थिती नो रे दध्या’ हा ध्येयदर्शक श्लोक खरेशास्त्रींनीच सुचविला. शिवाजी छापखान्याला आग लागल्यानंतर एका रात्रीत केसरीच्या टाईपाच्या पेट्या मोरोबादादांच्या वाड्यात हलविण्यात आल्या. त्यावेळी ते सामान लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्री यांनीच खांद्यावरून वाहून नेले होते.

खरेशास्त्रींनी केली लोकमान्यांना मदत

पुढे टिळकांच्याच सांगण्यावरून खरेशास्त्री मिरज हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रूजू झाले. मिरजेत आल्यावरही टिळकांबरोबरचा शास्त्रीबुवांचा स्नेह अखेरपर्यंत टिकून होता. टिळकांवर ज्यावेळी ज्यावेळी खटले झाले त्यावेळी शास्त्रीबुवा आपल्या या जीवलग मित्राच्या मदतीला धावून गेले. यथाशक्ती त्यांनी मिरजेतून मदत गोळा करून दिली. ही मदत देण्यामध्ये मिरजेच्या नायकिणीही होत्या. पुढे लोकमान्यांनी या नायकिणींना पाठविलेले आभाराचे पत्र मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे.

शास्त्रीबुवांच्या घरी टिळकांचा मुक्काम

वासुदेवशास्त्री खरे यांचा लोकमान्यांचा मतांना पाठिंबा होता. मिरज संस्थानात त्यांना याबाबत विरोधही पत्कारावा लागला. मात्र, त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. वासुदेवशास्त्री खरेंनी आपल्या काही नाटकांमध्येही टिळक विचार पेरले होते. टिळक विचारांची काही पात्रे त्यांनी जाणिवपूर्वक आपल्या काही नाटकांमध्ये   लिहिली होती. लोकमान्य टिळक मिरजेत येत त्यावेळी त्यांनी आवर्जुन वासुदेवशास्त्रींची भेट घेतली. सरकारी थिएटरसमोरील शास्त्रीबुवांच्या वाडÎात टिळकांचा अनेकदा मुक्काम झाला होता. 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगातून सुटून परत आले. त्यानंतर काही दिवसांनी ते मिरजेत आले. खूप वर्षानंतर त्यांची आणि वासुदेवशास्त्राr खरेंची भेट झाली. ही भेट रामायणातल्या `भरतभेटी’ सारखीच होती, असे उद्गार मिरजेतील तत्कालीन प्रतिष्ठीत गृहस्थांनी काढले.

लोकमान्यांनी भेट दिले गीतारहस्य

लोकमान्यांचे गीतारहस्य 1915 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्याची प्रत त्यांनी शास्त्रीबुवांना पाठविली होती. गीतारहस्याची ही प्रत नुकतीच मिळाली आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने खरेशास्त्री यांच्या अप्रकाशित साधनांवर अभ्यास करण्यात येत आहे. यासाठी शोध घेत असता, ही प्रत खरेशास्त्रींच्या घरात आढळली. शास्त्रीबुवांचे पणतू वासुदेव खरे आणि सौ. सुखदा खरे यांनी ही प्रत जपून ठेवली आहे.

इतिहासाचा अमूल्य ठेवा

लोकमान्यांनी या गीतारहस्याच्या प्रतिवर स्वहस्ते `वे. शा. वासुदेवशास्त्री खरे यांस ग्रंथर्त्याकडून सप्रेम भेट’ असा मजकूर लिहिला आहे. गीतारहस्याची ही प्रत लोकमान्य आणि शास्त्राrबुवा यांच्या स्नेहबंधाची साक्षीदार आहे. ही प्रत मिळाल्यानंतर शास्त्रीबुवांनी ती संपूर्ण वाचली आणि त्यातील कर्मयोगाच्या विचारावर शास्त्रीबुवांनी चांगला अभिप्राय दिला होता. प्रत्यक्ष लोकमान्यांनी आपल्या मिरजेतील मित्राला भेट दिलेली गीतारहस्याची ही प्रत इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे.

Related Stories

सांगली येथे तीन पेढींचे परवाने तीन दिवसांकरिता निलंबित

Archana Banage

ओमीक्रोन व्हायरसबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका

Patil_p

फलटण विभागामध्ये महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमाला सुरवात

Patil_p

चंद्रकांत पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून पालकमंत्र्यांना टार्गेट : हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

सांगली : सरपंचांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित करा

Archana Banage

वडणगे तलावात महिलेची तान्हुल्यासह उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू

Archana Banage